कला संचालक राजीव मिश्रांची पाठराखण कोण करतंय ?

कला संचालक राजीव मिश्रांची पाठराखण कोण करतंय ?

कला संचालक राजीव मिश्रांची पाठराखण कोण करतंय ?

जेजे वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य राजीव मिश्रा महाराष्ट्र राज्याचे कला संचालक आहेत. अर्थात, त्यांचा कार्यभार प्रभारी आहे. हा प्रभारी कार्यभार मिश्रांच्या हाती येऊन पाच वर्ष उलटलीत. कदाचित अजून किती वर्ष उलटतील, याची शाश्वती नाही. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने कला संचालकाचं पद भरेपर्यंत मिश्राच कलासंचालक असणार आहेत. हा अलिखित करार नाही, तर तत्कालीन फडणवीस सरकारने तसा रीतसर आदेशच काढला आहे.

राजीव मिश्रा हे नाव अलिकडे पुन्हा चर्चेत आलंय. महाराष्ट्रातील शासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित कला महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मिश्रा यांना कलासंचालक पदावरून हटविण्याची मागणी लावून धरलीय. मागणी पूर्ण होईपर्यंत शासनाच्या उदासीनतेविरोधात काळ्या फिती लावून काम करत राहण्याचा निर्धार महाकॅटना या राज्यव्यापी संघटनेने केलाय. मिश्रा यांच्या कार्यपद्धतीबद्दल संघटनेच्या खूप साऱ्या तक्रारी आहेत. त्या सर्वांचं सारं हे आहे की मिश्रांनी राज्यातली कलामहाविद्यालयं बंद पाडायला घेतलीत.

राज्यात चित्रकला आणि शिल्पकलेतील पदवी / पदविकांचा अभ्यासक्रम शिकवणारी १७२ महाविद्यालयं आहेत. कला संचालनालय १९६५ ला अस्तित्वात आल्यानंतर ही महाविद्यालयं आता संचालनालयाच्या अखत्यारित आहेत.

“संपूर्ण भारतात, महाराष्ट्र हे एकमेव असं राज्य आहे, जिथे स्वतंत्र कला संचालनालय आहे. २००३ पूर्वी जे जे म्हणून कलासंचालकपदी आले ते एकतर चित्रकला किंवा शिल्पकलेशी निगडीत होते. कलासंचालनालयाच्या स्थापनेचा मूळ उद्देश्यच चित्रकला/शिल्पकला जोपासणं आहे. पण २००३ नंतर वास्तुकलेशी संबंधित व्यक्ति कलासंचालक पदावर येण्यास सुरूवात झाली आणि या संचालनालयाला उतरती कळा लागली”, असं महाकॅटनाचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी ‘मिडिया भारत न्यूज‘ला सांगितलं.

बाळासाहेब पाटील सदरबाबत सातत्याने लिखाण करत असतात. त्याचवरून, कलासंचालक राजीव मिश्रा यांनी पाटील यांना संपर्क साधून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. महाकॅटनाविरोधातही मिश्रांनी आक्षेपार्ह विधानं केल्याचा आरोप आहे. ही बाब पसरली आणि राज्यभरातील कलामहाविद्यालयांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मिश्रांविरोधात एकवटले.

हे जरी ताजं निमित्त असलं व मिश्रांविरोधात कला महाविद्यालयांच्या तक्रारी असल्या तरी, पाच वर्षाहून अधिक काळ मिश्रा कलासंचालक पदावर कोणत्या पाठबळावर टिकून राहू शकले, हा मुख्य कळीचा मुद्दा अनुत्तरितच राहतो. जेजेत प्राचार्य असलेल्या मिश्रांना मागच्या सरकारातील शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी कलासंचालक पदावर आणलं. तो कार्यभार प्रभारी होता. प्रभारी कार्यभार किती काळ असावा, याबाबत स्पष्ट शासन निर्देश आहेत. ते पायदळी तुडवून मिश्रांना सरकार मुदतवाढ देत राहिलं. २०१७ च्या आदेशाने तर कहर केलाय.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या २० जुलै २०१७ च्या आदेशानुसार, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून उमेदवार प्राप्त होईपर्यंत राजीव मिश्रा यांच्याकडे कला संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात येत आहे, असं हा अनाकलनीय आदेश म्हणतो. राजकीय वरदहस्त असल्याशिवाय असा चौकट मोडून प्रशासकीय आदेश निघू शकतो, हा प्रश्न इथे उपस्थित होतो.

