जामीन मिळूनही प्रियांका वर्षभर तुरूंगात का राहिली ?

जामीन मिळूनही प्रियांका वर्षभर तुरूंगात का राहिली ?

जामीन मिळूनही प्रियांका वर्षभर तुरूंगात का राहिली ?

गेल्या वर्षी वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या एका युवतीचा विडिओ प्रसारित झाला होता. वाहतूक पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप तिच्यावर होता. पोलिसांनी तिचा पिच्छा पुरवला. तिला घेरलं. अडवून ठेवलं. वाशी पोलिसांना बोलावलं आणि तिच्यावर गुन्हा दाखल केला. वाद सुरू होता, तेव्हा ती भिडली. पण पुढे काय वाढून ठेवलंय तिला कल्पना नव्हती. गेल्या वर्षी सप्टेंबरात तिला जामीन मंजूर झाला होता. पण वर्ष झालं तरी ती मुलगी अजूनही जेलमध्येच आहे.

झोमॅटो गर्ल म्हणून सोशल नेटवर्किंगच्या दुनियेत मशहूर झालेल्या त्या मुलीचं नाव प्रियंका ! झोमॅटो कंपनीत ती नोकरीत होती. एका डिलिवरीसाठी जात असतानाच वाहतूक पोलिसांनी तिच्या बाईकचा फोटो काढण्यावरुन सुरू झालेला वाद शिवीगाळीवर गेला आणि त्याचं पर्यवसान प्रियांकावर गुन्हा दाखल होण्यात झालं.

सप्टेंबर १९ मध्ये तिला साॅल्वेन्सीच्या आधारे जामीन मंजूर झाला होता. न्यायालयाने तिचा जामीनाचा हक्क मान्य केला होता. पण वैयक्तिक कारणांमुळे आईबापाचं घर सोडलेल्या प्रियांकाला तसं कोणाचंही पाठबळ नव्हतं. वैयक्तिक हमीपत्रावर तिला सोडण्याची विनंती तिच्या वकिलांनी न्यायालयाला केली. पण ती मान्य झाली नाही.

अनेकदा अर्जखपाटे, मिन्नतवारी केल्यानंतर न्यायालयाने २५ हजारांचा जामीन मंजूर केलाय. पण पुन्हा पैशाची अडचण आली ! मोठमोठ्या गुन्ह्यातले आरोपी जामीनावर काही दिवसांतच बाहेर येतात. पण प्रियांका तांत्रिक अडचणींमुळे जामीन होऊनही जेलमध्येच दिवस काढते आहे.

प्रियांकाच्या समाजमाध्यमात प्रसारित झालेल्या विडियोतून ती उद्धट असल्याचं चित्र निर्माण झालं. तिची गुंडागर्ल म्हणून संभावना केली गेली. शिवराळ वाह्यात म्हणून तिची प्रतिमा बनवली गेली. पण मी वाहनासोबत उभी असताना वाहतूक पोलिसांना कारवाईचा अधिकार काय, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. शहर पोलिस आल्यावर ती त्यांच्याशी अदबीने बोलते, तेही दुर्लक्षित राहिलं. तिच्या आक्षेपार्ह वर्तणुकीचं समर्थन करण्याचं कारण नाही ;

पण वाहतूक पोलिसांची तरी ख्याती काय आहे ? अनधिकृत पार्किंगवरील कारवाईबाबतच्या किंवा टोईंग संदर्भातल्या मार्गदर्शक सुचनांचं वाहतूक पोलिसच सर्रास उल्लंघन करत असतात. कधी नाहक दंड आकारल्यामुळे तर कधी टोईंग ठेकेदारांच्या दादागिरीमुळे वाहतूक पोलिसांसोबत नागरिकांचे वादविवाद होतानाचे कित्येक विडियो समाजमाध्यमात येत असतात. प्रियांका लोकांना दिसली पोलिसांकडच्या मोबाईलमधून ! एकतर्फी !

ती कोणत्या मानसिकतेत जीवन जगतेय, तिचीही काही बाजू असू शकते. मूळात ती सराईत गुन्हेगार नाही, हे आपण आपली मतं बनवताना लक्षात घेतलं पाहिजे. घरदार सोडल्यानंतर सर्व बाजूंनी उभ्या राहिलेल्या प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत स्वत:च्या हिंमतीवर जगू पाहणारी ती एक नव्या जमान्यातली बिनधास्त मुलगी आहे. झोमॅटोत नोकरी करून ती मेहनतीने आपलं जीवन जगत होती. तिला एक लहान मुलगी आहे. व्यवस्थेने त्या लहानग्या मुलीला आईशिवाय वर्षभर जगायला भाग पाडलं.

पोलिसांशी कितीतरी लोक हुज्जत घालतात. शिवीगाळ करतात. लोकप्रतिनिधी तोंडावर अपमान करतात. पण गुन्हे सगळ्यांविरोधात दाखल होत नाही. व्यवस्थेला जाब विचारणाऱ्या प्रियांकासारख्या सर्वसामान्य मुलीविरोधात मात्र कायद्याचा बडगा सहज उगारता येतो. कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना प्रियांकासारखी मुलगी वर्षभर तुरूंगात खितपत पडते, हे चित्र चांगलं सामाजिकदृष्ट्या तरी चांगलं नाही.

आपली संविधानिक व्यवस्था नामचीन गुन्हेगारांनाही सुधारण्याची संधी देते. पण इथे कायद्याचा वापर प्रियांकाला धडा शिकविण्यासाठी झाला. समुपदेशन करून तिला चूक सुधारण्याची संधी मिळायला हवी होती ; ती मिळाली नाही. प्रियांका जामीनानंतरही वर्षभर तुरूंगात का राहिली, याची खरंतर शासनाने चौकशी करायला हवी. रागावर नियंत्रण नसल्याची आणि बोलताना तारतम्य न बाळगल्याची जरा जास्तच शिक्षा तिच्या वाट्याला आली.

खरं तर कायद्याच्या चौकटीत शक्य असेल तर प्रियांकाविरोधातला गुन्हा शासनाने न्यायालयाला विनंती करून मागे घेतला पाहिजे. कायद्याने वागा लोकचळवळीची तरी हीच भूमिका आहे. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणात लक्ष घालून प्रियांकाला पुन्हा उभं करण्यात पालकत्वाची भूमिका निभावली पाहिजे. कधीतरी सरकारचा असाही चेहरा लोकांना दिसला पाहिजे.

 

 

 

राज असरोंडकर

कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक. मिडिया भारत न्यूज चे संपादक.


MediaBharatNews

Related Posts
comments
  • माझ्या विचाराप्रमाणे it is a very bad implementation of law. आणी especially traffic police बाबतीत तर 100% आहे..मी स्वता अशा एका घटनेचा साक्षीदार आहे. एका बाईंची गाडी traffic पोलिसानी उचलली. ती बाई ताबडतोब तेथे आली पण traffic police एवढे मस्त वाल की ती बाई गाडीच्या पाठिमागे धावत होती पण गाडी थांबवण्याचे साधे सौजन्य पण traffic पोलिसाने दाखवले नाही. उलट गाडीतील मुले तिच्या कडे पाहुन हसत होती. म्हणून मी म्हणतो की आमच्या कडे bad implementation of law law आहे आणी त्यात सामान्य माणसेच भरड़ून निघतात.

  • leave a comment

    Create Account



    Log In Your Account



    Don`t copy text!