हत्तींच्या डोळ्यांतील अश्रू कधी दिसणार ?

हत्तींच्या डोळ्यांतील अश्रू कधी दिसणार ?

हत्तींच्या डोळ्यांतील अश्रू कधी दिसणार ?

ज्या देशात हत्तींना गणेशाचे मुर्तीमंत रुप मानले जाते, अशा देशातील लोक हत्तींना होणारा त्रास कसा काय पाहू शकतात? हत्तींच्या डोळ्यातील अश्रु लोकांना दिसत नाहीत का? त्यांच्या पायातून रक्त वाहू लागतं, तेव्हा गणेशाची आराधना करणाऱ्या लोकांच्या मनात कोणते भाव असतात? हे प्रश्न आहेत हत्तींच्या संरक्षणार्थ काम करणा-या संगीता अय्यर यांचे.

आज गणेश चतुर्थी ! देशभरात आज बुद्धीची देवता गणेशाला पुजले जाते, आराधना केली जाते.गणराज म्हणजे हत्तीचे मुर्तीमंत स्वरुप. हिंदू धर्मात कोणत्याही प्रसंगात सर्वात अगोदरचा मान गणपतीला दिला जातो, पण त्याच हिंदू धर्मात जिवंत हत्तींचा वापर हा धार्मिक कार्यात करुन सातत्याने हत्तींचा शारिरीक आणि मानसिक छळ कित्येक वर्षापासून चालत आला आहे. याकडे कोणाचे फारसे लक्ष नाही ; पण केरळमधील एक महिला गेली कित्येक वर्ष हत्तींना धार्मिक कार्यातुन मुक्त करण्यासाठी धडपड करते आहे.

जीवशास्त्र, पर्यावरण शास्त्रातील पदवीधर,पर्यावरण शिक्षणात पदव्युत्तर पदवी असणाऱ्या संगिता अय्यर मुळच्या केरळमधील पल्लकड गावच्या. उच्च शिक्षणासाठी काही काळ कॕनडामध्ये वास्तव्यास होत्या. पर्यावरणाविषयी विशेष आकर्षण असलेल्या संगिता अय्यर यांनी पर्यावरणाच्या संरक्षणाच्या कामासाठी स्वत:ला झोकून दिले आहे.

सुरुवातीच्या काळात लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांना चित्रपट हे माध्यम अधिक सोयीचे वाटले, म्हणून त्यांनी पर्यावरण हा विषय केंद्रस्थानी ठेऊन डाक्यूमेंट्री फिल्म्स बनवल्या. दृश्य,आवाज आणि प्रतिमा यांचा लोकांच्या मनावर खोलवर परिणाम होतो, त्यांचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होते, त्यामुळे आपण फिल्म मेकींगमध्ये उतरल्याचे त्या सांगतात.

२०१३ साली आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीसाठी त्या भारतात परतल्या आणि एका मित्रासोबत फिरता फिरता मंदीराच्या आवारात होणाऱ्या हत्तींची दुर्दशा पाहून त्या पुरत्या हताश झाल्या.साखळदंडाने बांधलेले हत्ती पाहून त्यांच्या मनात हिंदू धर्माबद्दलच काही प्रश्न निर्माण झाले. जगाला अहिंसा, करुणा, प्रेम, सहानुभूती शिकवणा-या तसेच सांगणाऱ्या हिंदू धर्मात प्राण्यांची अशा प्रकारची प्रताडना होताना त्यांना दिसली.

धर्मात घुसलेल्या कर्मकांडामुळे धर्माचे मुळ लोकांना उमगलेच नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्या दिवसापासून धार्मिक कार्यात प्राण्यांच्या वापराविरोधात त्यांनी काम करायचे ठरवले, ते आजतागायत सुरू आहे.

