आदित्य शिरोडकरांची मनसेतून ‘एक्झीट’ कुणाच्या ‘एन्ट्री’मुळे ?

आदित्य शिरोडकरांची मनसेतून ‘एक्झीट’ कुणाच्या ‘एन्ट्री’मुळे ?

आदित्य शिरोडकरांची मनसेतून ‘एक्झीट’ कुणाच्या ‘एन्ट्री’मुळे ?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष तसंच पक्षाचे सरचिटणीस आदित्य शिरोडकर यांचा शिवसेना प्रवेश मनसेला मोठा धक्का असल्याचं बोललं जात असलं तरीही आदित्य शिरोडकर यांची मनसे अंतर्गत घुसमट आणि नाराजी गेल्या तीन-चार वर्षांपासून सुरू असल्याची माहिती पुढे येते आहे. राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे याची मनसेमधील एन्ट्री आदित्य शिरोडकर यांच्या एक्झिटला कारणीभूत असल्याचं सूत्रं सांगतात. येत्या काळात त्यांच्याकडून मनविसे अध्यक्षपद काढून घेतलं जाण्याची शक्यता होती, असं सूत्रं सांगतायंत. त्याआधीच, आदित्य शिरोडकरांनी पक्षांतर केलं. आता ही जबाबदारी नवी मुंबईच्या गजाजन काळे यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आदित्य शिरोडकर मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व पक्षाचे सरचिटणीस असले तरीही एक प्रकारे ते बिनखात्याचे मंत्री होते, त्यांच्याकडे कोणतेही विशेषाधिकार नव्हते. त्यातच अमित ठाकरे यांचा मनसेतला हस्तक्षेप वाढू लागल्यानंतर आदित्य शिरोडकर यांना काही काम उरलं नव्हतं. ते केवळ नावाला मनविसे अध्यक्ष म्हणून उरले होते. अर्थात, ही अवस्था मनसेतील अनेक नेत्यांची झालीय.

मनसे कार्यकर्त्यांचं म्हणणं वेगळं आहे. ते म्हणतात की आदित्य शिरोडकर संघटनेत काहीही लक्ष घालत नव्हते. ते कार्यकर्त्यांनी कार्यक्रमांना बोलावलं तरी वेळ देत नव्हते. अलिकडच्या काळात विद्यार्थ्यांचे प्रश्न, शैक्षणिक विषय मांडायचं काम मनविसे उपाध्यक्ष चेतन पेडणेकरच करत होते.

पण चेतन पेडणेकर म्हणतात की आदित्य शिरोडकर यांनी मोकळीक दिल्यामुळेच मी काम करू शकत होतो. ते नाराज आहेत, अशी काहीही चिन्हं नव्हती. शिवाय, त्यांचे मनसेतील स्थान केवळ राजकीय नव्हतं; तर राज ठाकरेंशी त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे शिरोडकरांचं पक्ष सोडणं आमच्यासाठी आकस्मिक धक्का आहे.

मनसे कार्यकर्ते असंही सांगतात की मनसेतून शिवसेनेत गेलेल्यांना काहीही किंमत नाही, असं आदित्य शिरोडकरच सांगायचे. त्यासाठी ते श्वेता परुळेकर, शिल्पा सरपोतदार, हाजी अराफत शेख अशी अनेक उदाहरणं द्यायचे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वाजतगाजत घोषित केलेल्या शॅडो कॅबिनेटमध्येसुद्धा आदित्य शिरोडकर यांचा समावेश होता; परंतु पद असलं तरी पक्षाचं ध्येयधोरण काय, विचारधारा काय, राजकीय दिशा काय, याबाबत सुनिश्चितता नसल्यामुळे मनसेत एक प्रकारे मरगळ आलेली असल्याने या जबाबदाऱ्या निरर्थक होत्या. मध्यंतरीच्या काळात महिला, विद्यार्थी, कामगार अशा आघाड्या बरखास्त करून त्यांची नव्याने पुनर्रचना सुद्धा करण्यात आली होती. तरीही संघटनेच्या कामाला वेग आला नव्हता. पण या उलथापालथीत अनेक जण नाराज झाले.

मनसे कार्यकर्त्यांची मोठी तक्रार ही आहे की पक्षात कोणतेही प्रोटोकॉल नाहीत. कोणीही उठतं नि वर जाऊन पदं आणतं आणि आधीच्या पदाधिकाऱ्यांना डावलून चमकेशगिरी करू लागतं. थोडक्यात, संघटना म्हणून सुंदोपसुंदी आहे.

नाही म्हणायला, स्थानिक पातळीवर काही पदाधिकारी अनेक कार्यक्रम, उपक्रम राबवत, आंदोलनं करत पक्षाचं अस्तित्व टिकवून ठेवण्याची धडपड करताना दिसतात ; पण व्यापक जनसमर्थन मिळवण्यात मनसे कमजोर पडतेय, हे स्पष्ट दिसतंय.

