चार दिवसानंतर बाहेर गावावरून आलेल्या माईंनी आपली बाग पाहिली. फुलझाडं पूर्णपणे सुकून गेली होती. माईना झाडावेलींच फार वेड. तशा नेहमीच त्या दोन चार दिवसांसाठी बाहेर गेल्या की झाडांचा पहिला बंदोबस्त करून जायच्या. ती सुकून जाऊ नयेत म्हणून खूप काळजी घ्यायच्या. पण ह्या वेळेस नेमके काय झाले ते कळलेच नाही.

इतकी काळजी घेतल्यानंतर ही फुलझाडे कशी सुकली या विचाराने त्या हिरमुसल्या. जिवापाड जपलेली ही फुलझाडं आज अशी सुकून जाताना पाहून माईंना खूप वाईट वाटत होतं. प्रत्येक झाडासोबत यांच्या गोड आठवणी होत्या.
हे अवंतिकाच्या वाढदिवसाच्या दिवशी लावलेलं. हा गुलाब आनंदच्या नोकरीचा पहिला दिवस होता तेव्हा लावलेला. हे फुलझाड मात्र जेव्हा मोहनराव रिटायर झाले तेव्हा त्यांच्या हस्ते लावलेलं. असं प्रत्येक झाडामागे एक गोड गुपित लपलेलं होतं. पण आज मात्र त्यांची अवस्था दयनीय होती.
चार दिवस दुर्लक्ष झाल्यावर झाडांनी असं सुकून जावं. हे माईंना काही पटेना. त्यांनी पुन्हा त्या झाडांना पुनरुज्जीवन देण्याचा जणू चंगच बांधला. माती मोकळी केली. थोडं खतपाणी घातलं. रोज जाऊन त्या झाडांवरून प्रेमाने हात फिरवू लागल्या.
असंच करता करता काही दिवस निघून गेले. गुलाबाच्या झाडांची पानं पार सुकून गेली होती. ती गळून पडू लागली. त्यांना फक्त काड्या राहिल्या होत्या. पण तरीही माई प्रेमाने त्यांच्याजवळ जाऊन त्यांना गोंजारायच्या. त्यांच्याशी हितगुज करायच्या. त्यांना पोटभर पाणी द्यायच्या.

आणखी काही दिवसांनी माई बागेत गेल्या असता, सहजच त्यांनी प्रत्येक झाडाचं नेहमीप्रमाणे निरीक्षण केलं. आज हे दृश्य पाहून माई मनातून एकदम खूष झाल्या. आश्चर्य घडलं होतं. आज पुन्हा पालवी फुटली होती. छोटे छोटे गुलाबी कोवळे कोंब दिसू लागले. माईच्या चेहऱ्यावर एक गोड हास्याची लकेर चमकून गेली.
पुन्हा पालवी फुटली. सुकलेल्या झाडाने सुद्धा पुन्हा तग धरून जिवंत होण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तो सफल झाला. माईच्या हाताला यश आलं. फुटलेली पालवी पाहताना, जीवदान दिल्याचं अहम भाग्यं आपल्याला लाभलेलं आहे असं वाटू लागलं.
माणसांचंही असंच आहे. एखाद्या धक्कादायक प्रसंगाने तो कोलमडून जातो, कोसळतो. असंच माईंसारखा कोणी खतपाणी घालणारं सापडलं, तर त्यालाही पुनरूज्जीवन मिळाल्याशिवाय राहत नाही.
पुन्हा जगण्याची उमेद मिळते. पालवी फुटते. आंतरिक फुलणं महत्वाचं. पुन्हा प्राप्त झालेला जोश काही वेगळाच असतो.

ती फुटलेली पालवी आधी झालेले आघात विसरायला भाग पाडते. झालेल्या चुका सुधारून त्यात आणखी प्राण आणण्याचा प्रयत्न केला जातो. नवजीवन मिळण्याचा आनंद काही औरच असतो. हेच ती कोवळी, गुलाबी पाने वाऱ्यावर डोलताना सांगत असतात. मी पुन्हा आलोय. नव्या दमाने, नव्या उमेदीने.
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक तरी माई हवी उमेद जागवणारी, उभारी देणारी.
हारलेला खेळाडू आयुष्यातून बाद झालेला नसतो. उलट हारल्यानंतरच त्याला आपलं काय करायचं राहिलंय, काय चुकलंय ते कळतं. आपल्यातली उणीव भरून काढण्याची संधी त्याला मिळते.
तुटलेल्या नात्यांनासुध्दा पुन्हा पालवी फुटते ; गैरसमज दूर झाल्यावर. तो होणारा मिलाफ पुन्हा खळखळून हसू लागतो. एकमेकांची साथ किती मोलाची आहे हे दूर गेल्यावर कळतं. त्यामुळेच नाती जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अर्थात याला काही अपवादसुध्दा असतातच.
अंधार आपल्या आतच असतो. प्रकाश मात्र शोधावा लागतो. त्यानेच मन प्रज्वलित होणं गरजेचं असतं. अशावेळी आपल्या आत असणाऱ्या उमेद रुपातल्या माईची मदत घ्यावी. उभारी द्यावी स्वतःच स्वतःला. पुन्हा पालवी फुटण्याचा आनंद घ्यावा स्वतःसाठी, आणि दुसऱ्यांसाठी सुध्दा !!!

नंदा गवांदे
लेखिका शिक्षिका आहेत.
gawandenanda734@gmail.com