वानखेडेंना भाजपाच्या ट्रोलर्स गॅंगने निर्माण केलेल्या 'प्रत्यक्षाहून उत्कट' प्रतिमेमागे लपता येणार नाही, इतके परिस्थितीजन्य धडधडीत पुरावे त्यांच्याविरोधात जाणारे आहेत.
अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला अमली पदार्थविरोधी सेवन विरोधी पथकाने अटक केली. त्याच्यासोबत आणखीही काही जणांना मुंबईत काॅर्डिलिओ क्रूझ वर अटक झालीय. आर्यन खान शाहरूख खान सारख्या जगविख्यात अभिनेत्याचा मुलगा असल्याने शिवाय या अटकेला भारतातील सद्यस्थितीतील धर्मविद्वेषी राजकारणाची झालर असल्याने या संपूर्ण प्रकरणात आर्यन खान हा चर्चेत मध्यवर्ती स्थानी आहे.
त्याच्या सोबत अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे हे सुद्धा चांगलेच चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या विरोधात आरोपसत्र सुरू केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला आता नवाब मलिक विरुद्ध समीर वानखेडे असं स्वरूप आलं आहे.
मुळात इतर पक्षांसोबत सूडबुद्धीने वागणारं केंद्रातील भाजपा सरकार आणि इतर राज्य सरकारं किंवा भाजपेतर पक्ष यांच्यातला हा राजकीय संघर्ष आहे. भाजपा सरकार आपल्या विरोधकांविरोधात उघडपणे शासकीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप दिवसेंदिवस गडद होत चाललाय.
या शासकीय यंत्रणांतील अधिकाऱ्यांना माध्यमं नायक बनवून देशासमोर ठेवत आहेत आणि त्यांच्या विरोधात बोलणार्या प्रत्येकाला खलनायक ठरवलं जात आहे. भाजपाची हा फंडा आता पुरेसा उघडा पडला आहे.

भाजपाई राजकारणातला नवा नायक म्हणजे समीर वानखेडे ! सुशांतसिंगच्या मृत्यूनंतर मयताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा जो किळसवाणा राजकीय तमाशा झाला, तो सगळ्या जगाने पाहिला. अख्खी सिनेसृष्टी आरोपीच्या पिंजऱ्यात उभी केली गेली. बडं काहीतरी जाळं हाताशी लागणार आहे, असं चित्र निर्माण केलं गेलं. सिनेसृष्टीत भय निर्माण करण्यासाठी रिया चक्रवर्तीचा बळी देण्यात आला. आता आर्यन खानच्या माध्यमातून शाहरूख खानची शिकार केली जातेय. ती भाजपाई हिंदुत्ववादी विद्वेषी राजकारणाला पूरक आहे.
ज्यांना खंडणीवसूली करायचीय ती तर होईलच, शिवाय, कोण्याही 'खान'ला सतावलं, झोडपलं, कापलं, जाळलं की भाजपाई मतदारांना एक विकृत आनंद होतो, तो देऊन आपली मतपेटी अधिक मजबूत करण्याचं कामही त्यातून साधला जातोय. देशात महागाईने जोर धरलेला असताना, चीनच्या घुसखोरीने जोर धरलेला असताना आणि काश्मीरात दहशतवादाने पुन्हा तोंड वर काढलेलं असताना, नरेंद्र मोदी सरकारचं अपयश झाकण्यासाठी देशाचं लक्ष भलतीकडे वळवण्यासाठीसुद्धा आर्यन खानसारख्या प्रकरणांचा वापर होतो.

आर्यन खानने खरोखर अंमली पदार्थ बाळगले होते का, सेवन केलं होतं का, तो वितरण साखळीतील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दुवा आहे का, अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाकडे त्याच्याविरोधात पुरावे आहेत की नाही, हे आपण घरी बसून सांगू शकत नाही, पण या कारवाईच्या ज्या चित्रफिती समोर आल्यात आणि हळुहळू जी अधिकची माहिती उपलब्ध होतेय, त्यावरून सगळा प्रकार संशयास्पद आहे, हे शेंबडं पोरही सांगेल.

संशयाची सुरुवात क्रूझवरील धाडीत समीर वानखेडेंसोबत सहभागी असलेल्या मनीष भानुशाली आणि किरण गोसावीपासून होते. या दोघांना धाडीत पंच दाखवलं गेलंय. एक भाजपा कार्यकर्ता आहे, दुसऱ्याविरोधात ठगेगिरीचे गुन्हे असून त्यातला तो फरार आरोपी आहे. ही माहिती उघड झाल्यानंतर किरण गोसावी पुन्हा बेपत्ता झाला आणि आता तो युपी पोलिसांना शरण येणार असल्याच्या बातम्या आहेत. याचा अर्थ, भाजपाशासित राज्ये भाजपेतर राज्यातील गुन्हेगारांसाठी आश्रयस्थानं झालीयेत, असाही होऊ शकतो.

