विद्यार्थ्यांना सम जाऊन सांगायला हवं !

विद्यार्थ्यांना सम जाऊन सांगायला हवं !

विद्यार्थ्यांना सम जाऊन सांगायला हवं !

आमचा साहित्यिक मित्र सुदेश मालवणकर समजावणे या शब्दाची चांगली उकल करतो. तो म्हणतो, समजाऊन सांगणे, म्हणजे खरं तर सम जाऊन सांगणे. अर्थात, एखाद्याच्या समपातळीवर जाऊन सांगणे.

ती समपातळी वयाची असू शकते. शिक्षणाची असू शकते. आकलनशक्तीची असू शकते किंवा अन्य काही निकष असू शकतात.

इथे सम जाऊन सांगणं म्हणजे सविस्तर किंवा खुलासेवार सांगणं अपेक्षित नाही, तर आहे तोच विषय सोपा करून सांगणं. पण मग पुन्हा सोपं करताना मूळ विषयाचा अर्थाचा अनर्थ करायचा का? तर तसंही नाही. चंद्राबद्दल सांगताना चांदोबाबद्दल सांगून काही उपयोग नाही. ग्रहणाबद्दल माहिती देताना खायच्या गिळायच्या गोष्टी सांगून उपयोग नाही, तर सावलीचाच संदर्भ सांगायला हवा.

नवावर सात सत्याण्णव यापेक्षा सोपं काय असू शकतं? ते नव्वद सात करणं अधिक गोंधळ निर्माण करणारं आहे. मुलं ती संख्या ९०७ अशी लिहिण्याची धोकादायक शक्यता त्यात अधिक आहे. संख्येच्या जडणघडणीत अंकांच्या स्थानिक किंमतीचं मोठं महत्त्व आहे. तेच जर कोलमडलं तर शाळेतून बाहेर पडेपर्यंत गणिताचा गुंता डोक्यात कायम राहतो.‌

अडचण गणित समजून घेण्याची आहे की भाषेची आहे, हे एकदा पक्कं व्हायला हवं. काही मुलांना पुस्तक पाठ असतं, पण शब्दांवर बोट ठेऊन वाचायला सांगितलं तर अडचण होते. खणखणीत बोलणाऱ्या या मुलांना ब कुठला नि क कुठला, हेही माहित नसतं. घोकंपट्टी ही या मुलांची हुशारी असते. ती पुढच्या इयत्तांमध्ये तोंडघशी पडते. अवघड भाषा जात असेल तर मग गणिताव्यतिरिक्त इतर विषयांचं काय करणार? उद्या शासन इंग्रजीच्या बाबतीत पण फोनेटिकवर येईल. म्हणेल जगात आहेत अशा भाषा !!!

अर्थ न बदलता, पुढील वाक्य सकारात्मक करा, असा एक अभ्यास असतो. इथे अर्थ न बदलणं अपेक्षित आहे. मध्यंतरी, मध्य रेल्वेने अर्धवेळ डाॅक्टरांची पदे याऐवजी अर्धवट डाॅक्टरांची पदे, असा शब्दप्रयोग जाहिरातीत केला होता. हे असं सोपं अभ्यासाचं वाटोळं करणारं ठरेल. करायचं होतं माकड, झालं बोकड, असं व्हायला नको.

प्रफुल केदारे, जनार्दन केशव, रुपेश इंदुलकर सोबत आमचा बोरूची शाळा हा अभ्यासक्रम फक्त दोन दोन तासांच्या आठ सत्रांचा आहे. वृषाली विनायक यांनी त्यांची बांधणी केलीय. त्यात मुलं जोडशब्दांसह चांगलं बोलू लागतात. उच्चारात स्पष्टता येते. त्यांच्यात भाषेची समज आणि वाचनशैलीही विकसित होते.

या सगळ्या गोष्टी नीट सम जाऊन सांगणं हे एक अध्यापकीय कौशल्य आहे. ते शिक्षकांनी अंगी बाणवण्याची गरज आहे. पगारी पाट्या टाकणाऱ्या शिक्षकांच्या भरवश्यावर शिक्षणाचा दर्जा सुधारला जाऊच शकत नाही. वास्तविक, शिक्षकांच्या नाकर्तेपणामुळे मुलांची संपादणूक गुणवत्ता वाढत नाही आणि शासन मात्र शिक्षण सोपं करण्याच्या नावाखाली अवसानघातकी प्रयोग करत चाललंय.

सरकार नावाच्या व्यवस्थेकडे बलाढ्य साधनसामग्री असते. असतो तो फक्त इच्छाशक्तीचा आणि प्रामाणिकतेचा अभाव !!! मुलांना शाळेत शिकवायचंय की घडवायचंय? हे आधी ठरायला हवं.

एकूणच अभ्यास सोपा झाला पाहिजे, पेक्षा अभ्यास सोप्या भाषेत सम जाऊन सांगू शकेल, अशा शिक्षकांची संख्या वाढली पाहिजे, हा एक परिणामकारक उपाय आहे. काम अध्यापनपध्दती सहजसुलभ करण्यावर झालं पाहिजे, ना की शिक्षणातला अर्कच काढून टाकण्यावर !!!

 

राज असरोंडकर

लेखक कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!