20 जानेवारी 2022 ! आज बरोबर 22 वर्षे पूर्ण झाली नोकरीला . त्यानिमित्ताने स्वत:शी साधलेला हा संवाद. आजही आठवतोय मला माझ्या मुलाखतीचा दिवस. ताईसोबत शाळेत आले...ताई बाहेर बसली आणि मी सरांच्या ऑफिस मध्ये ," आत येऊ का " ? असं विचारून प्रवेश केला.
जोशी सरांनी मुलाखत घेतली आणि लगेचच जाधव मॅडमने मला पाठ घ्यायला सांगितला. तो मी उत्तम रीतीने घेतला. पाठ ऐकून उद्यापासून तुम्ही रुजू व्हा असं सांगण्यात आलं आणि आमची स्वारी मनातून आनंदून गेली .

स्वकष्टावर मिळवलेली माझी नोकरी. काय आनंद झाला होता म्हणून सांगू ! घरातले वातावरणच बदलून गेले. सर्वच सुखावले. माझ्या नोकरीने मला अनेक गोष्टी शिकवल्या आणि माझ्यातली कळी हळूहळू खुलू लागली .
प्रत्येक काम प्रामाणिकपणे करताना मला समाधान वाटतं. सहकारी शिक्षकांचे सहकार्य , अनेक जिवलग मैत्रीणी , नोकरीच्या पहिल्या दिवसापासून ते आजतागायत मला प्रत्येक गोष्टीत मदत करणारी माझी जिवलग मैत्रीण हर्षा मला शाळेनेच तर दिली. मुलांच्या चेहऱ्यावरचं गोड हसू , मला पाहून आनंदून जाणारे त्यांचे चेहरे पाहिले की आजही कृतकृत्य व्हायला होतं. खरंच खूप भरभरून प्रेम अनुभवलं मी या मुलांकडून !

याच बाईंच्या वर्गात बसायचं आहे , अशी हट्टी मुलंसुद्धा पाहिली . काही सुरवातीला रडकी पण नंतर मात्र तीच हसरी झालेली मुलं पाहिली. आज कुणी इंजिनियर तर कुणी डॉक्टर , तर काही बँकेत नोकरीला आहेत . पण त्यांचे लहानपणीचे गोंडस चेहरे आजही माझ्या लक्षात आहेत .
खूप कामे केली. कधीच कोणत्याही कामाला नकार नाही दिला . त्याचे फळ मला असे मिळाले की बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या . आज एवढा अनुभव पाठीशी आहे की मलाच माझे नवल वाटते. प्रत्येक वेळी नवीन मुलं आणि नवीन अनुभव अनुभवायला मिळाला . तऱ्हेतऱ्हेची मुलं आणि तऱ्हेतऱ्हेचे पालक. खूप विश्वास असतो या मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा आपल्यावर ! आपल्या हातून सुंदर पिढ्या घडवल्या गेल्या, हे काय कमी असतं ?

इतक्या सुंदर कामासाठी आपली नेमणूक झाली, हे खरंच खूप छान झालं आयुष्यात. असाच माझ्यावर सुखाचा वर्षाव होत राहो आणि या अशा गोड विद्यार्थ्यांसोबत माझे शेवटपर्यंत नाते घट्ट आपुलकीचे राहू दे. अशी सुंदर शिल्पे आपल्या हातून सतत घडत राहो, बस एवढीच सदिच्छा ! चाफ्याची फुले सुकल्यावरसुद्धा सुगंध देत राहतात, तसाच माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत कर्माचा सुगंध दरवळत राहू दे .
नंदा गवांदे
लेखिका शिक्षिका आहेत.
gawandenanda734@gmail.com