शिवराज नारियलवालेने असं काय केलं होतं की जालना पोलिस इतके बेभान व्हावेत ?

शिवराज नारियलवालेने असं काय केलं होतं की जालना पोलिस इतके बेभान व्हावेत ?

शिवराज नारियलवालेने असं काय केलं होतं की जालना पोलिस इतके बेभान व्हावेत ?

शिवराज नारियलवाले नावाच्या भाजपा कार्यकर्त्याला जालना पोलिस बेदम मारहाण करत असल्याचा विडिओ सद्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं म्हणजेच भाजपेतर पक्षांची सत्ता असल्यामुळे देशभरात चर्चेत आहे.

गुन्हा काहीही असो, पोलिसांनी एखाद्याला अशी अमानुष मारहाण करणं योग्य आहे का, हा प्रश्न सामाजिक क्षेत्रातून विचारला जाऊ लागला आहे. भाजपा कार्यकर्ता असला तरी मारहाणीचं समर्थन होऊ शकत नाही, अशी स्वच्छ भूमिका पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, विवेकवादी, अर्थात संविधानवादी मंडळींनी घेतलीय.

महाराष्ट्रातील भाजपा नेतेही सदरच्या मारहाणीविरोधात विलाप करत आहेत. बेछुट बेभान क्रूर निर्दयी मारहाणीचा आदर्श केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने दिल्ली पोलिसांच्या रुपाने घालून दिलेला असल्याने मानवाधिकाराबाबत बोलायचं तर भाजपाईंची जरा कोंडीच आहे. मानवाधिकार या संकल्पनेची भाजपा व तत्सम संघटनांनी नेहमी खिल्ली उडवलेली आहे.

बलात्कारासारख्या आणि इतरही अनेक गुन्हेगारी घटनांत आरोपींना खटला न चालवता थेट गोळ्या घालून ठार केलं पाहिजे, असं मानणारे व या असंविधानिक अपेक्षेचं खुलेआम समर्थन करणारे बहुतांशी लोक संघीभाजपाई विचारांची पाठराखण करणारे असतात, हा निव्वळ योगायोग नसतो.

त्याच न्यायाने शे-दोनशेचा जमाव जेव्हा एखाद्या रुग्णालयावर चालून येतो तेव्हा आततायी विचारसरणीनुसार, पोलिसांनी झुंडींवर खरंतर एके -४७ चालवायला हवी होती. पोलिसांनी दंडुक्यांनी केलेली मारहाण तुलनेत सौम्य म्हणायला हवी. असं कोणालाही वाटू शकेल.

पण पोलिसांना नियमकायद्याची बंधनं आहेत. लोकांना लाख वाटतं, गोळ्या घालाव्यात, भर चौकात फाशी द्यावी वगैरे ! पण तसं होऊ शकत नाही. आरोपींना पकडून त्यांच्याविरोधात पुरावे गोळा करून न्यायालयासमोर मांडणं आणि न्यायालयाने आरोप सिद्ध झाल्यास शिक्षा सुनावणं अपेक्षित आहेत. अश्रूधूर, लाठीचार्ज, गोळीबार ही अपवादात्मक परिस्थितीत उचलावयाची पावलं आहेत. दिल्ली पोलिसांनी ती सर्वसाधारण करून टाकली.

एखादी व्यक्ती सरकारविरोधी असणं इतकं कारण दिल्ली पोलिसांना अमानुष पद्धतीने झोडायला पुरेसं आहे. एका बाजूच्या दंगलखोरांच्या खांद्याला खांदा लावून दुसऱ्या बाजूच्या दंगलखोरांना थोपवण्याचा दिल्ली पॅटर्न ही मोदीशहा दुकलीची देण आहे देशाला !

सरकारविरोधी व्यक्ति आंदोलक असोत, शेतकरी असोत की विद्यार्थी, केवळ निर्दयताच नव्हे, तर संवेदनहीनतेचं दर्शन दिल्ली पोलिसांनी वेळोवेळी दाखवलं आहे. त्यावेळी ज्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या, ते आज शिवराज प्रकरणात पोलिसी अत्याचाराविरोधात बोलत आहेत.

शिवराजला झालेली मारहाण समर्थनीय असूच शकत नाही, पण त्याविरोधात बोलायचा भाजपा नेत्यांना किंवा स्वत: शिवराजला तरी नैतिक अधिकार आहे काय?

शिवराजच्या जागी रुग्णालयाची तोडफोड करणारा कोणी सरफराज असता तरी भाजपा नेत्यांना आणि आता ज्यांना ज्यांना कंठ फुटलेत, तो पोलिसी अत्याचारच वाटला असता काय ? उत्तरप्रदेशातील उन्नावमध्ये फैजल हुसेन या भाजीविक्रेत्याचा पोलिस मारहाणीत मृत्यू ओढवला, त्याविरोधात भाजपा नेत्यांनी आवाज उठवला का?

