मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
आदिवासी समाज म्हटला की शहरी लोकांच्या डोळ्यासमोर ग्रामीण अशिक्षित अज्ञानी माणसं येतात. पण शहरी लोकांच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक आदिवासी समाज सजग आहे आणि म्हणूनच तो कोविडसारख्या जागतिक संसर्गापासूनही दूर आहे. आदिवासीबहुल गडचिरोली जिल्हयाचं उदाहरण त्यासाठी देता येईल. सभोवतालच्या निसर्गाचं संरक्षक कवच आदिवासींभोवती आहे. या निसर्गाच्या सान्निध्यात शहरी लोकांच्या नजरेतून ‘दुर्गम’ असणंच आदिवासींना पूरक ठरलंय. जे आदिवासी कोविडबाधित झालेत ते शहरी संपर्कातले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ८५.२३ टक्के, सक्रिय रूग्णांचं प्रमाण १३.७७ टक्के तर मृत्यू दर अवघा १ टक्के इतका आहे. काल दोन कोविडबाधितांचा मृत्यु ओढवला तर कोरोनाचे ८३ नवीन बाधित रुग्ण आढळून आले. ११७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित ६४०७ पैकी
कोरोनामुक्त झालेली संख्या ५४६१ वर पोहचली. तसेच सद्या ८८२ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण ६४ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.
नवीन ८३ बाधितांमध्ये गडचिरोली ४८, अहेरी १२ आरमोरी १, भामरागड १, चामोर्शी १०, धानोरा २ एटापल्ली २, कोरची 0, कुरखेडा २, मुलचेरा १ व सिरोंचा येथील ४ जणांचा समावेश आहे. यात सर्वाधिक संख्या गडचिरोली ह्या तुलनेने मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालेल्या तालुक्यातली आहे. इतरही तालुक्यात नागरी भागालगतच्या गावांमध्ये कोरोना विषाणूंचा शिरकाव झालाय.
गडचिरोली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद माशाक्षेत्री यांनी ‘मिडिया भारत न्यूज’ ला दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोली हा सर्वात उशीरा पहिला कोविड रुग्ण आढळलेला महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा होता. लाॅकडाऊन घोषित झाल्यानंतर मजुरांचं स्थलांतरण सुरू झाल्यानंतर, १८ एप्रिलला जो पहिला कोविडरुग्ण आढळला, तोही स्थलांतरित मजूरच होता. त्यावेळी तालुक्यांच्या सीमांवर १६ ठिकाणी तपासणी पोस्ट लावल्या गेल्या होत्या. जे बाहेरून आले त्यांंचं विलगीकरण आणि वैद्यकीय तपासणी व उपचार केल्याशिवाय त्यांना गावाकडे जाऊच दिलं गेलं नाही. आताही जिल्ह्यातील १७७६ गावांपैकी फक्त १८५ गावांत कोरोनाचा फैलाव झालाय, तीही गावं एक तर तालुका मुख्यालयं आणि लगतची गावं आहेत.
जी बाधित रुग्णसंख्या आहे त्यात, वेगवेगळ्या पोलिस दलातील सुमारे बाराशे सुरक्षा जवानांचा समावेश आहे. आधी स्थलांतरित मजूर, सुरक्षा यंत्रणा, तालुका मुख्यालयं आणि लगतची गावं असा समावेश आहे ; पण आम्ही कोरोनाला आतपर्यंत पसरू दिला नाही, असं डॉ. माशाक्षेत्री यांनी सांगितलं.
मूळात गावातले लोकही सजग आहेत. त्यांनी बाहेरून येणाऱ्यांना वेशीवर रोखण्यासाठी उपाय केले. शाळा, गोठुळात राहण्याची व्यवस्था केली. स्वत:चे नियम तयार केले व त्यांचं पालन होईल, यासाठी जागरूकही राहिले. त्यांचा याबाबतीतला जागर वाखाणण्याजोगा आहे, असं डॉ. माशाक्षेत्री सांगतात.
आदिवासींची नैसर्गिक रोगप्रतिकारक क्षमता चांगलीच असते. पण केवळ त्यामुळे त्यांना कोविड झाला नाही, असं विधान करणं वैद्यकीयदृष्ट्या धाडसाचं होईल, पण तो वाढला, पसरला नाही किंवा कोणी दगावलं नाही, असं म्हणता येईल, असं गडचिरोलीतील गावांमध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते राही शैला रमेश यांनी मिडिया भारत न्यूज ला सांगितलं. कोविडची भीती अगदी दुर्गम भागातही आदिवासींना होती, पण त्यांनी विलिनीकरणाचे नियम अगदी कडक पद्धतीने पाळलेत. त्याबाबत त्यांनी जराही तडजोड केली नाही, असंही राही यांनी सांगितलं.
डॉ. अभिजीत गादेवार यांनी गडचिरोतील एटापल्ली तालुक्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहिलंय. ते म्हणतात, रोगप्रतिकारक क्षमतेपेक्षाही, त्यांचं शहरांपासून दुर्गम असणं, विरळ लोकवस्ती, सामुहिक निर्णय व त्यांचं काटेकोर पालन, जीवनशैली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शहरी लोकसंख्येच्या तुलनेने उच्च रक्तदाब, मधुमेहसारख्या आजारांचं प्रमाण, शिवाय वयोवृद्धांच्या लोकसंख्येचे प्रमाण कमी असणे ही असे अनेक घटक आदिवासींमध्ये कोविडमृत्यूंचं प्रमाण अत्यल्प असल्याशी जोडता येतील.
कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक व मिडिया भारत न्यूज चे संपादक