मराठी सिनेनाट्य क्षेत्रातील आजची आघाडीची बहुचर्चित अभिनेत्री विशाखा सुभेदार हरखून गेल्या आहेत. गगनात मावेनासा आनंद त्या अनुभवता आहेत. काय करू नि काय नको, अशी त्यांची अवस्था झालीय.
विशाखा सुभेदारांना अवघ्या महाराष्ट्राने नावाजलंय. कोणत्याही भूमिकेत अगदी सहजाभिनय करणारी गोड चेहऱ्याची विशाखा घराघरात लोकप्रिय आहे. पण आता तिच्या पाठीवर कौतुकाची थाप पडलीय चक्क भारतरत्न लता मंगेशकर यांची !
लता मंगेशकर 'हास्यजत्रा' हा कार्यक्रम नेहमी पाहतात. त्यांना विशाखा यांचा अभिनय आवडतो. पण ती प्रतिक्रिया प्रभुकुंजपर्यंतच मर्यादित राहिली नाही; तर लता मंगेशकर यांनी ती विशाखा यांना पत्र लिहून कळवलीसुद्धा ! 'काय बोलू... शब्द हरवले आणि डोळे वाहू लागले...' अशी विशाखा यांची पहिली प्रतिक्रिया होती.
घरी एक पार्सल आलं आणि त्यावर एक कार्ड होतं आणि चमचमत्या कागदात गुंडाळून एक " क्षण "आला, जो "सुख "आणि "आनंद "घेऊनच आला ...! त्यावरच नाव वाचलं. आणि दोन सेकंद धस्स झालं काळजात..लता मंगेशकर...! विशाखा सुभेदार यांनी फेसबुकवर आपला अनुभव कथन केलाय.

त्या कायम हास्यजत्रा पाहतात, आणि त्यांना आमचं काम आवडत म्हणून त्यांनी आशीर्वादरुपी भेट पाठवली. त्यांनी केलेलं हे कामाचं कौतुक आणि आवर्जून पाठवलेली भेट. मी ठार झालेय खरंतर... देवा अजून काय हवयं...! ह्यासाठी मी कायम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा "ची आभारी असेन, अशा भावना विशाखा यांनी व्यक्त केल्यात.
आपल्याला घडवल्याबद्दल सचिन गोस्वामी, सचिन मोटे, सोनी मराठी, अमित फाळके, अजय भालवणकर, संपूर्ण जत्रेची टीम यांचे आभार मानतानाच विशाखा यांनी समीर चौगुलेंना उद्देश्यून लिहिलंय की सम्या... तुझ्याशिवाय काहीच शक्य नव्हतं.