आज आणखीन मोठी झाल्याची पुन्हा एक नवी चाहूल लागली. चष्मा लागलाय. टाळता येईल तितकं टाळलं. पण छे, आता अशक्य. वय वाढल्याची खात्री झाली. वार्धक्याच्या आणखीन थोडी जवळ जाण्याची चिन्हं दिसू लागली.
जसा काळ्याभोर केसात पहिला पांढरा शुभ्र केस बघितल्यावर थोडंसं धस्स होतं तसाच आजचा विषय ; म्हणजे याचाच दुसरा अर्थ असा आहे की खूप सुंदर जगून घेण्याची ही वेळ. जे कधीच करून पाहिलं नाही ते सारं सारं करण्याची वेळ. अजूनही संधी गेली नाही हे स्वतःला बजावून सांगण्याचा हा समय.
केस पांढरे होणं, चष्मा लागणं, शरीर शक्ती कमी होत जाणं, चेहऱ्यावर थोडासा थकवा जाणवणं ही सारी प्रौढपणाची लक्षणं आहेत. मी हे स्वीकारलंय. अगदी सहजच !
आता हरायचं नाही. मनाचा ताजेपणा गमवायचा नाही. आनंद मिळेल अशी कारणं आपणच निर्माण करायची. कोणावर विसंबून नाही राहायचं. मस्त मजेत जगायचं. राहून गेलेलं नक्षत्राचं देणं देण्याचा प्रयत्न करायचा. सुख, समाधान इतरांना वाटायचं. जे घेता येईल ते घ्यायचं आणि जे देता येईल ते द्यायचं बस्स. वयाबरोबर हे सारं स्वीकारलंच पाहिजे. प्रत्येक वयात त्या त्या गोष्टींचा आनंद घेता आला पाहिजे. आता कोणतीच गोष्ट राहून जावू नये म्हणून प्रयत्न करायचे.
ही चाहूल आहे इथून पुढे आनंदाने जगण्याची. थोडासा विसावा घेण्याची आणि प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक नजरेने बघण्याची. लहानांना समजून घेता घेता आपणच लहान होण्याची. मोठ्यांना थोडा उबदार आधार देण्याची आणि कोणाचा तरी उबदार आधार घेण्याची.
वय वाढतंय, पण सोबत अनुभवही वाढतोच की ! छान कसं जगायचं याच ज्ञानही मिळतंच ना !! या वयात येईपर्यंत आपल्यासाठी काय चांगलं, काय वाईट हेही आपण समजू शकलो आहोत. नाहीतर स्वतःलाच समजण्यात अख्खं आयुष्य जातं, पण नेमकं आपल्याला काय करायचंय हेच बऱ्याच जणांना शेवटपर्यंत कळतच नाही.
त्याने आपण जास्त दुःखी होतो. एकदा नेमकं काय करायचयं हे कळलं की, पुढची पावलं आपोआप योग्य ठिकाणी पडतात. आनंदाने जगण्याचां मार्ग सापडतो. मन दुडू दुडु धावू लागतं स्वतःच्याच तालात, स्वप्नांच्या शोधात. मग वयाला कोण विचारत बसतं? म्हणतात ना, "ज्येष्ठ व्हावं, वृध्द नाही". आनंदाची ज्येष्ठता शोधावी.
करावा थोडा वेडेपणा, ह्या वयात सुद्धा. त्यात जो आनंद दडलाय तो कशातच नाही. कोणाचं काय जातंय. वेडेपणाला वय नाही, आणि अतिशहाण्या माणसाला सुख नाही. ज्याने वयावर विजय मिळवला आनंद त्याचाच होऊन राहिला. मग ती व्यक्ती, स्त्री असो की पुरुष.
या वळणावर आनंदाचा गाव गाठायचा.
सुख वाटतं फिरायचं. दुःख झेलायला शिकायचं. मनभर वाचायचं. आता इथून पुढे चष्म्यातून जग बघायचं. कोणताही खेद न करता. नुसतंच प्रपंचात गाडून न घेता.... चष्मा लावून हुंदडायचं. मुक्त मुक्त!