मूळात, शिवराजच्या प्रकरणात भाजपाला आवाज उठवायला दीड महिना का जावा लागला? विडिओ बाहेर आला आणि महाराष्ट्राला घटना उशीरा कळली, ते समजण्यासारखं आहे, पण पक्षाच्या युवा मोर्चाच्या महासचिवाला, जो रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर अशा नेत्यांचा समर्थक आहे, त्याला इतकी बेदम मारहाण होते आणि ती पक्षापर्यंत पोचत नाही, हे शक्य आहे का? की रुग्णालय तोडफोड प्रकरणातून आधी भाजपाला हात झटकायचे होते ? आणि आता दीड महिन्यांनी तोडफोड प्रकरण निवळल्यानंतर भाजपाला कंठ फुटलाय?

तापल्या तव्यावर पोळी भाजून घ्यायची हा तर भाजपाचा राजकीय स्वभावधर्म आहे. त्यामुळे ९ एप्रिल रोजी जालनातील दीपक रुग्णालयावर चालून गेलेल्या सुमारे २०० जणांच्या झुंडीत शिवराज हा एकमेव भाजपा कार्यकर्ता होता का की आणखीही होते, हे पोलिसांनी शोधलं पाहिजे.

गवळी समाजाचा पोलिसांनी अपमान केला व त्याचा विडिओ काढत होता, म्हणून पोलिसांनी शिवराजला झोडपलं, हा जुनाच जातीयवादी फंडाही भाजपाने पुढे केलाय. पण समाजाच्या अपमानावर दीड महिन्यांपूर्वीच रोष का व्यक्त झाला नाही, हा प्रश्न उरतोच.

विडिओ समोर आल्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांना पाठीशी उभं राहण्याची भाजपाची राजकीय मजबुरी समजण्यासारखी आहे. पण शिवराज प्रकरण म्हणजे भाजपासाठी धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, असं झालंय, कारण रुग्णालयावरच्या हल्ल्याची घटनाही पुन्हा ताजी झालीय.

९ एप्रिल, २०२० रोजी जालना शहरातील जीम चालक दर्शन हिरालाल देवावाले यांच्या दुचाकीला एका भरधाव ट्रकने धडक दिली होती. खरपुडी रोड जवळ सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दर्शन देवावाले यांना दीपक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री साडेनऊ वाजता त्यांचं निधन झालं.

त्यानंतर डॉक्टरांनी उपचारात कसूर केल्याचा ठपका ठेवत दर्शन देवावाले यांचे मित्र आणि नातेवाईक अशा दोनशे जणांच्या जमावानं रात्री साडेनऊच्या सुमारास दीपक हॉस्पिटल वर हल्ला चढवला. हॉस्पिटलमध्ये दहशत माजवत झुंडीने आयसीयू कक्षाची तोडफोड केली. तेथील काचा, विद्युत उपकरणे आणि फायर ब्रिगेडचे यंत्र असलेल्या ठिकाणी या जमावाने तोडफोड केली.

या घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर काही वेळातच डीवायएसपी सुधीर खिरडकर यांनी देखील दीपक हॉस्पिटल गाठले. पोलिसांना पाहून जमाव तेथून पळून गेला. या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात काही जणांवर गुन्हासुद्धा दाखल आहे. शिवराजला मारहाण होत असल्याचा विडिओ त्याच वेळचा आणि रुग्णालयातलाच आहे.

इथे जालन्यातील संबंधित पोलिस कायद्याच्या दृष्टिकोनातून चुकीचे वागलेत हे उघड आहे. पण जसं भाजपाई दिल्ली पोलिसांच्या दांडगाईचं भरभरून समर्थन करतात, तसंच इथेही रुग्णालयावरील हल्ला समोर आल्यामुळे पोलिसांनी योग्यच केलं, अस़ं म्हणणारेही आहेत. शिवाय, भाजपा कार्यकर्ता मार खातोय, म्हणून आनंदणारेही आहेत.

विडिओ सरळसरळ पोलिसांच्या विरोधात जाणारा उघड पुरावा असल्याने यथावकाश संबंधित पोलिसांविरोधात कारवाई होईलच ; पण त्यातून दुसऱ्या बाजूने चुकीचा संदेशही जाईल. रुग्णालय तोडफोड करणाऱ्यांचं मनोबल वाढेल. या टप्प्यावर राज्य सरकारचीही कोंडी होणार आहे.

दोन्ही बाजूंनी कायद्याची बूज राखली जाईल, असा निर्णय आता सरकारला घ्यावा लागेल. त्यामुळेच पोलिसांवरील कारवाईसोबतच तोडफोड प्रकरणातील शिवराजसहित अन्य आरोपींविरोधात संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई किंवा तत्सम कठोर कारवाईचा बडगा उगारावाच लागेल !

 

 

 

 

राज असरोंडकर

संपादक, मिडिया भारत न्यूज | संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!