लखबीरसिंगच्या हत्येमागचं सत्य बाहेर येईल काय ?

लखबीरसिंगच्या हत्येमागचं सत्य बाहेर येईल काय ?

लखबीरसिंगच्या हत्येमागचं सत्य बाहेर येईल काय ?

सिंघु सीमेवर झालेल्या लखबीरसिंग या युवकाच्या हत्येची घटना अनेक अंगांनी चर्चेत आहे. त्यातला पहिला सगळ्यात ठळक मुद्दा, हत्येतली क्रूरता ! दुसरा मुद्दा लखबीरसिंगचं दलित असणं ! तिसरा आणखी एक कोन हा की हत्या शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी झालीय.

निहंग शीखांनी हत्येची जबाबदारी घेतलीय, तर संयुक्त किसान मोर्चाने हत्येच्या घटनेचा निषेध करत आणि सखोल चौकशी व कारवाईची मागणी करत असतानाच मृत लखबीर आणि निहंगांशी संबंध नाकारले आहेत. विहंग शीख हा धार्मिक समूह आहे. त्यांचा आमचा काही ते आंदोलनाचा भाग नाहीत, हे आम्ही सुरुवातीपासून हरयाणा व दिल्ली पोलिसांना सांगत आलो आहोत, असा संयुक्त किसान मोर्चाचा दावा आहे. हत्या निहंग्याच्या छावणीत झालीय, याकडेही शेतकरी आंदोलक लक्ष वेधतात. त्यावर, निहंगांनीही प्रतिक्रिया देत आमच्यावर कोणाची हुकुमत नाही, असं म्हटलंय.

दरम्यान, हत्येच्या घटनेचं निमित्त करून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, सिंघु सीमेवरील आंदोलन हटवण्याची मागणी करण्यात आलीय. हत्येच्या घटनेने केंद्र सरकारच्या हाती आयतंच कोलीत आलं असून, सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्यास सरकारचा आंदोलन दडपून टाकण्याचा मार्ग सोपा होणार आहे, जे सरकारला उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकांपूर्वी कोणत्याही परिस्थितीत करायचंय होतं.

पंजाबातील छीमा कलन गावातील लखबीरसिंग चारेक दिवसांपूर्वीच आंदोलनाच्या ठिकाणी आला होता. माझी ' सेवा ' करायची इच्छा आहे, असं तो म्हणाला होता. आंदोलनाच्या मुख्य मंचाजवळच तो झोपायचा. दिवसभर गुरुद्वारात 'सेवा' द्यायचा. घटना घडली त्या पहाटे तीन-साडेतीन वाजताच्या सुमारास तो गुरुद्वारात गेला होता. तो तिथून बाहेर पडत असतानाच निहंग शीखांनी त्याला घेरलं. त्याला बेदम मारहाण झाली. त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार झाले. त्याचा हातही कापला गेला.

लखबीरसिंगवर गुरुद्वारातील सर्बलोह ग्रंथांचा अपमान केल्याचा आरोप आहे. हा ग्रंथ श्री गुरू ग्रंथ साहीब इतकाच निहंग शीखांना प्राणप्रिय आहे. गुरू गोविंदसिंग यांनी तो रचल्याचं मानलं जातं. पण अभ्यासक त्याची पुष्टी करत नाहीत. हिंदू धर्मातील वेद, पुराणांतील कथांचा या ग्रंथावर प्रभाव आहे. देवीदेवतांनी शैतानावर मिळवलेल्या विजयाच्या कथा त्यात सांगितलेल्या असल्याचं म्हटलं जातं..बऱ्याच जणांचं म्हणणं असं की लखबीरसिंग तो ग्रंथ घेऊन पळत होता. काहीचं म्हणणं की ग्रंथ कचऱ्याच्या डब्यात सापडला, तर काही म्हणतात, लखबीरसिंग ग्रंथ जाळण्याच्या तयारीत होता.

लखबीरसिंगच्या गावच्या सरपंचाच्या माहितीनुसार, तो अंमली पदार्थांच्या अधीन होता. तर तो मनोरुग्ण होता, अशीही चर्चा आहे. काही जणांनी त्याला हरयाणा सरकारचं दलाल म्हटलं आहे. तो दलित आहे, हा या संपूर्ण घटनाक्रमातला निव्वळ योग किंवा पूर्वनियोजित घटक असल्याचं एकंदरीत दिसतं. लखबीरसिंगचं पहाटे गुरुद्वारात जाणं आणि ग्रंथाशी छेडछाड करणं संशयास्पद असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.

निर्दयी मारहाण आणि शरीरावर अनेक घाव झाल्यानंतर हात तुटलेल्या अवस्थेत जखमी लखबीरचा जिवंत असतानाचा विडिओही समोर आलाय. निहंग शीख त्याच्या भोवती उभे असलेले दिसतात. ' 'पोलिसांनी त्याला धरला असता आणि सोडला असता. पण आम्ही ग्रंथाचा अपमान सहन करणार नाही. याला कोणी पाठवलंय, आम्हाला माहितीय', असं विडिओतून ऐकायला मिळतं.

निहंग शीखांतील एकाने गुन्ह्याची कबुली देत कुंडली पोलिसांकडे शरणागती पत्करलीय. पोलिस त्याच्या व इतरांच्या माहितीची सत्यता पडताळताहेत, कारण माहितीत दावेप्रतिदावे आहेत. अर्थात, हरयाणा, दिल्लीतील सरकार, पोलिस, माध्यमंआणि केंद्र सरकारचं शेतकरी आंदोलनाबाबतचं आजवरचं धोरण पाहता सत्य बाहेर येण्याऐवजी लखबीरसिंगच्या हत्येच्या घटनेचा वापर आंदोलन दडपण्यासाठीच अधिक होईल, अशी शक्यता आहे.

( टाईम्स ऑफ इंडिया, इंडिया टुडे, प्रिंट, एनडीटीव्ही व इतर माध्यमांतील बातम्यांवर आधारित)

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!