कवी यशवंत मनोहर, जीवनव्रती पुरस्कार आणि सरस्वती प्रतिमेला नकार !

कवी यशवंत मनोहर, जीवनव्रती पुरस्कार आणि सरस्वती प्रतिमेला नकार !

कवी यशवंत मनोहर, जीवनव्रती पुरस्कार आणि सरस्वती प्रतिमेला नकार !

कवी आणि विचारवंत यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघाने देऊ केलेला जीवनव्रती पुरस्कार नाकारला आहे. संघाच्या ९८ व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना हा पुरस्कार दिला जाणार होता. मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या साहित्यिकांना ग.त्र्यं.माडखोलकर यांच्या नावाने जीवनव्रती पुरस्कार दिला जातो. यावेळी हा पुरस्कार साहित्यिक यशवंत मनोहर यांना देण्याचं जाहिर करण्यात आलं होतं. पण त्यांनी मंचावर सरवस्तीची प्रतिमा ठेवण्यावर आक्षेप घेतला तसंच आपण हा पुरस्कार स्वीकारणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

या संदर्भात यशवंत मनोहर यांनी आपली भूमिका अगदी स्पष्ट शब्दात मांडली आहे.

मराठी साहित्यातील माझी प्रखर इहबुद्धिवादी प्रतिमा लक्षात घेऊन आपण अशा दुरुस्त्या कराल असं वाटलं होतं, पण ते झालं नाही, म्हणून मी नम्रपणे हा पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. असं ते म्हणालेत.

स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांना शिक्षणबंदी आणि ज्ञानबंदी करणा-या शोषणसत्ताकाची प्रतीकं मी पूर्णतः नाकारलीच आहेत. माझा सन्मान म्हणजे जिच्या अनन्यतेमुळे मी ओळखला जातो त्या माझ्या जीवनदृष्टीचा सन्मान ! माझ्या या जीवनदृष्टीत न बसणारे अनेक पुरस्कार मी नाकारले आहेत. हा वाङ्मयीन कार्यक्रम आहे आणि त्यात धर्म येणं मला अजिबात मान्य नाही, म्हणून आपण मला दिलेला जीवनव्रती हा पुरस्कार मी नम्रपणे नाकारण्याचा निर्णय घेतला असल्याचं यशवंत मनोहर यांनी म्हटलंय.

या घटनेने मराठी साहित्य वर्तुळात खळबळ माजली असून समाज माध्यमांतही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. काही साहित्यिकांधा मनोहर यांची भूमिका अगदी योग्य वाटते आहे. त्यांनी त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलंय तर दुसऱ्या बाजूला काही जणांना केवळ सरस्वतीची प्रतिमा असल्याकारणाने पुरस्कार नाकारणे पटलेलं नाही. या सगळ्या घटनेबाबत मिडिया भारत न्यूजने काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत.

मनोहर सरांचा निर्णय हा अगदी योग्य असून मी त्यांचं पूर्णतः समर्थन करते, असं मत डॉ. वंदना महाजन यांनी व्यक्त केलंय.

एकंदरीत यशवंत मनोहर यांच संपूर्ण साहित्य आणि त्या साहित्याची मांडणी यातून अशा प्रकारचा निर्णय स्वाभाविक आहे. पुरस्काराला नकार देण्याची जी कारणे आहेत, त्यात सर्वांत महत्वाचं कारण माझ्या दृष्टीने हे आहे की सरस्वती हे शोषणाच प्रतिक आहे, असं डॉ. महाजन म्हणाल्यात.

मुळात हा संघर्ष हा केवळ साहित्यापुरता मर्यादीत नसून तो एक प्रकारचा सांस्कृतिक संघर्ष आहे. साहित्य हे कायम प्रतिमानिरपेक्ष असायला हवं, कारण साहित्य ही कुण्या एका समुहाची मक्तेदारी नसून येथील बहुविविध संस्कृतीचं सर्वसमावेशक रुप आहे, अशी भूमिका डॉ. वंदना महाजन यांनी मांडलीय.

डॉ. पी विठ्ठल यांनी या विषयावर बोलताना दोन पावलं पुढे जाऊन मागणी केली आहे.

