सया निघाल्या सासुरा


सणासुदीला माहेरी आलेल्या सया सासरी निघायची लगबग करु लागल्या की घरही व्याकुळ होतं. अंगाखांद्यावर खेळलेली पोर पण आता मला निघालं पाहिजे, हा भाव जेव्हा बोलून दाखवते तेव्हा ती खरंच प्रापंचिक झालेली असते. आईचा संस्कार तिच्या मनात ठासून भरलेला असतो. आता सासरहून माहेरी आलेल्या सासुरवाशिणी , पुन्हा एकदा आपल्या सासरी जाण्यासाठी सज्ज झाल्या .

डोळ्यात प्राण आणून माहेरची माणसं सासुरवाशिणीची वाट पाहत असतात. घरातल्या सर्वांचे दाराकडे डोळे लागलेले असतात . दारामागे चप्पल पालथी घातली जाते. असे म्हणतात की घरी येणारा माणूस त्याने लवकर घरी येतो; म्हणून केलेला हा खटाटोप .

तिला पाहिल्यावर तर आवर्जून आईची आणि तिची गळाभेट होते . हळूच आईच्या आणि तिच्याही डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर पडतात . तरीही ती एकमेकांपासून लपवून ठेवली जातात. कितीतरी दिवसांनी असा आईचा स्पर्श तिला मिळालेला असतो. जणू पुन्हा एकदा बालपण आनंदाने समोर उभं राहतं. आईच्या मायेची अशी प्रेमळ ऊब कितीतरी दिवसांनी तिला अनुभवता येते .

ती आल्यावर घरभर आनंदाचं उधाण येतं. मग सुंदर आठवणींना उजाळा मिळतो. गप्पांचा फड रंगतो. भाऊ, भावजयी, आई, वडील भावंडं या सर्वांची सुरुवात होते, ती तिच्या पुढेपुढे करण्यात !

तिला जे आवडतात ते पदार्थ बनवले जातात . तिला आवडणाऱ्या गोष्टी आवर्जून केल्या जातात .

प्रेमळ मैत्रिणींशी खूप खूप गप्पा मारायच्या असतात. मग सुरू होतं ते मैत्रिणींचा तपास करणं. कोण कुठे आहे त्याचं. मैत्रिणींची चौकशी सुरू होते. काही मैत्रिणी भेटतात, तर काही फक्त मनापासून केलेल्या चौकशीतून समोर येतात. सर्वजण आपुलकीने विचारपूस करतात . सर्वांच्या विचारपुशीतून माहेरवाशिणीचं मन भरून येतं. गगन ठेंगणं होतं या प्रेमामुळे !

हा हा म्हणता अखेरीस सासरी जाण्याचा दिवस येतो. आईची आणि तिची पुन्हा एकदा सामान बांधण्याची लगबग सुरू होते. आणलेल्या पेक्षा जरा जास्तच पिशव्या भरल्या जातात.

खरंतर लेकीने आणखीन दोन-चार दिवस थांबावे , असंच आईला वाटत असतं. पण तिचा नाईलाज असतो. लेकीला खूप आग्रहाने थांबवू शकत नाही. लेकीलाही आता सासरची ओढ लागलेली असते. अगं हे भरलं का ? ते भरलं का ? बघ हा विसरशील काही .अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू होते .

माहेरची माणसं सासुरवाशिणीची पाठवणी करण्यासाठी उभी राहतात . किलबिल परिवारही अवतीभोवती जमा होतो. आता पुन्हा लेकीचा दुरावा सहन करावा लागणार , म्हणून आईच्या डोळ्यात पाणी तरळू लागतं .

पण आपली लेक तिथे आनंदात आहे , हे समजून घेऊन त्या अश्रूंचे रूपांतर पुन्हा एकदा आनंदाश्रूमध्ये बदलते. गळाभेट होते. कोणास ठाऊक आता आईच्या मायेची ऊब कधी मिळणार ? असं मनात येऊन लेक आणखीनच आईला बिलगते. दोघींनाही अश्रू अनावर होतात. जणू बालपणीच्या मैत्रिणीच भेटल्या.

आता लेकच आईला समजावून सांगते , "अगं मी खूप खूश आहे तिथे. नको काळजी करू माझी." आईला फार हायसं वाटतं , आणि कळतच नाही कधी मोठी झाली आणि कधी... ती आईची झाली आई हे सुद्धा!

अगदी जाईपर्यंत हात हेच सांगत असतो की पुन्हा लवकर ये गं! नंतर अनेक दिवस तिच्याच आठवणींमध्ये घालवले जातात... डोळे खूप काही सांगू लागतात.

प्रत्येक सासुवाशीणीला हक्काचं माहेर असावं. त्यात तिला स्वतःचं बालपण दिसावं.

नंदा गवांदे

लेखिका शिक्षिका आहेत.

gawandenanda734@gmail.com

MediaBharatNews

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!