मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
माझ्या हिंमतीची परीक्षा घेऊ नका, असा शेरोशायरीतून गर्भित इशारा देत शिवसेना खासदार संजय राऊत पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.
मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे…ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा..शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही, असं ट्वीट काल संजय राऊत यांनी केलं होतं.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना कंगना राणावतचा उल्लेख ‘हरामखोर’ असा केल्याने पुन्हा नव्या वादाला तोंड फुटलंय. पण संजय राऊत यांनी माफी मागायला नकार दिलाय. कंगना राणावतने महाराष्ट्राची माफी मागितली तर विचार करेन, असा पवित्रा त्यांनी घेतलाय. पण महाराष्ट्राच्या दुश्मनांचं श्राद्ध घातल्याशिवाय राहणार नाही, या विधानापुढे ‘प्राॅमीस’ शब्द आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महाविकास आघाडीच्या सरकारच्या स्थापनेची धडपड सुरू होती, तेव्हाही संजय राऊत यांनी शायरीतून अनेक संकेत दिले होते. जे पुढे जाऊन खरे ठरले. आताही तोच प्रकार सुरू आहे. संजय राऊतांनी ताजं ट्वीट केलंय. त्यात त्यांनी म्हटलंय की,
मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना, पहले भी कई तूफानों का रूख मोड चुका हूं !
आता राऊत यांनी महाराष्ट्राच्या दुश्मनांचं श्राद्ध घालण्याची भाषा केलीय. आणि पुढे प्राॅमीस म्हटलंय. हे प्राॅमीस मोठं सूचक आहे.
संजय राऊतांनी फेसबुकवरून भाजपालाही छेडलंय. माझ्या ताकदीबद्दल त्यांना जाऊन विचारा, जे १०५ आमदार असूनही विरोधात बसलेत, या शब्दांत राऊतांनी भाजपाला डिवचलंय.
सत्तेच्या मर्यादेत गप्प बसलेली शिवसेना येणाऱ्या काळात आक्रमक होण्याची शक्यता त्यातून दिसतेय. याचाच अर्थ, महाविकास आघाडीच्या गोटात वादळापूर्वीची शांतता आहे, असाही काढला जातोय.