मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना नवा 'कार्यक्रम' देणार होते. परंतु, मुसळधार पावसाने त्यावर पाणी फिरवलंय. सद्यस्थितीत सदरचा कार्यक्रम प्रत्यक्षात येणं कठीण असल्याने तूर्त तो पुढे ढकलत असल्याचं राज ठाकरे यांनीच एका निवेदनाद्वारे जाहिर केलंय. पावसाचं थैमान लक्षात घेता राज ठाकरेंनी मनसेचा उद्याचा मेळावाही स्थगित केलाय.
महाविकास आघाडीचं सरकार असताना राज ठाकरेंनी भोंग्यांचं राजकारण करीत सरकारची विशेषतः शिवसेना व उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. आता राज्यात सत्ताबदल झालाय. नव्या सरकारसोबत राज ठाकरेंची 'सहानुभूती' आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना ते कोणता 'कार्यक्रम' देतात, याबाबत उत्सुकता आहे. पावसाच्या कारणाने कार्यक्रम स्थगित होत असल्याने तो रस्त्यावरचाच आहे, हे उघड आहे.

राज ठाकरे पुन्हा भोंग्याचा विषय हाती घेतील का, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
तुम्हाला जरा थोड्या तातडीनं कळवतो आहे, अशी सुरुवात करीत राज ठाकरे म्हणतात...आपण वास्तविक उद्या एक मेळावा आयोजित केला होता. ज्यात मला तुमच्याशी बोलायचं होतं आणि कामासंबंधी काही सूचना करायच्या होत्या. परंतु कालपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसानं थैमान घातलेलं दिसत आहे. जनजीवन तर विस्कळीत आहेच, परंतु अशा परिस्थितीत मी उद्या जो कार्यक्रम तुम्हा सर्वांना सांगणार होतो तो सांगितला तरी तो प्रत्यक्षात आणता येणं फार अवघड आहे. अशा परिस्थितीत आपण उद्याचा मेळावा पुढे ढकलत आहोत. पुढची तारीख आणि वेळ लवकरच, थोडा पावसाचा अंदाज घेऊन, तुम्हा सर्वांना कळवली जाईलच.

राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना स्वतःची काळजी घ्यायलाही सांगितलंय आणि शक्य झाल्यास लोकांची मदत करण्याचंही आवाहन केलंय.
तुम्ही स्वतःची तर काळजी घ्याच परंतु अतिवृष्टीमुळे जिथे लोकांना त्रास होतो आहे तिथेही तुम्ही लोकांसाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा. मुख्यतः नदीकाठाला जिथे लोक रहात आहेत तिथल्या घरांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे. सांगली - कोल्हापूरकडचा आत्ता-आत्ताचा पूर तुम्हाला आठवतोय ना? असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना केलाय.

काही लोकांना तात्पुरत्या निवासात हलवायला लागू शकतं. तिथे अन्नधान्य, पिण्याचं शुध्द पाणी, अंथरूण-पांघरूण (सर्वत्र ओल असते) पुरवावं लागेल. मुख्यतः वृध्द, गरोदर महिला, अपंग आणि लहान मुलं ह्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. झाडं उन्मळून पडतात, ती नंतर पुन्हा लावावी लागतील. अशा खूप गोष्टी आहेत, असं राज ठाकरेंनी म्हटलंय.
सरकारला त्रास देऊ नका, अशाही सूचना राज ठाकरेंनी केल्यात. 'अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणा प्रचंड कामात असतात त्यामुळे त्यांच्यावर विनाकारण ताण येईल असं काहीही करू नका', असं आवाहन त्यांनी केलंय.