खिडकी घराची आणि मनाचीही !

प्रत्येकाच्याच घरात असा एक विशिष्ट कोपरा असतो, जो मनाला विसावा देतो, आनंद देतो. तो कोपरा घरात कुठेही असू शकतो. हाॅल, किचन किंवा बेडरूम मध्ये..माझी मात्र आवडती जागा म्हणजे माझ्या हाॅलची खिडकी. तिथे बसायला ऐसपैस जागा आहे. चहा घेण्यासाठी, नाश्ता करण्यासाठी, वाचनासाठी, भाजी निसण्यासाठी किंवा नुसतंच खाली डोकावून बघण्यासाठी ही जागा मला खूपच आवडते.

अख्ख्या समाजाचं दर्शनच इथून होतं म्हणा ना. पुढच्या बागेतली सुंदर फुललेली फुलं बघूनच मन प्रसन्न होतं. बागेतले झोपाळे मुलांना घेऊन झुलताना दिसतात. छोट्यांच्या किलबिलाटाने वातावरणात जिवंतपणा येतो. मी खेळगडी होऊन जाते. खिडकीतून बालपण जपत बसते.

खाली पसरलेली हिरवळ डोळ्यांना शांतता, समृद्धता देते. हिरवे हिरवे गार गालीचे, ही बालकवींची कविता ओठावर लिपस्टीकसारखी शोभते. मधेच कुणीतरी झाडांची निरीक्षणं करताना दिसतं. काहीजण देवाला वाहण्यासाठी फूले तोडताना दिसतं. माझा जीव बारीक होतो. निरागस आयुष्य माझ्या खिडकीसमोर खुडलं जातं हे पहावत नाही.

खाली पार्किंगमधल्या जास्तीत जास्त पांढ-या गाड्या भाव खाऊन जातात. आमचा माळीच गाड्या धुतो. मनात येतं. याच गाड्यांतून याला कोणी एखादा फेरफटका मारून आणला असेल का? मान नाही म्हणते. मी हळवी होते.

रस्त्यावरच्या गप्पा खिडकीत बसून मी अनेकदा पाहिल्यात. समोरच्या मोठ्या रस्त्यावरुन काही मुले जोरात बाईक पळवतात. जीव चर्र होतो. काही झालं तर… मी हळहळते. अजून थोडी पुढे नजर टाकली तर ओळखीची-अनोळखी माणसे ये-जा करताना दिसतात. काही सोबतीने चालतात तर काही एकट्यानेच चालतात.

समोरच बसस्टॉप आहे. प्रवाशांची चढ -उतार होताना दिसते. माणसांची अदलाबदल इथे होताना पाहून मोठी गम्मत वाटते. बाजूलाच रिक्षास्टॅन्ड आहे. काही रिक्षावाले प्रवाशांची वाट बघत उभे असतात तर काही प्रवासी भरभर चालत येतात आणि रिक्षात बसून जातात सुध्दा..बघता बघता दृश्य कशी पटापट बदली होतात, हे नजरेला पण कळत नाही. म्हणून कितीही वेळ बाहेर पाहत राहिलं तरीही मन भरत नाही.

हेही वाचा : येऊरची ओढ : इथलं प्रत्येक झाड आपल्याशी हितगुज करतं !

जवळच भाजीबाजार आहे. अनेक भाजीवाले ताजी भाजी घेऊन बसतात. त्यांच्याजवळ सुद्धा गिऱ्हाईकांची गर्दी असते. सतत माणसांची अदलाबदल होताना दिसते. एका बाजूस उंचच उंच इमारती गर्वाने उभ्या असलेल्या दिसतात. पण रस्त्यावरून चालणाऱ्या माणसाला त्याच काहीच वाटत नाही. त्याला पोटाची आग स्वस्थ बसू देत नाही.

इतकं सारं वेगवेगळ्या प्रकारच दृश्य नजरेस पडतं. कधीही पाहा तुम्हांला त्या दृश्यात फरक जाणवतो. म्हणूनच कितीही वेळ खिडकीत बसलं तरी मन भरत नाही.

काहीही विचार मनात असतील तरी मनातल्या विचारांचे परिवर्तन करायला लावते, ती खिडकीतली जागा.

येणारी पाहुणे मंडळी सुद्धा तिथेच बसून खूश होतात. ही नुसतीच खिडकी नाही, तर हा आहे, भल्यामोठ्या टिव्हीचा पडदा जो सतत रंगीत दृश्य बदलवत असतो. एकटक त्याच्याकडे बघायला भाग पाडत असतो. मनाचे रंग गहिरे करत जातो. अनेक रंग एकत्र आल्यावर यातला आपला रंग कुठला हेच काही क्षण आपण विसरून गेलेलो असतो.

अशी ही मनपरिवर्तन आणि मतपरिवर्तन करणारी खिडकी आताही मला लिहायला भाग पाडते. फार मोकळ्या दिलाची आहे. माझी दिलदार खिडकी.

 

 

 

नंदा गवांदे

लेखिका शिक्षिका आहेत.

 

gawandenanda734@gmail.com

MediaBharatNews

comments

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!