प्राण्यांची अशी प्रताडणा करणे योग्य नसून उलट माणसांनी संवेदनाशील प्राण्यांचे रक्षण करणे हीच नैतिकता असल्याचे त्या वारंवार सांगतात.पर्यावरणातील अनेक प्रजातींचे रक्षण हत्तीच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. त्याच हत्तींना माणसांनी धर्माच्या नावाखाली अत्यंत घृणास्पद आणि त्रासदायक वागणूक द्यावी, याबद्दल त्यांच्या मनात चीड आहे.

त्या दिवसापासून त्यांनी हत्ती विषयी समाजात जनजागृतीचे काम हाती घेतले. त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा चित्रपटाचा आधार घेतला. जगभरातल्या कलावंताच्या मदतीने त्यांनी ‘गॉड्स इन शॅकल्स’ नावाच्या डॉक्युमेंट्री चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटात मंदिरात आणि धार्मिक कार्यात हत्तींच्या होणाऱ्या छळाबद्दल विस्तृत भाष्य केले आहे.

कालांतराने त्यांनी ‘व्हॉईस फॉर एशियन एलिफंट्स सोसायटी’ नावाची स्वयंसेवी संस्था स्थापन केली.ना नफा ना तोटा ह्या तत्वावर काम करणा-या या संस्थेचे काम आज जगभरात पसरलेले आहे. त्या अंतर्गत अनेक प्रकल्प आणि उपक्रम चालू आहेत.

धर्म कार्यांत हत्तींना अनन्यसाधारण महत्व आहे. अनेक मंदिरातील पवित्र उत्सवाच्या दिवशी हत्तींचा वापर केला जातो. भारतात जवळपास २५०० हत्ती माणसांच्या बंधनात आहेत. यातील २०% बंधक हत्ती एकट्या केरळ राज्यात आहेत. सदर सर्व हत्तींवर एकतर मंदिरांचा हक्क आहे अथवा वैयक्तिक मालकांचा.

अय्यर यांच्या मते हत्तींचा व्यापार करणारी एक मोठी लॉबीच आहे. हत्तींची प्रताडणा करुन हजारो लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले जाते. हत्तींना साखळदंडानी बांधणे, जखमा देणे, त्यांना सांस्कृतिक झूली घालणे, मिरवणूकीत मिरवणे,त्यांच्या आजूबाजूला गोंगाट करणे, स्पीकर लावणे,बँण्ड वाजवणे इ.गोष्टींचा एखाद्या संवेदनशील प्राण्यावर काय परिणाम होत असेल, याचा प्रत्येकांने विचार करुन हत्तींप्रती प्रेमभाव दाखवावा अशी त्यांची मागणी आहे.

२०१७ साली संगिता अय्यर यांना नारी शक्ती पुरस्काराने तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.

हे सर्व काम करत असतांना त्यांना अनेक आवाहनांचा सामना करावा लागतो. तथाकथित संस्कृती रक्षकांकडून येणा-या धमक्या पचवून आपले पुढे न्यावे लागते आहे.अहिंसा, करुणा,सहानुभूती, भूतदया शिकवणारा हिंदू धर्म त्यांना अभिप्रेत आहे. प्राण्यांना त्रास देऊन होणाऱ्या कर्मकांडाविरोधातल्या त्या भक्कम आवाज आहेत.

जर आपणही खरे गणपतीचे भक्त असू तर संगिता अय्यर यांच्या सारख्यांच्या पाठीशी ठाम उभं राहणेच गणपतीची सर्वात मोठी पुजा असेल. त्यांचे हाथ बळकट करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, श्री गणेशाचे प्रतिक असणाऱ्या हत्तींना त्रास होणार नाही, अशा कर्मकांडांपासून स्वत:ला व समाजाला दूर ठेवणे हीच खरी गणेश आराधना.

 

 

अंकुश हंबर्डे पाटील

कायद्याने वागा लोकचळवळीचे नांदेड जिल्हा समन्वयक आणि मिडिया भारत न्यूजचे कार्यकारी संपादक


MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!