धर्म हा ज्यांचा धंदा आहे, धर्मावर ज्यांचं पोट आहे, धर्माआडून ज्यांना आपला स्वार्थ साधता येतो, धर्मामुळे ज्यांचं वर्चस्व अबाधित राहतं, असे लोक धर्मव्यवस्था टिकून राहावी म्हणून जीवाचा आटापिटा करतात. अशा लोकांकडून शेकडोंदा फसवणूक झाली तरी लोक तथाकथित धर्मश्रद्धापायी पुन्हा पुन्हा नवनव्या लोकांना फशी पडत राहतात. सगळ्या धर्मात लोकांची लुबाडणूक करणारे बदमाश आहेत. बेनेडिक्ट एन्टो हा असाच एक धार्मिक भोंदू !
कन्याकुमारीतील कोल्लनगोडे भागातील एका चर्चमध्ये २९ वर्षांचा बेनेडिक्ट एन्टो फादर म्हणून वावरत होता आणि चर्चमध्ये येणाऱ्या लोकांच्या धर्मभावनेशी खेळत होता. विशेषतः स्त्रियां त्याचं लक्ष्य होत्या.

अल्पवयीन मुलींपासून ते प्रौढ स्त्रियांपर्यंत अनेकींना बेनेडिक्टने आपल्या जाळ्यात ओढलं. असले बाबाबुआ स्त्रियांना साक्षात परमेश्वराचे अवतारच वाटत असतात किंवा त्यांच्याभोवतीची चमचम त्यांना खुणावत असावी. बेनेडिक्टने चर्चमध्ये येणाऱ्या स्त्रियांशी संवाद वाढवला, संपर्क मिळवले, वाॅटस्एपवर वैयक्तिक गप्पा केल्या, विडिओ काॅलमधून लैंगिक चाळे केले आणि हे सगळं संकलित करून ब्लॅकमेल करत त्याने अनेक स्त्रियांशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. स्त्रियांच्या डोळ्यांवर असलेल्या धर्मश्रद्धेच्या झापडांचा आणि चर्चचा फादर असल्याच्या प्रतिमेचा पुरेपूर वापर बेनेडिक्टने आपली वासना शमविण्यासाठी केला. एकाच कुटुंबातील मुलगी, आई आणि सून यांना एकाच वेळी जाळ्यात ओढण्याचेही प्रताप या भोंदू फादरने केले.

नर्सिंग करणाऱ्या एका मुलीच्या तक्रारीवरून बेनेडिक्ट अडचणीत आला. त्याला जमावाने रस्त्यात मारहाणसुद्धा केली. त्यावेळी पळवलेल्या लॅपटॉपमध्ये फादरचा चर्चमधला सगळा प्रताप शेकडो विडिओंमध्ये कैद होता. त्यातले काही विडिओ पसरले आणि कन्याकुमारीत खळबळ माजली. पोलिसांनी तत्परतेने पावलं उचलत बेनेडिक्टला ताब्यात घेतलं आणि कसून चौकशीनंतर त्याला अटक केली.
या अटकेनंतर संबंधित स्त्रिया भेदरलेल्या आहेत ; कारण ब्लॅकमेलिंगचे प्रकार घडलेत का हे तपासण्यासाठी तामिळनाडू पोलिस प्रत्येकीला संपर्क करताहेत. अर्थात अशा प्रकारे एखाद्या फादरने चर्चच्या आड गैरधंदे करण्याचं बेनेडिक्ट हे पहिलंच उदाहरण नाही. आधीही खूप घडलेली आहेत आणि पुढेही घडतील ! श्रद्धा माणसाला अंधश्रद्धेकडे नेते आणि अंधश्रद्धा बरबादीकडे याचे अनुभव आल्यानंतरही लोक नवनव्या बाबाबुआंच्या, फादरमौलवींच्या तावडीत सापडत असतातच...!