कुटुंबासाठी घरातली कामं केल्याने स्त्रियां मोलकरणी ठरतात का?

कुटुंबासाठी घरातली कामं केल्याने स्त्रियां मोलकरणी ठरतात का?

कुटुंबासाठी घरातली कामं केल्याने स्त्रियां मोलकरणी ठरतात का?

जर एखाद्या विवाहित महिलेला निश्चितपणे तिच्या कुटुंबासाठी घरातील कामे करायला सांगितली तर ती मोलकरणीसारखी आहे, असे म्हणता येणार नाही. जर तिची घरातील कामे करायची इच्छा नसेल, तर तिने हे लग्नाआधी सांगायला हवे, जेणेकरून वधू-वर स्वतःच लग्नाबद्दल पुनर्विचार करू शकतील किंवा लग्नानंतर असं घडलं असेल तर अशा समस्येचं वेळेतच निराकरण केलं पाहिजे. ही टीपणी केलीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने !

कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल झालेल्या एका प्रकरणात सासरच्या मंडळींनी गुन्हा रद्द होण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठाने सदरचा गुन्हा रद्द ठरवलाय.

तिच्या स्वत: च्या एफआयआरनुसार, ज्याला नंतर तिचे पालक आणि इतर नातेवाईकांनी स्टिरियोटाइप पद्धतीने समर्थन दिले होते की तिला सुमारे एक महिना योग्य वागणूक देण्यात आली होती, त्यानंतर असे मोघमपणे म्हटलं आहे की तिला एका मोलकरणीप्रमाणे वागवले गेले. मात्र, तिने तपशील दिलेला नाही. असं निरीक्षण न्यायालयाच्या निकालात वाचायला मिळतं.

जर एखाद्या विवाहित महिलेला कुटुंबाच्या उद्देशाने घरातील कामे निश्चितपणे करायला सांगितली तर ती मोलकरणीसारखी आहे असे म्हणता येणार नाही, असं नमूद करून न्यायालय म्हणतं की जर तिची घरातील कामे करायची इच्छा नसेल, तर तिने हे लग्नाआधी सांगायला हवे होते जेणेकरून वधू-वर स्वतःच लग्नाबद्दल पुनर्विचार करू शकतील किंवा लग्नानंतर असेल तर अशा समस्येचे निराकरण केले पाहिजे.

शिवाय, तिच्या लग्नाच्या घरी भांडी धुणे, कपडे धुणे, झाडू देणे इत्यादी कामे, जी सामान्यतः मोलकरणीला दिली जातात, करण्यासाठी मोलकरीण होती का, या मुद्द्यावरही तिचा एफआयआर मौन आहे, याकडेही न्यायालयाने लक्ष वेधलंय.

पाहुयात काय उमटलीय सदर निकालाबाबत प्रतिक्रिया ?

कल्याणात राहणाऱ्या उद्योजक शिल्पा वाडकर यांना न्यायालयाने दिलेला निकाल योग्य वाटतो, तर सामाजिक कार्यकर्ता कविता थोरात यांनी निकाल पितृसत्तेस पूरक असल्याचं म्हटलंय.

घरकाम बाईच्या नावावर प्रॉपर्टीसारखं लिहिलंय. घरकामापेक्षा स्वावलंबन जास्त महत्वाचं ! या देशातल्या ८०% अंदाजे स्वतः च्या घरात घरकाम करणाऱ्या बायका परावलंबी आहेत. त्यात न्यायालय असा निर्णय देत असेल तर हे निराशाजनक आहे, असं मत कविता थोरात यांनी मांडलंय.

पितृसत्ताकता आहे हे वास्तव आहे. लग्न करून मुली सासरी जातात म्हणजे पितृसत्ताकता आहेच. पण बाईने स्वत:चं घर घेऊ नये अथवा लग्नानंतर नोकरी सोडून घरात बसावं, असे काही नियम नाहीत. त्यामुळे शिकूनही मी पैसे कमावणार नाही, नोकरी करणार नाही आणि घरकामही करणार नाही, अशा विन-विन परिस्थितीची अपेक्षा बायकांनी करू नये. आपण मोलकरीण व्हायचं की नाही, हा आपला निर्णय असतो. बाई म्हणून आपल्याला समान हक्क हवेत की priveleges हे एकदा नक्की करावं शिकलेल्या मुलींनी, अशी प्रतिक्रिया कवयित्री योगिनी राऊळ यांनी दिलीय.

खरं तर नोकरी व्यवसाय न करणाऱ्या मुलींशी आता मुलांनी लग्नच करू नयेत. तुझं पोट तू भरायचं, माझं मी, मुलं झाली तर दोघांची जबाबदारी, इतकी स्पष्ट भूमिका घेतली तर मुली शिक्षणाकडे गांभीर्याने बघतील. हक्क हवेत आणि कर्तव्य नकोत, असं चालणार नाही, हे मुलींनाही कळलं पाहिजे, असंही योगिनी राऊळ म्हणतात.

योगिनी राऊळ यांचा सविस्तर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा

योगिनी राऊळ यांच्याशी कवयित्री वृषाली विनायक यांनीही सहमती दर्शवलीय. त्या म्हणतात, नोकरी पण करावी आणि घरचं पण बघावं ही अवाजवी अपेक्षा आजही आहे. गरज आहे स्पष्ट भूमिकेची. पुरुषसत्ताकतेची जळमटं काढायची असतील तर बाईनेच ठाम राहायला हवं.

म्हणजे आता घरकाम फक्त बाईनेच करावं अन तिनेच ते काम करावं, यासाठी वाट्टेल तो त्रास जरी दिला तरी आपलं कुणीच काही करू शकत नाही असा पितृसत्तेला मजबूत करणारा निकाल आहे, असं मत सामाजिक कार्यकर्ता सत्यभामा सौंदरमल यांनी नोंदवलंय. मोलकरीणीशी  तुलना याबाबत मतं येऊ शकतात, पण घरकाम बाईचंच अशा अविर्भावात पुरुष आता बोलू शकतात, अशी भीती सौंदरमल यांनी व्यक्त केलीय.

बाईने घरकाम करणं याला अनेक कंगोरे आहेत खरंतर. कित्येकदा मुक्याचा मारसुद्धा मानसिक छळास कारणीभूत होतो. यातून पुन्हा विभक्त कुटुंब की एकत्रित कुटुंब या गोष्टीसुद्धा वादास कारणीभूत ठरू शकतात.  काही गोष्टींच्या बाबतीत खरोखर ठाम भूमिका घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, अशी मांडणी इंटिरिअर डिझायनर संध्या लगड यांनी केलीय.

 

 


MediaBharatNews

Related Posts
comments

Comments are closed.

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!