अनुप्रिता मेस्त्रींसारख्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेचं नेमकं फळ काय ? मानसिक छळ आणि मृत्यू?

अनुप्रिता मेस्त्रींसारख्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेचं नेमकं फळ काय ? मानसिक छळ आणि मृत्यू?

अनुप्रिता मेस्त्रींसारख्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेचं नेमकं फळ काय ? मानसिक छळ आणि मृत्यू?

कायद्याने वागा लोकचळवळीच्या उर्जासावित्री या उपक्रमाची सुरुवात शनिवारी चार सप्टेंबर रोजी बदलापूरातून झाली. विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्या या उपक्रमासाठी उपस्थित होत्या. आमच्या सगळ्यांची पक्षात काम करतानाची वेदना एकसारखीच आहे, असा सूर त्यांच्या बोलण्यातून उमटला होता. याचा अर्थ स्पष्ट आहे, राजकीय पक्ष नावाला वेगवेगळे असतात, परंतु आतमध्ये कार्यकर्त्यांची घुसमट एकसारखीच असते. त्यातही महिला कार्यकर्त्यांची हालत ‘मुकी बिचारी, कुणीही हाका’ अशी झालेली असते.


या उपक्रमाला दोन दिवस उलटले नाहीत, तोच विरारमधील मनसे कार्यकर्त्या अनुप्रिता मेस्त्री यांच्या मृत्यूची बातमी आली आहे. अनुप्रिता मिस्त्री यांचा मृत्यू हा वरवर नैसर्गिक वाटत असला, तरी ते प्रकरण दिसतं तेवढं सरळ नाही. जुलै महिन्यात मेस्त्री यांनी फेसबुकवर टाकलेलं पत्र त्या कोणत्या मानसिकतेत मनसेत काम करत होत्या, त्याचा बोलका पुरावा आहे !

अनुप्रिता मेस्त्री राजकीय पक्षात मानसिक छळ सहन करून घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या वाजणाऱ्या कार्यकर्त्यांचं प्रातिनिधिक उदाहरण आहे. मनसेच्या स्थापनेपासून अनुप्रिता मेस्त्री पक्षात काम करत होत्या. त्यांची फेसबुकची वॉल जर पाहिली तर आपल्या पक्षावर आणि आपल्या नेतृत्वावर एक अतोनात प्रेम करणारा कार्यकर्ता आपल्याला त्यांच्यात दिसतो.

मनसेबाबतच्या प्रत्येक घडामोडींची आणि विषयाची पोस्ट त्यांच्या वॉलवर दिसते. फक्त फेसबुकवरच नव्हे तर पक्ष संघटनेतही त्या क्रियाशील कार्यकर्ते होत्या. अनेक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. विरारला त्या शहर संघटक म्हणून काम करत होत्या.

आज मृत्यूसमयी त्यांचं साठ वर्षे वय होतं ; म्हणजे ज्येष्ठ नागरिक ! फक्त मनसेच नाही तर स्त्रीसन्मानाची डायलॉगबाजी करण्यात सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते हुशार असतात. परंतु त्यांच्या पक्षाच्या आतमध्ये मात्र अंधार असतो. अनुप्रिया मेस्त्री यांनी त्याचा चांगलाच अनुभव घेतला. इतका की तो त्यांच्या जीवावर बेतला.

पक्षात नवीन आलेले पदाधिकारी, त्यांची महिला आघाडीतली लुडबुड, त्याबाबत वरिष्ठांपर्यंत गेल्याच्या तक्रारी, त्या तक्रारीनंतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची झालेली बैठक आणि त्या बैठकीतच अनुप्रिता मेस्त्री यांना कपडे फाडेस्तोवर झालेली मारहाण, या सगळ्याची पार्श्वभूमी त्यांच्या मृत्यूला आहे. मारहाण करणाऱ्यांची नावंसुद्धा चिठ्ठीत नमूद आहेत.

या घटनेनंतर त्या मानसिक दबावाखाली होत्या. ताणतणावाखाली होत्या. औषधांच्या आधाराने स्वत:ला जगवत होत्या. या दरम्यान त्यांना पक्षांतर्गत न्याय मात्र मिळाला नाही.

जुलै महिन्यानंतर त्याची फेसबुक वाॅल जर आपण बघितली तर त्या आपल्याला पूर्वीसारख्याच कार्यरत दिसतात. आपलं पद तडकाफडकी स्थगित केलं गेलं, याचा अपमान गिळून त्या पक्षात काम करत राहिल्या.

आपल्या निष्ठेचे फळ मिळेल, आपलं म्हणणं ऐकलं जाईल आणि न्याय होईल, अशी त्यांना इतर कोणत्याही पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्यांप्रमाणे आशा असावी; परंतु त्यांच्या मृत्यूपर्यंत तसं काहीच घडलं नाही.

अनुप्रिता मेस्त्री यांच्यावर पक्षांतर्गत झालेल्या अन्यायाबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी कुटुंबिय, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न मिडिया भारत न्यूज ने केला, पण क्रमांक व्यस्त होता किंवा संपर्क स्वीकारला गेला नाही.

शालिनी ठाकरेंना वाॅटस्एपवरही प्रतिक्रिया विचारलीय. मेस्त्रींना मृत्यूपर्यंत न्याय का मिळाला नाही आणि दोषी पदाधिकाऱ्यांविरोधात काय कारवाई करणार, असा प्रश्न विचारलाय, पण उत्तर आलेलं नाही.

नेते समजतात तसे सगळेच कार्यकर्ते लाचार नसतात. काहीजण आपल्या स्वाभिमानाशी तडजोड करत नाहीत. भले मग मृत्यू कवटाळावा ! अनुप्रिता मेस्त्री यांनी तेच केलं. काल त्यांनी मनसे पक्षाचा वाॅटस्एप समूह सोडला आणि पाठोपाठ जगाचाही निरोप घेतला ; डावलले गेल्याचं शल्य मनात ठेवून !

 

 

 

राज असरोंडकर

संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ | संपादक, मिडिया भारत न्यूज

mediabharatnews@gmail.com

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!