उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाची कोविडसंदर्भात लपवाछपवी ; जनसंपर्क अधिकाऱ्यावरच आलीय माहिती अधिकार वापरायची पाळी !

उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाची कोविडसंदर्भात लपवाछपवी ; जनसंपर्क अधिकाऱ्यावरच आलीय माहिती अधिकार वापरायची पाळी !

उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाची कोविडसंदर्भात लपवाछपवी ; जनसंपर्क अधिकाऱ्यावरच आलीय माहिती अधिकार वापरायची पाळी !

कोविड संसर्गकाळात दोन्ही लाटांत मिळून उल्हासनगरात साडेसहा हजारांहून अधिक मृत्यू ओढवलेत, त्यातील महापालिकेच्या म्हणण्यानुसार, केवळ अंदाजित पाचशे कोविड बाधित होते.


उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाची कोविडसंदर्भात लपवाछपवी ; जनसंपर्क अधिकाऱ्यावरच आलीय माहिती अधिकार वापरायची पाळी ! कोविड संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यानच्या कालावधीत उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात साडे सहा हजारांहून अधिक मृत्यू ओढवलेत. त्यातले अवघे अंदाजित पाचशे मृत्यू कोविडबाधित म्हणून नोंद आहेत. त्यामुळे प्रश्न असा निर्माण झालाय की कोविडपेक्षाही असा कोणता आजार उल्हासनगरात पसरलाय, ज्यामुळे बाकीचे सहा हजार मृत्यू घडून आलेत.

याबाबत जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्याशी मिडिया भारत न्यूज प्रतिनिधीने संपर्क साधला असता, मी माहिती मागवलीय, आली की कळवतो, असं उत्तर त्यांनी दिलं. प्रत्यक्षात, भदाणे यांना आरोग्यविभाग प्रतिसाद देत नसून, त्यामुळे त्यांनीच माहिती अधिकाराचा वापर करून कोविडमृत्यूची आकडेवारी मागवलीय, असं कळतं. त्याबाबत विचारणा केली असता, ‘प्रशासकीय बाब’ असल्याचं कारण पुढे करून भदाणे यांनी काही सांगण्यास नकार दिला.

उल्हासनगर महानगरपालिकेने वेळोवेळी जाहिर केलेल्या प्रसिद्धीपत्रकांनुसार, दोन्ही संसर्ग लाटेतला मिळून १ मार्च,२०२१ रोजी मृत्यूचा एकूण आकडा ३७१ इतका होता. १ एप्रिलला तो ३७९ इतका होता, तर ९ मे रोजी तो थेट ४४६ इतका वाढला. याचाच अर्थ, मार्च महिन्यात केवळ ८ मृत्यू झाले होते, तर एप्रिल-मे मध्ये ४० दिवसांत ६५ मृत्यू कोविडमुळे ओढवलेत.

पैकी खाजगी रुग्णालयात किती आणि महापालिका रुग्णालयांत किती,याची नेमकी आकडेवारी उपलब्ध होऊ शकलेली नसली तरी कोविडमृत्यूचा सर्वाधिक भार महापालिकेच्या शांतीनगर येथील कोविड रुग्णालयाचा असल्याचं समजतंय.

एप्रिल महिन्यात या रुग्णालयात एकाच दिवशी ११ मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. तर मागच्या आठवड्यात कोविड रुग्णालयाच्या छतावर एका डाॅक्टरच्या वाढदिवसाची झिंग पार्टी, त्यानंतरचे वादविवाद आणि हाणामारीतून दुर्लक्ष झाल्याच्या रात्री तीन रुग्णांचा मृत्यू ओढवल्याचा आरोप होतोय. मात्र, ही घटना शहरात व महापालिका वर्तुळात जोरदार चर्चेत असली तरी तिला पुष्टी मिळालेली नाही.

जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या म्हणण्यानुसार, ही ऐकीव घटना आहे. अशी कोणतीही तक्रार महापालिका प्रशासनाकडे नाही. तक्रार आल्यास प्रशासन गंभीर दखल घेईल.

या रुग्णालयाचं व्यवस्थापन पाहणारे डॉ. राजा रिझवानी यांच्या म्हणण्यानुसार, एप्रिल महिन्यात कोविड रुग्णालयात महापालिकेकडे पुरेसं मनुष्यबळ नव्हतं.

