कधी भानावर येणार गंगेत डुबक्या मारणारे डेडमेंदू ?

कधी भानावर येणार गंगेत डुबक्या मारणारे डेडमेंदू ?

कधी भानावर येणार गंगेत डुबक्या मारणारे डेडमेंदू ?

समजा तुमच्यासमोर आज एक बातमी आली की भाजपा नेत्याने युवतीवर बलात्कार केला ; तर काही वेळातच तुमच्यासमोर भाजपा नेत्याने बलात्कार केल्याची आठ-दहा वर्षांपूर्वीची बातमी येऊ शकते. सोबत दावा केला जाऊ शकतो की ही बातमी जुनी आहे, पण भाजपाला बदनाम करण्यासाठी मुद्दाम आज पसरवली जातेय.

तुमच्याकडे हे तपासून पाहायला वेळ नसतो की जुनी घटना आणि नव्या घटनेतील आरोपी फिर्यादी वेगवेगळे आहेत. आजची घटना ही आणखी एका भाजपा नेत्याने बलात्कार केल्याची आणखी एक घटना आहे. तुम्ही डोळे झाकून, आजची घटना जुनी असल्याच्या खोट्या दाव्यावर विश्वास ठेवता, कारण भाजपा कथित हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि तुम्ही हिंदू आहात !

तुमचा धर्माभिमान तुम्हाला खरंखोटं तपासू न देता, खोट्यावरच विश्वास ठेवायला भाग पाडतो. याचाच गैरफायदा घेत भाजपा सत्ताधारी नदी किनारी पुरलेल्या मैतांवरची कफनही हिसकावून घेतात, जेणेकरून इथे मयत पुरलंय, हे उघड होऊ नये.

हिंदुंना वेळेवर उपचार न मिळणं, हिंदुंचा ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू ओढवणं, हिंदुंना फुटपाथवर अंत्यसंस्कार करावे लागणं, त्यासाठी अव्वाच्या सव्वा रक्कम मोजावी लागणं, त्यामुळे नदीत आप्तेष्टांचे मृतदेह फेकून द्यावं लागणं, त्यावर कावळ्याकुत्र्यांनी ताव मारणं आणि पुन्हा आता सरकारने पुरलेल्या प्रेतांवरची कफनही काढून घेणं…खरं तर सगळंच संतापजनक ! पण हिंदू पेटून उठत नाही.

ज्यांच्या बाबतीत ही विटंबना घडलीय, त्यांना एकटं पाडलं जातं आणि दूरवरच्या हिंदुंना चाटुकार मिडियातून भासवलं जातं की सगळा मोदी-भाजपाविरोधातला बनाव आहे.

मोदी हे हिंदुंचे तथाकथित मसीहा म्हणून उभे केलेले असल्याने, त्यांची बदनामी होऊ न देणं, त्यांची प्रतिमा जपणं व त्यासाठी टोकाला जाऊन खोटं बोलणं, खोटं पसरवणं हाच जणू संघीभाजपाईंचा हिंदू धर्म, हिंदुत्ववाद आणि हिंदुराष्ट्राचा जाहिरनामा झालाय.

गंगेत वाहणाऱ्या कोविडरुग्णांच्या प्रेतांचा विषय जगभर भारताची छीथू करणारा ठरलाय. विविध माध्यमांनी तो विषय हाताळलाय. गोदीमिडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वृत्तवाहिन्यांनाही तो टाळता आलेला नाही. केंद्र सरकार आणि स्वत: प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनाही त्यावर भाष्य करावं लागलंय. पण सरकारचे तथाकथित हिंदुत्ववादी चमचे मात्र असं काही घडतच नाहीये, सगळ्या जुन्या घटना आहेत, म्हणून दामटवण्यात ताकद लावून आहेत.

पवित्रतेच्या नावाखाली धार्मिक भावनांच्या आड गंगेत प्रेतं ढकलून देणं तसं नवं नाही. कोविडबाधितांची प्रेतं म्हणून सद्यस्थितीत तो विषय अधिक चर्चेत आलाय. असंच पूर्वीचं वृत्तांकन एनडीटीव्ही च्या गार्गी रावत यांनी केलेलं आहे. २०१५ सालचं त्यांचं वृत्तांकन आहे.

तेच वृत्तांकन गार्गी यांच्याच नावावर आजचं म्हणून आधी स्क्रीनशाॅट काढून पसरवण्यात आलं आणि मागाहून त्यांचंच जुनं ट्वीट पुढे करून ‘त्यांना कसं उघडं पाडण्यात आलं’ असा दावा करणाऱ्या ट्वीटचा पाऊस पाडण्यात आला. जेणेकरून, गंगेत वाहणाऱ्या प्रेतांबाबतच्या वर्तमानातल्या सगळ्याच वृत्तांकनांवर संशय निर्माण व्हावा. शिवाय लग्नानंतरच्या अन्सारी आडनावावरून त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून त्यांची हिंदुविरोधी प्रतिमाही आवर्जून पसरवण्यात आली.

संघभाजपा असो की त्यांची सरकारं, सत्याला थेट सामोरं जाण्याऐवजी, खोटंनाटं पसरवणं, लोकांच्या मनात संशय, संभ्रम, गोंधळ निर्माण करणं, त्यांना सत्य पडताळून घ्यायला वावच न देणं, अशा एखाद्या खोटारडेपणात तोंडावर पडताच जनमानसात वादाचा नवीन विषय पेरणं, धर्मद्वेषी मांडणी करत लोकांना सातत्याने असुरक्षित मानसिकतेत ठेवणं हाच फंडा संघभाजपाच्या फेक हिंदुत्ववादाचा आत्मा आहे. मोदी कारकिर्दीत ते ठसठशीतपणे दिसून आलंय.

आश्चर्य वाटतं, मेंदू गहाण ठेवून या फेक हिंदुत्ववादामागे धावणाऱ्या तथाकथित शिकल्या सवरलेल्यांचं ! धर्मद्वेषाने ही मंडळी इतकी ग्रासलीत की देशभरात कोविड मृत्यूने थैमान घातलेलं असतानाच्या काळातही निगरगट्टपणे निवडणुकांच्या प्रचारसभात छछोरपणा करणारं नेतृत्व त्यांना आजही ग्रेट वाटतंय.

धर्मद्वेषाने ज्यांच्या संवेदनाच बधीर झाल्यात, त्यांना माणूस तरी म्हणता येईल का ? कधी भानावर येणारेत हे गंगेत डुबकी मारणारे डेडमेंदू !

 

 

 

 

राज असरोंडकर

संपादक, मिडिया भारत न्यूज | संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!