जिंदगी धूप…तुम घना साया !

जिंदगी धूप…तुम घना साया !

जिंदगी धूप…तुम घना साया !

आज बैचेनी वाढलेय. प्रश्न अनेक, पण उत्तर सापडत नाही. अशावेळी मन जवळच्या माणसाला शोधू लागतं. मोबाईल नंबर डायल करताच समोरून आवाज ऐकू येतो. काय झालंय? बोल ना! तुझा असा का आवाज येतोय ? तू घाबरलीयेस का? तुला दम लागलाय का? हे नुस्तं ज्याला आवाजावरून कळतं ते असतं आपलं व्यक्त होण्याचं हक्काचं ठिकाण. भरून आलेलं आभाळ रितं करण्याची आपल्या मालकीची जागा.

कोंडून राहिलेली कुकरमधली वाफ जशी झाकण उघडल्यावर भरभर हवेत विरून जाते, तसंच आपल्याला समोरच्याने हक्काने विचारल्यावर आपण सांगू लागतो आणि मग, मन हलकं हलकं वाटू लागतं. ते असतं खरं मनापासून जोडलेल नातं !

आई, वडील, भावंडं, जवळचे नातेवाईक, मित्र, मैत्रिणी असा गोतावळाच आपलं हक्काच ठिकाण असतं आणि अशी हक्काची ठिकाण॔ असणं गरजेचंही आहे. आपला एकटेपणा दूर करण्यासाठी, प्रसन्नता मिळवण्यासाठी.

तुझ्याशी बोलून खूप छान वाटतंय, डोक्यावरचा ताण कमी झाला. वा क्या बात हे. हेच तर शोधत होतो आम्ही. आता उत्तर सापडलं. हेच तर हवंय मला...असं ज्यांच्याविषयी वाटतं ती खरंच आपली हक्काची ठिकाणं असतात. अशा लोकांचं आपल्या जवळपास असलेल सान्निध्यसुद्धा खूप महत्वाचं असतं. नुसते डोळे मिटून त्यांच स्मरण जरी केले तरी सुद्धा खूप खूप बर वाटतं. तिथेच ओझं निम्म्याहून कमी झालेलं असतं.

आनंदाचे क्षणही त्यांच्याशी शेयर करायला आवडतात आणि दु:खाचेही. मग वाटू लागतं अरे ...अब दिल्ली दूर नहीं.

मी भाग्यवान ! माझी अशी अनेक हक्काची ठिकाणं आहेत, जिथे विश्वासाने मन मोकळ करावं. मनातला मळभ दूर होण्यासाठी .

हे सत्य आहे की बऱ्याच जणांना असं हक्काने बोलावंसं वाटतं. मनातलं सारं सारं मांडावसं वाटतं. त्यांना माहित असतं, की हीच आपली हक्काची जागा आहे. जिथे आपला मनाचा गुंता अलगद सोडवला जाईल आणि त्रासही होणार नाही.

दिवस पालटतात फक्त पालटलेले दिवस बघायला आपण नुसतेच शरीराने नाही तर, मनाने सुद्धा जिवंत असावे लागतो. प्रत्येकाच्याच आयुष्यात असं एक तरी ठिकाण असावं लागतं की ज्याला स्मरताच आपल्याला गुणगुणावसं वाटतं, तुमको देखा तो ये खयाल आया, जिंदगी धूप, तुम घना साया !

 

 

 

नंदा गवांदे

लेखिका शिक्षिका आहेत.

gawandenanda734@gmail.com

MediaBharatNews

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!