मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या मार्च महिन्यामध्ये नाशिक येथे संपन्न होत असल्याची घोषणा साहित्य महामंडळाने नुकतीच केली आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड हा महामंडळाच्या अखत्यारीतला मुद्दा असला तरी, एक वाचक म्हणून मी डॉ. यशवंत मनोहर यांचं नाव सुचवू इच्छितो. अरुणा ढेरे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यानंतर संमेलनाध्यक्षपदाचा हा सन्मान डॉ. मनोहर यांना मिळायला हवा असं मला मनापासून वाटतं.
गेल्या पाच दशकांहून अधिक काळ सातत्याने लेखन करणारे डॉ. मनोहर एक प्रतिभासंपन्न कवी आहेत. केवळ कवीच नाहीत, तर समीक्षक, कादंबरीकार आणि दलित साहित्याला आंबेडकरवादाची सैद्धांतिक भूमिका देणारे एक महत्त्वाचे विचारवंत देखील आहेत.
विविध विषयावरचा त्यांचा व्यासंग थक्क करणारा आहे. सुमारे शंभरहून अधिक ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. हे लेखन केवळ भाराभार केलेले लेखन नाही, तर या लेखनामागे त्यांची एक विशिष्ट भूमिका आहे.
आंबेडकरी तत्त्वज्ञानाच्या आधारभूत घटकांवर त्यांचे समग्र लेखन उभे आहे. त्यांच्या लेखनाला स्वतःचा आवाज आणि स्वतःची भाषा आहे. मानवमुक्तीच्या मूलभूत स्थित्यंतराचे ते एक डोळस साक्षीदार आहेत. त्यांचं लेखन कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या वर्गवारीत ढकलून बंद करता येत नाही. कारण त्यांच्या लेखनाला एक सखोल चिंतनाची बैठक आहे.
संस्कृती आणि परंपरेच्या विरोधातला विद्रोह व्यक्त करणारे ते महत्त्वाचे कवी आहेत. ‘उत्थानगुंफा ‘ (1977) पासून ते ‘अग्निशाळेचे वेळापत्रक’ (2021) पर्यंतचा त्यांचा वाड्मयीन प्रवास थक्क करणारा आहे.
चार्वाक, बुद्ध, मार्क्स, फुले, गांधी, आंबेडकर, हेमिंग्वे, मानवेंद्रनाथ रॉय हे त्यांचे आस्था केंद्र आहेत. म्हणूनच त्यांचे समग्र लेखन अंतर्मुख करणारे ठरते. विचारांची स्पष्ट अभिव्यक्ती हे त्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. नव्या दृष्टिकोनातून त्यांनी साहित्यशास्त्राची आणि सौंदर्यशास्त्राची केलेली मांडणी असो की, शेकडो नव्या प्रतिभावंतांना स्वागतशील प्रोत्साहनाचे दिलेले बळ असो – हे त्यांचे मोठे सांस्कृतिक कार्य आहे, असे मला वाटते.
पारंपरिक काव्यशास्त्र नाकारून विद्रोहाचे तेजस्वी दर्शन घडवणारे लेखन त्यांनी केले. त्यांच्या लेखनाची भाषा ही जीवनानुभवाची भाषा आहे. समाजजीवनातील वास्तवाचे अधिष्ठान त्यांच्या कवितेला आहे. काव्यभीमायन, मूर्तिभंजन, जीवनायन, युगांतर, युगमुद्रा, बाबासाहेब, स्वप्नसंहिता या सगळ्याच कवितासंग्रहांमधून त्यांच्या विचारशील मनाचे दर्शन घडते. म्हणूनच तर कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, नरहर कुरुंदकर, बाबूराव बागूल, रा.ग. जाधव, शिरीष पै, भा. ल. भोळे, भालचंद्र फडके यांच्यासारख्या दिग्गजांनी त्यांच्या लेखनाचं कौतुक केलं.
कवितेशिवाय अन्य लेखनातून आणि संपादनातून त्यांनी भारतीय समाजजीवनातील जातीव्यवस्था, संस्कृती, वेद, शास्त्र, पुराण आणि समकालीन स्थितीगतीसारख्या असंख्य विषयांवर रोखठोक भाष्य केले आहे.
त्यांची भाषणे हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. ‘असामान्य कादंबरीकार,’ ‘सम्यक दृष्टी देणारा प्रज्ञाविचारवंत’, ‘आंबेडकरी साहित्याचा महामेरू,’ ‘युगसाक्षी साहित्यिक’, ‘बुद्धिवादी विचारवंत’ अशी कितीतरी संबोधने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी जोडली गेली आहेत.
केवळ दलित किंवा आंबेडकरीच नव्हे; तर एकूणच मराठी कवितेला, समीक्षेला त्यांनी एक नवे परिमाण दिले आहे. समृद्ध केले आहे.
म्हणूनच नाशिक येथे होत असलेल्या 94 व्या संमेलनाच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय साहित्य महामंडळाने त्यांची निवड करावी, असे मला वाटते. हे वाटण्याचे आणखी एक कारण म्हणजे तीन वर्षांपूर्वी मराठवाडा साहित्य परिषदेने त्यांना ‘कविवर्य कुसुमाग्रज’ यांच्या नावाने दिला जाणारा ‘जीवनगौरव पुरस्कार’ दिला होता. (या समारंभात मीही एक वक्ता होतो) आणि योगायोग असा की, हे संमेलन यावर्षी कुसुमाग्रजांच्या नाशिक नगरीत संपन्न होत आहे.
महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्याशीही त्यांचा उत्तम स्नेह आहेच. अर्थात हा स्नेह म्हणजे संमेलनाध्यक्षाची पात्रता नव्हे ;पण यानिमित्ताने विवेकवादी विचारदृष्टीच्या एका मोठ्या कवीचा सन्मान करण्याची संधी महामंडळाने घ्यावी. महामंडळाच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी डॉ. यशवंत मनोहर यांच्या नावाचा विचार अग्रक्रमाने करावा, असे मला नम्रपणे सुचवावे वाटते.