उल्हासनगर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पगारे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिझवानी प्रशासकीय नियंत्रण करीत असून प्रत्यक्ष रुणांशी संपर्क करणारा एकही अनुभवी जबाबदार वैद्यकतज्ज्ञ महापालिकेकडे नाही ! असं सांगण्यात येतंय.

आधी मनुष्यबळ नव्हतं, तर आता अननुभवी डॉक्टरांची खोगीरभर्ती करून महापालिकेचा कोविड हाताळणीवरचा खर्च तर वाढतोय, पण त्याचे सकारात्मक परिणामही दिसत नाहीत, असा एक आरोप आहे. मात्र, आता मनुष्यबळासहित औषधं इंजेक्शन्स वगैरे धरून वैद्यकीय संरचनेची कसलीही कमतरता नाही, असे सांगून कोविड रुग्णालयात तैनात डाॅक्टर्स पुरेशा अर्हतेचे नसल्याचा दावाही डॉ. रिझवानी यांनी खोडून काढलाय.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत उहासनगर महानगरपालिकेने साई प्लॅटिनम हाॅस्पिटलला कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी स्वत: पुढाकार घेऊन जागा उपलब्ध करून दिली होती. इतकंच नव्हे तर महापालिकेच्याच खर्चाने तिथे आंतर संरचनाही उभारण्यात आली होती.

साई प्लॅटिनम रुग्णालयाच्या कारभारावर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर रुग्णालय व्यवस्थापनाने महापालिकेच्या खर्चाची रक्कम परत केली होती.

आता तीच संरचना तिथल्या वर्षभर वापरलेल्या साधनसामग्रीसह महापालिकेने २० लाख रुपये प्रतिमाह भाड्याने घेतलीय आणि प्रत्यक्ष वैद्यकीय सेवा महापालिका स्वत: चालवतेय. परंतु, पुरेशा मनुष्यबळाचा अभाव, अननुभव आणि ढिसाळ नियोजनामुळे महापालिकेला कोविड संकट नीटसं हाताळता आलेलं नाही.

महापालिका प्रशासन कोविड रुग्ण, उपचारपद्धती किंवा मृत्यूंबाबत कसलीही पारदर्शकता पाळत नसून, माध्यमांना माहितीसाठी जनसंपर्क अधिकाऱ्यांवर अवलंबून राहावं लागत असून, खात्रीलायक सूत्रांनुसार आरोग्य विभागाच्या असहकारामुळे स्वत: जनसंपर्क अधिकाऱ्यांवरच मृत्यूची निश्चित माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकाराचा वापर करावा लागला आहे.

जानेवारी, २०२० ते डिसेंबर, २०२० या कोविड संकट कालावधीत उल्हासनगरात एकूण ४७२५ मृत्यू ओढवलेत. वार्षिक सरासरी ३००० पेक्षा हा आकडा दीड हजारांनी जास्त आहे. यंदाच्या वर्षात जानेवारी, २०२१ ते एप्रिल २०२१ पर्यंत पहिल्या चार महिन्यांतच १७३७ मृत्यू ओढवलेत.

उल्हासनगर महानगर पालिकेचा कोविड मृत्यूचा एकूण आकडा पाचशेच्या आसपास आहे. मग उर्वरित ६ हजार मृत्यू कशामुळे झालेत, हा मोठा संशोधनाचा विषय आहे.

संरचना उभारण्याच्या निमित्ताने उल्हासनगर महानगरपालिका करोडो रुपये खर्च करतेय ; पण या संरचनेत रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी लागणारी प्रबळ शक्ती नाही. आधीच उल्हास, त्यात कोविड हाताळणीचा फार्स…अशी परिस्थिती आहे. शहरातील सत्ताधारी पक्ष स्वत:च्याच धुंदीत आहे, तर विरोधी पक्षाला स्थायी समितीत रस आहे ; पण शहरवासियांचं जगणं मात्र अस्थायी होऊन बसलंय !

 

 

 

राज असरोंडकर / प्रफुल केदारे

संपादक / सहसंपादक, मिडिया भारत न्यूज
9175292425/mediabharatnews@gmail.com

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!