किरण गोसावीचा साथीदार , जो धाडीतला आणखी एक साक्षीदार आहे, प्रभाकर सैल याने मुंबई पोलिसांसमोर शपथपत्र केलंय की धाडीपूर्वी त्याला वाॅटस्एपवर काही फोटोज पाठवले गेले आणि नंतर एनसीबी कार्यालयात बोलावून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या गेल्या.
प्रभाकर सैल याने असाही आरोप केलाय की किरण गोसावी आणि सॅम डिसोझा यांना त्याने २५ कोटींच्या देवाणीघेवाणीबद्दल बोलताना ऐकलंय. शाहरूख खानला इतकी रक्कम सांगायची आणि १८ कोटींवर तडजोड करून ८ कोटी समीर वानखेडेंना द्यायचे, असं त्या दोघांत बोलणं झाल्याचं प्रभाकर सैलने शपथपत्रात नमूद केलंय. प्रभाकर सैलने शपथपत्रात मांडलेल्या मजकुरात प्राथमिक चौकशीत तथ्य आढळून आलं तर समीर वानखेडेंविरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो.
समीर वानखेडेंनी कारवाईची शक्यता लक्षात घेऊन कारवाईत घाई होऊ नये, म्हणून मुंबई पोलिसांना पत्र लिहिलंय आणि प्रभाकर सैलचे आरोप ग्राह्य धरू नयेत, म्हणून सत्र न्यायालयातही धाव घेतली. पण न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळलाय. मुंबई पोलिसांनी अद्याप प्रत्यक्ष कारवाईची पावलं टाकलेली नाहीत.

त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व महाराष्ट्र सरकारातील मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडेंची आणखी एक वेगळी कोंडी केलीय. नवाब मलिक आणि शाहरुख खानसारख्या मुस्लिमांना धडा शिकवणारा धाडसी हिंदू अधिकारी अशी समीर वानखेडेंची प्रतिमा रंगवण्यात येत होती. पण नवाब मलिक यांनी समीर वानखेडे मुस्लिम असल्याचे दस्तावेज पुढे केलेत. कायद्यात बसत नसताना वानखेडेंनी अनुसूचित जातीचे फायदे लाटत आयआरएस पद पटकावलंय, असा अतिशय गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केलाय. त्यात समीर वानखेडे आणि त्यांचं समर्थन करणारे भाजपाई ट्रोलर्सचीही कोंडी झालीय.
समीर वानखेडेंनी नवाब मलिक यांच्या आरोपावर खुलासा जारी केलाय. माझे वडील श. ज्ञानेश्वर कचरूजी वानखेडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून निवृत्त झाले. माझे वडील हिंदू आहेत आणि माझी आई दिवंगत जहीदा मुस्लिम होत्या. मी खऱ्या भारतीय परंपरेतील संमिश्र, बहुधार्मिक आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील आहे आणि मला माझ्या वारशाचा अभिमान आहे, असं वानखेडे यांनी म्हटलंय.
दरम्यान, किरण गोसावीसोबत धाडीच्या वेळी एनसीबी कार्यालयात उपस्थित असलेल्या सॅम डिसोझाबाबतही पैशाच्या गैरव्यवहारात गुंतलेला असल्याची माहिती पुढे आलीय.

सॅम डिसोझा, मनीष भानुशाली, किरण गोसावींसारखे नकारात्मक पार्श्वभूमी असलेले लोक धाडीच्या वेळी समीर वानखेडेंसोबत काय करत होते, त्यांच्या निवडीसाठी वानखेडेंसारख्या कथित 'प्रामाणिक' अधिकाऱ्याने गुणवत्तेचे कोणते निकष लावले, ही मंडळी जर पंच होती तर एनसीबीचे अधिकारी असल्यागत कसे वागत होते, त्यांना आरोपींचा ताबा घेण्याचा, आरोपींना बखोटीला धरून आणण्याचा अधिकार कसा प्राप्त झाला, पंच आरोपींशी संवाद कसा करू शकतात, मोबाईलवर कोणाशीही बोलणं कसं करून देऊ शकतात, अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागासारख्या जबाबदार यंत्रणेची कार्यपद्धती एखाद्या गॅंगसारखी कशी काय असू शकते आणि त्या यंत्रणेच्या कार्यालयाला एखाद्या अड्ड्याचं स्वरुप कसं काय येऊ शकतं, या आणि अशा अनेक अडचणीच्या प्रश्नांची उत्तरं समीर वानखेडेंना द्यावीच लागतील. वानखेडेंना भाजपाच्या ट्रोलर्स गॅंगने निर्माण केलेल्या 'प्रत्यक्षाहून उत्कट' प्रतिमेमागे लपता येणार नाही, इतके परिस्थितीजन्य धडधडीत पुरावे त्यांच्याविरोधात जाणारे आहेत.