मराठी अस्मितेवरून हिंदुत्वावर मारलेली उडीसुद्धा मनसेला संजीवनी देऊ शकलेली नाही. मूळात, मनसेने आपलं पक्षीय महाअधिवेशनच १३ वर्षांनंतर घेतलं. त्यात, हिंदुत्वाचा अंगिकार केला, झेंडा बदलला आणि अमित ठाकरेंना नेता घोषित केलं.

भारतीय जनता पार्टीबाबत मनसेचं कोणतेही ठोस धोरण नाही ; ईडीने राज ठाकरेंची चौकशी सुरू केली होती, त्यावेळी त्यांचे निकटवर्तीय व बांधकाम व्यावसायिक व आदित्य शिरोडकर यांचे वडिल राजन शिरोडकर यांचीही चौकशी झाली होती. ईडी चौकशीनंतर राज ठाकरेंनी भाजपाबाबत तलवार म्यान केल्याचं चित्र असून, मनसे पदाधिकाऱ्यांनी त्याऐवजी शिवसेनेला लक्ष्य केल्याचं दिसतंय.

महाराष्ट्रातील राजकारणात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या निमित्ताने प्रबळ राजकीय पर्याय उभा राहिलाय. केंद्राच्या जोरावर महाराष्ट्रात भाजपाने महाविकास आघाडीला जेरीस आणण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले खरे, परंतु त्याला तूर्त तरी राज्य सरकार पुरून उरलं असल्याचं चित्र आहे.

महाराष्ट्रातील या राजकीय संघर्षात मनसे बाजूला पडली आहे. देशातील व राज्यातील अनेक प्रश्नांवर रान उठवण्याची संधी मनसेकडे होती ; परंतु महत्त्वाच्या कित्येक प्रश्नांवर राज ठाकरे यांनी पाळलेलं संशयास्पद मौन मनसेच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारं ठरलं आहे. राज ठाकरे वगळता जनतेवर प्रभाव पाडेल, असं नेतृत्व मनसेत उरलेलं नाही. नेता म्हणून जे वावरतात, त्यांना आपापल्या मर्यादा आहेत. सद्या तर संघटनात्मक सगळी सूत्रं अमित ठाकरेंकडे आहेत.

राज ठाकरेंवरच्या वैयक्तिक प्रेमापोटी कार्यकर्ते मनसेत तग धरून आहेत ; पण सत्तेशी दिशाहीन संघर्ष किती काळ करायचा, हे एक मोठं प्रश्नचिन्ह मनसे कार्यकर्त्यांसमोर उभं आहे.

अलिकडेच मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष आणि डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानावर शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याच काळात मनसेच्या विधानसभा उमेदवार ज्युईली शेंडे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला होता. नाशिकचे पहिले महापौर ॲड. यतीन वाघ, जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे, मनविसे मुंबई विद्यापीठ अध्यक्ष ॲड. संतोष धोत्रे, खेडचे माजी उपनगराध्यक्ष किशोर चिखले अशी मनसेतून शिवसेनेत गेलेल्यांची मोठी यादी आहे. शिवसेनेकडे राज्याचं मुख्यमंत्रीपद आल्यानंतर हा ओघ वाढला आहे. या स्थितीत, आदित्य शिरोडकरांचं मनसे सोडून शिवबंधन हातावर बांधून घेणं मनसेसाठी धोक्याची घंटा आहे.

त्यातच, अमित ठाकरेंचा मनसेतील हस्तक्षेप वाढतो आहे. गेला काही काळ, आदित्य शिरोडकर यांच्यासारखे नेते रिकामे बसून होते. शॅडो कॅबिनेटसारखे प्रयोग राज ठाकरेंनी केले खरे, पण त्यांचं मूर्त रुप लोकांसमोर येऊ शकलेलं नाही. तिथे आदित्य शिरोडकर यांच्याकडे उच्च शिक्षण खातं असलं काय नि नसलं काय, काही फरक पडत नव्हता. पक्षाच्या अधिवेशन तयारीच्या एका बैठकीत बाळा नांदगावकर आणि आदित्य शिरोडकर यांच्यात वाद झाला होता, अशीही चर्चा आहे.

आदित्य शिरोडकर यांच्या पक्षांतराची कारणं जशी वैयक्तिक दिसतात, तशीच ती एकंदरीत राजकीय व्यवहाराचीसुद्धा आहेत. भविष्यात वाव काय, या राजकारणातल्या मोठ्या प्रश्नाला आजतरी मनसेत उत्तर नाही. प्रभावी वक्तृत्व शैली आणि लोकप्रियता लाभलेला राज ठाकरेंचा करिष्माही मनसेला सफल राजकीय फलित मिळवून देऊ शकलेला नाही, ते काम अमित ठाकरेंना जमेल का, हे येणारा काळच ठरवेल. ज्यांना जायचं त्यांना जाऊदेत, असं म्हणत एखाद्या सभेत कार्यकर्त्यांच्या टाळ्या घेता येतील, पण त्याने गळतीवर इलाज होणार नाही.

 

 

 

 

राज असरोंडकर

संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ | संपादक,  मिडिया भारत न्यूज

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!