कॉम्रेड पानसरेंसारखे विचारांना बांधलेले लोक फिरायला गेले असता दिवसाढवळ्या त्यांना गोळ्या घालून मारले जातं. मात्र त्यांना संरक्षण देण्याच्या संदर्भात कधी विचार केला जात नाही. परंतु अनिल जयसिंघानीसारख्या आंतरराष्ट्रीय बुकीला पोलीस संरक्षण दिलं जातं. आपण त्याला संरक्षण का देता, एका बुकीची सरकारला इतकी काळजी का, याचं उत्तर मिळालं पाहिजे, या शब्दांत विधानपरिषदेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर हल्ला चढवला होता. मात्र, तेव्हा ईडीबीडीचं वारं नव्हतं. आज ८ वर्षांनी त्याच विषयावर मुंडे उदासीन भूमिकेत आहेत.
२०१५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कायदा आणि सुव्यवस्थेवरील चर्चेदरम्यान धनंजय मुंडे कडाडले होते : सभापती महोदय, आम्ही ज्या गुन्हेगाराचे संरक्षण काढले, त्याचा अंडरवर्ल्डशी संबंध होता. अंडरवर्ल्डशी संबंध असलेला अनिल जयसिंघानी हा आंतरराष्ट्रीय कुविख्यात बुकी आहे. आबा राज्याचे गृहमंत्री होते, त्यांनी ही परिस्थिती पाहिल्यानंतर अनिल जयसिंघानीचे संरक्षण काढले, त्याला संरक्षण दिले नाही. मात्र, हे सरकार सत्तेत आल्यानंतर पुन्हा अनिल जयसिंघानीला संरक्षण देण्यात आले. त्याला ते संरक्षण कोणत्या कारणासाठी दिले?

२०१५ मध्ये अनिल जयसिंघानीला संरक्षण दिले गेले, तेव्हा क्रिकेटच्या वर्ल्ड कपच्या मॅचेस सुरू झाल्या होत्या. मुंडेंनी तोही संदर्भ आपल्या भाषणात घेतला होता.
क्रिकेटच्या वर्ल्ड कपच्या मॅचेस सुरू असताना आंतरराष्ट्रीय बुकी गृहखात्याकडे संरक्षण मागतो. तुमच्याकडे त्याच्या आंतरराष्ट्रीय बुकी असल्याच्या नोंदी आहेत. आंतरराष्ट्रीय बुकीला तुम्ही संरक्षण देता? अनिल जयसिंघानी याने असं काय कार्य केलंय की, तुम्हाला त्याला संरक्षण द्यावंसं वाटलं ? असा सवाल धनंजय मुंडेंनी फडणवीस सरकारला केला होता.
अनिल जयसिंघानीला दिलेल्या संरक्षणासंदर्भात भाजपा आमदार नरेंद्र पवार यांनी केलेल्या तक्रारींचा संदर्भही मुंडेंनी पवारांचे नाव न घेता दिला होता.
'मी जबाबदारीपूर्वक सांगतो. विधानसभेतील सत्ताधारी पक्षाचे एक सन्माननीय सदस्य आहेत. ते विधानसभा सभागृहातील सन्माननीय सदस्य असल्यामुळे मी त्यांचे नाव घेत नाही. अनिल जयसिंघानीला संरक्षण मिळाले तेव्हापासून सत्ताधारी पक्षातील सन्माननीय सदस्य माननीय मुख्यमंत्र्यांना त्याचे संरक्षण काढून घ्या असे सांगत आहेत. परंतु, त्याचे संरक्षण काढून घेतले जात नाही. अनिल जयसिंघानीला संरक्षण का दिले याचे उत्तर सभागृहाला मिळाले पाहिजे, असं धनंजय मुंडे सभागृहात म्हणाले होते.

