माझं बालपण घाटकोपरच्या चाळींमध्ये गेलं. आमची घरमालकीण काशीबाई. काशीबाई एक बिनधास्त व्यक्तिमत्त्व होतं. दारूचा धंदा करायची. पोलिसांनाही घाबरायची नाही. चांगल्याला चांगली आणि वाईटाला खूपच वाईट होती.
तिने एका वेडया बाईला आसरा दिला होता. तिचं नाव निलिमा. एरव्ही निलिमा खूप सारी कामं बर्यापैकी करायची. पण जर का तिला वेड्याचे झटके आले की मग मात्र ती कोणाचंच ऐकत नसे. ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जोरात धावायची. खूप खूप शिव्या घालायची. साडीचा पदर दातात धरून ओढायची. भिंतीवर टकरा घ्यायची. जिवाच्या आकांताने ओरडायची. खूप खूप त्रास करून घ्यायची स्वतःला. तोंडातून रक्त येईपर्यंत स्वतःला मारायची.

मला तर खूप भीती वाटायची तिची. तिचं अक्राळविक्राळ रूप पाहून छातीत धडकी भरायची. आई म्हणायची काय घाबरायचं तिला? ती अश्या वेड्याच्या झटक्यातसुद्धा दुसर्या कोणालाच इजा पोहोचवत नाही. फक्त स्वतःला त्रास करून घेते. काही करत नाही ती.
मला मात्र रात्रीची कधी कधी तिचीच स्वप्ने पडायची. मी खूपच लहान असल्यामुळे असं वाटायचं तिने आपल्याला उचलून घेतले आहे आणि उगीचच आकाशात उंच फेकून हातात झेलते आहे. हे करताना ती मोठमोठ्याने अचकटविचकट दात काढून हसत आहे. त्यामुळे मला तिची आणखीनच भीती वाटायची.
तिला असं का होत ? हे कोणालाच माहीत नव्हतं. पण एक दिवस शेजारची मालिनी मला म्हणाली, अग मला माहितेय निलिमाला वेड्याचे झटके का येतात ते? ती नीलिमाची दर्दभरी कहाणी सांगू लागली.

निलिमा एका चांगल्या घरातली स्त्री. तिच लग्न झालं, तिला दोन मुलंही झाली. पण असं असताना सुद्धा तिच्या नवऱ्याने तिला काहीच न सांगता , तिला अंधारात ठेवून गुपचूप दुसर्या बाईशी लग्न केले.
ह्या प्रसंगाला तिला अचानक सामोरे जावे लागल्याने तिला वेड्याचे झटके येऊ लागले. तिचं इतकं छान चाललेलं असताना फक्त सवतीमुळे तिच्यावर असा परिणाम व्हावा. मुलांनी दुसरी आई स्विकारली, नवर्याने दुसरी बायको स्विकारली.
पण निलिमा... निलिमाचं काय?... निलिमा कधीच सवत स्विकारू शकली नाही. सर्वस्वी चूक तिच्या नवर्याची असताना, हिचा काहीही दोष नसताना, तिच्या देहाला अनंत यातना भोगाव्या लागत होत्या. ती थोडी भानावर असताना काशीबाई तिच्याकडून भरपूर कामे करून घ्यायची.
भांडी घासून घे, कपडे धुऊन घे, केर काढून घे, अशी एक ना अनेक कामे ती तिच्याकडून करून घ्यायची. टीचभर पोटासाठी ती खंडीभर कामे करत होती. वेड्याचे खूप झटके आल्यावर मात्र ती काहीच खात नसे..
ती खूप अबोल होती, कोणाशीही बोलत नसे. अंतरीच्या जखमा ती कधीच उलगडत नव्हती. अशी कधीतरी जखमेवरची खपली निघाली की मग मात्र ती वेडीपिशी व्हायची. पार गोंधळून जायची.

एक दिवस ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमधून काही माणसे आली आणि तिला घेऊन गेली. काही दिवसांनी कळलं की ती तिथून पळून गेली. ती कुठे गेली? कशी गेली? तिचं पुढे काय झालं? हे काहीच कळलं नाही.
इथेच निलिमा अध्याय कायमचा संपला. जगात अशा कितीतरी निलिमा असतील ज्या अन्यायाचा प्रतिकार करू शकत नसतील आणि स्वतःलाच खूप त्रास करून घेत असतील.
स्वत:चा काहीच दोष नसताना शिक्षा मात्र भोगत असतील. निलिमा, नवर्यावर इतकं उत्कट प्रेम तुझं होतं की तू त्याच्यावर रागावून प्रतिकार करू शकली नाहीस आणि स्वतःलाच संपवून बसलीस.. त्याने दुसरं लग्नही केलं आणि संसारात रमूनही गेला पण तू मात्र कायमची जळत राहिलीस चुलीतल्या लाकडांसारखी राख होईपर्यंत....!
नंदा गवांदे
लेखिका शिक्षिका आहेत.
gawandenanda734@gmail.com