त्याहीपेक्षा गेल्या वर्षात लोकसेवा आयोगाकडून कलासंचालक हे पद का भरलं गेलं नाही, हे मोठं गौडबंगाल आहे. ज्या व्यक्तिकडे पद भरेपर्यंत कार्यभाराचा आदेश आहे, तीच व्यक्ति ते पद भरू देईल का, इतका साधा प्रश्न सरकार चालणाऱ्यांना पडू नये की पद न भरण्यासाठीच तसा आदेश काढण्यात आलाय, यांची चौकशी होणं गरजेचं आहे. पण चौकशी करणार कोण ?

नव्याने आलेल्या महाविकास आघाडी सरकारातही राजीव मिश्रा आपले हितसंबंध जपून आहेत. राजकीय पक्षांकडे जसा एकत्र येण्यासाठी एक किमान सामाईक कार्यक्रम असतो, तसे मंत्रालयात उच्चपदस्थ अधिकारी असतात. सगळ्या सरकारात ते आपलं वर्चस्व राखून असतात. राजीव मिश्रा त्या रांगेत जाऊन बसलेत.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेजेचे कला पदविकाधारक आहेत. स्वत: कलाकार, कलारसिक आहेत. संपूर्ण भारतात एकमेव कला संचालनालय महाराष्ट्राने का स्थापन केलं होतं, त्यामागचा उद्देश ते तरी समजून घेतील, अशी कलाविद्यालयांना अपेक्षा होती. पण चित्रकला/शिल्पकला संवर्धनासाठी स्थापित संचालनालयाच्या कार्यभार वास्तुशास्त्रातील व्यक्तिकडे का असावा, हा प्रश्न अद्याप मुख्यमंत्र्यांनाही पडलेला नाही !

कला संचालक राजीव मिश्रा यांनी आपल्याला होत असलेला विरोध गैरसमजातून होत असल्याचं मिडिया भारत न्यूज ला सांगितलं. ते म्हणाले की कला महाविद्यालयांचा कोणत्याही कामासाठीचा थेट संपर्क निरीक्षकांशी येतो. माझ्यावर त्यांचा काय रोष आहे कळायला मार्ग नाही. गेली अनेक वर्ष कला महाविद्यालयांमध्ये ज्या अनियमितता सुरू आहेत, त्यांना रोखल्याचा राग असू शकतो. कोविड संकटकाळात शिक्षण बंद असल्याने शैक्षणिक संस्थांची आर्थिक कोंडी झालीय. त्यातून मार्ग निघत नसल्यानेही लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केलं जातं असल्याची शक्यता मिश्रा यांनी व्यक्त केली.

वास्तुकला ही सर्व कलांची आई समजली जाते, असं वक्तव्य करून कला संचालक कलाशाखेतील नसल्याचा आंदोलकांचा आरोप अज्ञानातून असल्याची टीका मिश्रा यांनी केलीय.

कला संचालकाचं पद भरण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, लोकसेवा आयोगाने त्यासाठी प्रक्रिया राबवली होती, उमेदवार आले होते, मुलाखतीही झाल्या, पण आयोगाने कोणाचीही निवड केली नाही, अशी माहिती त्यांनी दिली. आपण कोणाचाही राजकीय प्रभाव वापरलेला किंवा वापरत नाही, असंही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. सद्याच्या वादविवादाबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपल्याकडे विचारणा केल्याचं मान्य करून, आपण जी जशी सत्यस्थिती आहे, ती त्यांच्याकडे मांडली असल्याचं मिश्रा यांनी सांगितलं.

 

 

राज असरोंडकर

कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक तथा मिडिया भारत न्यूज चे संपादक


मिडिया भारत न्यूज च्या फेसबुक पेजला भेट देण्यासाठी इथे टिचकी मारा : http://facebook.com/mediabharatnews/

मिडिया भारत न्यूज चं सकाळचं बातमीपत्र मुडमाॅर्निंग दुनिया  ऐकण्यासाठी क्लिक करा :


MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!