पोलिसांकडून देण्यात आलेल्या संरक्षणाच्या मदतीने अनिल जयसिंघानी इतर छोट्या मोठ्या बुकींवर धाड टाकतो. पोलिसांच्या संरक्षणामुळे त्याने त्यांच्यावर फार मोठी दहशत बसविली आहे, असा आरोप करत मुंडेंनी डीएनए या वर्तमानपत्राचा नाव न घेता हवाला दिला होता.
पाहिजे असेल तर एका इंग्रजी वर्तमानपत्राकडे अनिल जयसिंघानीच्या काही व्हिडिओ क्लिप्स, वॉईस क्लिप्स आहेत, अशी माहितीही मुंडेंनी सभागृहाला दिली होती. असं आपलं कायदा व सुव्यवस्थेचं राज्य आहे, अशी टीका करत मुंडेंनी फडणवीसांकडे असलेल्या गृहविभागाचे वाभाडे काढले होते.
तुमच्याच पक्षातील एका सन्माननीय सदस्य संरक्षण काढून घेण्यासाठी ४ पत्रं देतात. परंतु, जयसिंघानीचे संरक्षण काढून घेतलं जात नाही. पोलिसांच्या संरक्षणामुळे पोलिसांचा ताफा सोबत घेऊन तो इतर बुकींवर धाडी टाकत असल्याच्या व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर फिरत आहेत. आंतरराष्ट्रीय बुकीला पोलिसांकडून संरक्षण देण्यात आलं आहे. पोलिसांची दहशत बुकींवर टाकून तो त्यांचा धंदा बंद करतो आणि त्याच्या व्हिडिओ क्लिप्स करून तोच सोशल मीडियावर टाकत आहे. पोलीस संरक्षण घेऊन त्याची एवढी मजल होत असेल तर राज्यात कायद्याचे राज्य आहे का ? असा सवाल मुंडेंनी केला होता.
आता २ महिने उलटून गेले आहेत. वेळोवेळी संरक्षण काढून घ्या असं सांगितलं गेलं आहे. परंतु संरक्षण काढून घेतले जात नाही. आपण सभागृहात सांगावं की, कोणत्या आधारे त्याला संरक्षण आहे. त्याच्या जीवाला असा काय धोका होता. आपल्याला त्याची एवढी काय काळजी होती की त्याला संरक्षण दिलं आहे ? अशी सवालांची सरबत्ती धनंजय मुंडेंनी केली होती.

देवेंद्र फडणवीस तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते. गृहखातं त्यांच्याकडेच होतं. फडणवीसांचा हिरवा कंदील असल्याशिवाय पोलिस त्यांच्या स्तरावर एका आंतरराष्ट्रीय बुकीला संरक्षण देण्याची सुतराम शक्यता नव्हती. जयसिंघानीची पार्श्वभूमी पोलिसांना माहित नसेल याचीही शक्यता नव्हती. मुंडे खुलेआम आरोप करत होते की त्याचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. तेही पोलिसांना माहित नसतील तर ते फडणवीसांच्या गृहविभागाचं मोठं अपयश होतं.
२०१५ साली विधिमंडळात ज्या गुन्हेगारांच्या कारवायांबाबत चर्चा होते, सरकार सीआयडी चौकशीचं आश्वासन देतं, त्याची मुलगी फडणवीस पुन्हा गृहमंत्री असताना पुन्हा त्यांच्या कुटुंबात शिरते, वावरते, फोटो काढते, विडिओ करते, गृहमंत्र्यांच्या पत्नीला ब्लॅकमेल करते, या गृहमंत्री म्हणून अपयशाच्या पुनरावृत्तीनंतर जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याऐवजी फडणवीस अत्यंत कोडगेपणाने आणि नेहमीच्याच भाजपाई प्रवृत्तीनुसार राजकीय षडयंत्राचा कांगावा करत स्वतःचं अपयश झाकू पाहतात. पदाचा गैरवापर करून पत्नीची व स्वतःची चौकशी टाळून सत्य दडपू पाहतात, यावर रान उठवण्याऐवजी विरोधी पक्षातील नेते सोयिस्कर भूमिका घेतात, ते भाजपा किंवा फडणवीसांशी असलेल्या साटंलोट्यामुळे की चौकश्यांना घाबरून असा प्रश्न आता महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.

राज असरोंडकर
संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ | संपादक, मीडिया भारत न्यूज
mediabharatnews@gmail.com