आ नंदीबैल मुझे मार ! आवाज कुणाचा? प्रदुषणाचा !!

आ नंदीबैल मुझे मार ! आवाज कुणाचा? प्रदुषणाचा !!

आ नंदीबैल मुझे मार ! आवाज कुणाचा? प्रदुषणाचा !!

कायद्याने वागा लोकचळवळीचं एक ठाम मत आहे. समस्येचं मूळ कधीही समस्येचं निवारण होऊ शकत नाही. समस्येला समस्येने उत्तर देण्यासारखा दुसरा मूर्खपणा नसतो. पण राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते मोठ्या अभिमानाने हा मूर्खपणा करीत असतात. आपापल्या पक्षांचे समर्थक म्हणून नागरिक तो मूर्खपणाही डोक्यावर घेऊन नाचत असतात.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मशिदीवरील भोंग्यांचा विषय लावून धरलाय. त्यावरून महाराष्ट्राचं सामाजिक, राजकीय, धार्मिक वातावरण तापवण्याचेही प्रयत्न सुरू आहे. राज ठाकरेंनी ३ मे पर्यंतची मुदत दिलीय.

३ मेला अक्षय तृतीयेचा बहाणा करून मनसे महाराष्ट्रभर महाआरती करणार आहे. ती सफल होण्यासाठी भारतीय जनता पार्टीसुद्धा हातभार लावेल, यावर कुणी शंका घेण्याचं काही कारण नाही. ते एक उघड गुपित आहे.

३ मे पूर्वी मशिदीवरचे भोंगे नाही उतरवले, तर मशिदीसमोर हनुमान चालिसा होणार आहे.

राज्य सरकार मार्गदर्शक सूचना जारी करण्याच्या पवित्र्यात आहे. ध्वनी प्रदुषण प्रतिबंधक कायदा व विविध न्यायालयांच्या आदेशांचे त्याला संदर्भ असतील. ज्यांना परवानगी नाही, ते भोंगे उतरवणे किंवा भोंग्यांना ध्वनीमर्यादेच्या अटीसहित परवानगी देणे असा पर्याय सरकारपुढे असेल. सरकार बहुधा दुसरा पर्याय निवडेल, अशी शक्यता आहे.

मशिदींवरून ध्वनीमर्यादेची अट पाळली गेली तरी विषय संपणार नाही...कारण विषय तापवणाऱ्यांचा मुद्दा राजकीय आहे. त्याला ध्वनीप्रदुषणाचा केवळ टेकू आहे. आवाज कमी केला तरी दिवसांतून आम्ही कितीवेळा, का ऐकायचं हा मुद्दा पुढे केला जाईल. त्यामुळे रीतसर कायदेशीर परवानगी दिली गेली आणि आवाजाची पातळीही कमी झाली तरी हनुमान चालिसा होणारच !

महाविकास आघाडीपेक्षाही शिवसेनेला अडचणीत आणण्याची नामी संधी मनसे-भाजपा सोडेल असं वाटत नाही.

राज्यात भाजपाकडून भोंग्यांचं वाटप होतंय. भोंग्यांची विक्री वाढलीय. त्यामुळे एकंदरीत पूर्वनियोजन दूरगामी आहे. महाराष्ट्राबाहेर मशिदींसमोर जो धिंगाणा झालाय तो भाजपाला महाराष्ट्रातही घडवायचाय. आंदोलन मनसेचं असेल आणि धिंगाणा भाजपाने आंदोलनात घुसवलेले भाजपाई हिंदू करतील ! ताणतणाव झालाच, वाढलाच तर तो शिवसेना विरूद्ध मनसे असा दिसेल. भाजपा त्यात हात धुवून घेईल.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची अधिकाधिक कडवट प्रतिमा भाजपा आयटी सेलकडून बनवली / ठसवली जाईल. बिहार-उप्र, गुजराती, जैनांचा पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपाला मराठी मतांमध्ये फूट पाडण्यासाठी मनसे सोबत हवी आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक संपताच भाजपा राज ठाकरेंची भगवी शाल पुन्हा हिसकावून घेईल आणि मनसेला मराठीपुरतं मर्यादित ठेवेल.

मशिदीवरचं भोंग्याचं राजकारण तोवर निवळलेलं असेल. आंदोलनासाठी विकत घेतलेले, मोफत वितरण केलेले भोंगे मंदिरांवर विराजमान होतील. मशिदीवरून होणारा आवाज सुरू राहणं राजकीयदृष्ट्या हितसंबंधितांसाठी आवश्यक असल्याने सगळ्या बाजूंनी या धर्माचे, त्या धर्माचे भोंगेच भोंगे वाजू लागतील.

अजानच्या त्रासात प्रार्थना-आरत्यांच्या आवाजाची भर पडेल. तो आवाज मर्यादेच्या पलिकडचा असेल. तक्रार केली तरी ऐकणारं, कारवाई करणारं कोणी नसेल. धमकावणारे मात्र वाढतील ! ध्वनीप्रदुषण लोकमान्य झालेलं असेल !

तसाही देश दैनंदिन प्रश्न, समस्यांवर ऐकण्याच्या पलिकडे गेलाय. पण वर्तमान परिस्थितीत मुसलमानांविरोधात बोलणं, तक्रार करणं किती सोपं आहे आणि हिंदुत्ववाद्यांविरोधात जाणं किती जीवघेणं आहे, हे सर्वसामान्य नागरिकांना तेव्हा कळेल. पण खूप उशीर झालेला असेल.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!