मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
मार्च महिन्यापासून कोविड प्रतिबंधात्मक वेगवेगळ्या उपाययोजना करत असताना महाराष्ट्र शासनाने कोविड उपचारांचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समावेश केला व आर्थिक दुर्बलच नव्हे, तर राज्यातील सरसकट सर्वच नागरिकांना कोविडवर मोफत उपचार मिळतील, असा प्रचार करून स्वत:ची पाठ थोपटून घेतली. पण सदर लाभ गंभीर अवस्थेतील कोविड रुग्णांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं असेल तरच मिळेल, असं आता सांगण्यात येत आहे.
ही सरळसरळ महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलाय. महाराष्ट्राशी खोटं बोलल्याबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केली आहे.
राज्यात आज 5537 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 180298 अशी झाली आहे. आज नवीन 2243 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 93154 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 79075 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) July 1, 2020
महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी १ लाख २० हजार कोरोनाबाधित रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार केलेत या दाव्यालाच मनसेने आक्षेप घेतला आहे.
मूळातच महात्मा फुले जन आरोग्य योजना ही कोरोना पेशंट व्हेंटिलेटरवर असेल तरच लागू पडते, असं रुग्णांना हाॅस्पिटलमधून सांगण्यात येतंय महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या हेल्पलाईन क्रमांकावर (१५५३८८/ १८००२३३२२००) संपर्क केल्यास हीच माहिती मिळते.
राज्यातील सर्व जनतेला मोफत उपचाराची सुविधा देणाऱ्या महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत १ लाख २२ हजार कोरोनाबाधीतांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधीतांना मोठा दिलासा मिळाला आहे.
— Rajesh Tope (@rajeshtope11) June 29, 2020
वास्तविक, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २३ मे, २०२० रोजीच्या शासन निर्णयात कोविडवरील उपचार मोफत होतील, असं म्हटलंय. त्यात वेंटिलेटरवरील गंभीर रुग्णांनाच लाभ मिळेल असं कुठेही म्हटलेलं नाही.
वेंटिलेटरची आवश्यकता असलेल्या रुग्णांची संख्या एक ते दोन टक्क्यांच्या वर असण्याची शक्यता नाही. मग महाराष्ट्रात १ लाख ६४ हजार कोरोनाबाधित रुग्ण संख्या असताना १ लाख २० हजार रुग्णांना या योजनेतून कसा लाभ मिळू शकेल, असा प्रश्न मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या २ जुलै २०२० रोजीच्या कोविड-१९ ची सद्यस्थिती दर्शवणाऱ्या दैनंदिन अहवालात एकूण १७४४७५ रुग्णांपैकी २४८४ रुग्ण म्हणजे १ टक्का रुग्ण गंभीर अवस्थेतील होते, असं नमूद आहे.
हीच वेंटिलेटरवरील रुग्णांची संख्या धरली तर जन आरोग्य योजनेखालील लाभार्थ्यांचाही नेमका आकडा मिळतो. मग आरोग्यमंत्र्यांनी १ लाख २० हजारांचा आकडा कुठून आणला की त्यात कोविडेतर रुग्णांचाही समावेश आहे, असा प्रश्न निर्माण होतो.
राजेश टोपे खोटे बोलत आहेत आणि लोकांना उल्लू बनवत आहेत, अशी थेट टीका गजानन काळे यांनी केलीय. त्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी एकतर या १ लाख २० हजार रुग्णांना मोफत उपचार दिल्याचे पुरावे सादर करावेत अथवा महाराष्ट्राची माफी मागून मंत्रीपदावर असताना खोटे बोललो म्हणून राजीनामा द्यावा अशी मागणी मनसेने केली आहे.