मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
विष्णूने वामनरुपात बळीराजाला मस्तकावर पाय ठेवून पाताळात ढकलले, ही आख्यायिका शेकडो वर्षांपासून सर्वश्रुत आहे. पण गेल्या काही वर्षांत अनेक संशोधक, अभ्यासकांनी इतिहासाचं तसंच पुराणकथांतील संदर्भांचं पुनर्लेखन करायला सुरुवात केल्यापासून नवनवीन सत्य समोर येत गेलंय. भारतातल्या मातीतले मूळ नायक कसे खलनायक म्हणून रंगवले गेले ते उघड झालंय. त्यातलंच एक व्यक्तिमत्वं बळीराजा ! जगाचा अन्नदाता शेतकऱ्याला बळीराजा म्हटलं जातं, यातच सगळं आलं. या बळीराजाच्या मस्तकावर पाय ठेवून वामन उभा असल्याचं चित्र आता बहुजनांसाठी वेदनादायी ठरतं आहे आणि खोटा इतिहास ठसवू पाहणाऱ्या त्या चित्रावर बंदी घालण्याची मागणी पुढे आली आहे.
प्रभाकर नारकर, प्रा. एस. व्ही. जाधव, प्रदीप ढोबळे, प्रतिमा परदेशी, डाॅ. विवेक कोरडे, राहुल गायकवाड, राज असरोंडकर आदी सामाजिक मान्यवरांनी खुल्या पत्राद्वारे राज्य शासनाकडे बळीराजाचा अवमान करणाऱ्या चित्रावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या मागणीला समाजमाध्यमातून वाढता पाठींबा लाभत आहे. या मागणीसाठी डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या बळीवंश या पुस्तकाचा आधार घेण्यात आला आहे. याशिवाय, प्रा. संजय सोनवणी यांनीही बळीराजाच्या उल्लेखाचे अनेक दाखले देत त्याचा वामनाशी संपर्क आल्याचे संदर्भ मात्र सापडत नाहीत, अशी मांडणी केली आहे.
बळीराजा हा न्यायी, प्रेमळ, समतावादी, लोककल्याणकारी आणि दानशूर राजा होता. त्याला वामनाने मारून त्याचं राज्य हिरावून घेतलं होतं. तरीही, शतकानुशतके बहुजन समाज बळीचं राज्य पुन्हा यावं, अशी आस लावून बसला आहे. बहुजन मायभगिनी तर प्रत्येक दिवाळीला भावाला ओवाळताना, “इडा पीडा टळो आणि बळीचं राज्य येवो” असं म्हणत आल्या आहेत. महाराष्ट्रात शेतकऱ्याला बळीराजा म्हटलं जातं, त्यामुळे या न्यायी आणि प्रजाप्रिय राजाचा अपमान हा इथल्या बहुजन समाजाच्या लोकभावनेचा अपमान आहे. असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
बळीराजा नेमका कोण ? हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष, कपिल या तत्ववेत्त्यांचा वारसा लाभलेला विरोचन पुत्र, प्रल्हादाचा नातू म्हणजे बळीराजा! अनेक पुराणकथांमधील संदर्भ पाहिल्यास बळीराजाचा वारसा स्पष्ट तर होतोच पण त्याचबरोबर बळीराजाचा दैदिप्यमान इतिहासपट आपल्यासमोर येतो.
बळीराजा आपल्या राज्यात होणाऱ्या उत्पन्नाचं आणि संपत्तीचं समान आणि न्यायपूर्वक वाटणी करणारा राजा होता. रामायण आणि महाभारतातही संविभागी राजा म्हणून त्याला संबोधलं गेलं आहे. बळीराजा हा अत्यंत उदार, पराक्रमी, युद्धातून माघार न घेणारा सत्यवक्ता असल्याचे उल्लेख विविध प्राचीन साधनातून आलेले आहेत.
बळीराजाचे विविध पुराणकथांमध्ये आलेलं वर्णन, नोंदी तर आहेतच पण बळीराजाविषयी आपल्याला वस्तुनिष्ठ संदर्भ, मौखिक, लोकसंस्कृती, तसेच काही परंपरा यातून देखील माहिती मिळते. तामिळनाडूमध्ये चेन्नईपासून पन्नास किलोमीटरवर महबलिपुरम नावाचं गाव आहे, इथे पल्लव राजांनी बांधलेली मंदिरं आहेत, शिल्पं आहेत. महाबलिपुरम हे नाव बळीराजाच्या स्मृती म्हणून देण्यात आलं असावं हे स्पष्ट आहे. संत तुकारामांच्या अभंगात देखील बळीराजाचा उल्लेख असून महात्मा फुले यांनी देखील बळीराजावर पोवाडा लिहीत बळीराजाची वेगळ्या पद्धतीने मांडणी केली आहे.
लोकपरंपरा, संस्कृतीमधून देखील आपल्याला बळीराजाचं दर्शन घडतं. केरळमध्ये बळीराजा विषयी प्रचंड प्रेम आढळून येते. सुगीच्या दिवसात बळीराजाच्या पुनरागमन आणि स्मृतीस उजाळा देण्यासाठी तेथे ओणम हा सण साजरा केला जातो. आपल्याकडील दिवाळीप्रमाणेच हा सण असतो. महाराष्ट्रात शेतकऱ्याला बळीराजा संबोधित केलं जातं. भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवळताना ” इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो ” हे वाक्य बोलते, यावरून बळीराजाच्या सुयोग्य प्रशासनावर प्रकाश पडतो.
अशा या सर्वगुणसंपन्न, संविभागी राजाच्या स्मृती बहुजन समाजाच्या मनात जागृत असताना याच काळात बळीराजाच्या मस्तकावर पाय ठेऊन वामन उभा असल्याचं चित्र जाणीवपूर्वक प्रसारित केलं जातं. बहुजन समाजाचा मनोभंग करण्याचा, विशेषतः शेतकरी वर्गाला अपमानित करण्याचा हेतू यामागे असतो. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने बळीराजाचा अवमान करणाऱ्या चित्रावर बंदी घालावी अथवा असं चित्र प्रसिद्ध वा प्रसारीत करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.
बहुजन समाजातील कार्यकर्त्यांनीही जागरूक राहून, असं चित्र प्रसिद्ध करणाऱ्यांच्या विरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करावेत, असं आवाहनही पत्रातून करण्यात आलं आहे.