ते यशवंत मनोहर यांच्या विषयी बोलताना म्हणतात, गेल्या पाच दशकांहून अधिक काळ सातत्याने लेखन करणारे डॉ. मनोहर एक प्रतिभासंपन्न कवी आहेत. केवळ कवीच नाहीत, तर समीक्षक, कादंबरीकार आणि दलित साहित्याला आंबेडकरवादाची सैद्धांतिक भूमिका देणारे एक महत्त्वाचे विचारवंत देखील आहेत. विविध विषयावरचा त्यांचा व्यासंग थक्क करणारा आहे.

सुमारे शंभरहून अधिक ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. हे लेखन केवळ भाराभार केलेले लेखन नाही, तर या लेखनामागे त्यांची एक विशिष्ट भूमिका आहे.आंबेडकरी तत्त्वज्ञानाच्या आधारभूत घटकांवर त्यांचे समग्र लेखन उभे आहे. त्यांच्या लेखनाला स्वतःचा आवाज आणि स्वतःची भाषा आहे. मानवमुक्तीच्या मूलभूत स्थित्यंतराचे ते एक डोळस साक्षीदार आहेत. त्यांचं लेखन कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या वर्गवारीत ढकलून बंद करता येत नाही, असं मत डॉ. पी विठ्ठल यांनी मांडलंय.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या मार्च महिन्यामध्ये नाशिक येथे संपन्न होत असल्याची घोषणा साहित्य महामंडळाने नुकतीच केली आहे. संमेलनाध्यक्षपदाचा हा सन्मान डॉ. मनोहर यांना मिळायला हवा, अशी मागणी डॉ. पी विठ्ठल यांनी केलीय.

डॉ. यशवंत मनोहर साहित्य वर्तुळतील मोठ्ठं नाव आहे. विदर्भ साहित्य संघानी जीवनव्रती पुरस्कार त्यांना जाहीर करुन त्यांचा योग्य सन्मानही केला, पण केवळ सरस्वतीची प्रतिमा असल्या कारणाने पुरस्कारच नाकारणे ही यशवंत मनोहरांची कृती निषेधार्ह ठरते, असं नागपूरच्या कवयित्री मनिषा अतुल यांना वाटतं.

साहित्यिक हा समुहाचा प्रतिनिधी असतो मान्य ! प्रत्येकांच्या विचार करण्याच्या पद्धती नक्कीच वेगवेगळ्या असू शकतात, विचारधाराही वेगवेगळ्या असू शकतात ; पण इतरांच्या भावनांचा आणि व्यासपीठाचा आदर करणे हे कुठल्याही जबाबदार व्यक्तीचे कर्तव्य ठरते. डॉ. यशवंत मनोहर यांच्यासारख्या जेष्ठ व्यक्तीने अतिशय जबाबदारीपूर्वक निर्णय घ्यायचे असतात. वाद निर्माण करण्यापेक्षा संपूर्ण समाज बांधून ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. अशा घटनांनी केवळ समाजात दुही निर्माण होते, असं मनिषा अतुल यांनी म्हटलंय.

देवी सरस्वती हे कोणत्या एका धर्माचं प्रतिक नसून ते समस्त भारतीय संस्कृतीचं आणि परंपरेच प्रतिक आहे, त्यामुळे विदर्भ साहित्य संघाने कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रतिमा ठेवली असेल तर यशवंत मनोहर यांनी त्यामागील भावना समजून घ्यायला हवी होती, असं त्या म्हणतात.

साहित्यिक अरूणा सबाणे यांनी म्हटलंय की नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाने यंदाचा जीवनव्रती पुरस्कार डॉ. यशवंत मनोहर सरांनी नाकारल्याचे समजले आणि धक्का बसला. पण त्यांनी साहित्य संघाला जे कळवले ते इतके तार्किक आणि विवेकवादी भूमिकेला धरून आहे त्यांची भूमिका योग्य वाटते.

जी तत्त्वे उराशी घेऊन त्यांनी आयुष्यभर साहित्यक्षेत्रात संघर्ष केला, त्या तत्वांशी प्रतारणा कशी करायची, असा त्यांना पडलेला प्रश्न योग्यच वाटतो. आम्ही त्यांच्या भूमिकेचं स्वागत करतो. साहित्य संस्था ही सार्वजनिक जागा असते, तिथे एका धर्माची प्रतीकं असू नयेत, ही भूमिका कुणाही लोकशाही व विवेकनिष्ठा मानणाऱ्या व्यक्तीला पटणारी अशीच आहे, असं मत सबाणे यांनी व्यक्त केलंय.

 

संकलन : अंकुश हंबर्डे पाटील

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!