११ मार्च २०१९ रोजी कायद्याने वागा लोकचळवळीला १० वर्षे पूर्ण होताहेत. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अनेकजण आता कायद्याने वागाशी परिचित आहेत. आपापल्या तत्वप्रणालीपेक्षा देश आणि देशाचं संविधान यांना प्राथमिकता देणारा हा खटाटोप आहे. जातीपाती, धर्मप्रांत यांच्या पलीकडे केवळ भारतीय म्हणून लोकांना तिरंग्याखाली एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे कायद्याने वागा लोकचळवळ. आज वेगवेगळ्या विचारसरणीचे युवक एकमेकांच्या विचारांचा अर्थात मतभेदांचा आदर करत कायद्याने वागा मध्ये एकत्र वावरताहेत. नियमित बैठकांत मतभेद असलेल्या विषयांवर समोरासमोर चर्चा करताहेत. एकमेकाला जाणून घेण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करताहेत. सरतेशेवटी आमची बांधिलकी भारतीय संविधानाशी आहे.
आमचा इझम भारतीय संविधान आहे. कोणत्याही प्रकारच्या वैचारिक, धार्मिक, जातीय कट्टरतेला आमचा ठाम विरोध आहे. आपले म्हणणे शांतपणे, संविधानिक पद्धतीने मांडण्यावर आमचा विश्वास आहे. भारतीय संविधानांत नमूद केल्याप्रमाणे वैयक्तिक पातळीवर श्रद्धा आणि उपासना याचं स्वातंत्र्य आम्ही मान्य करतो, त्याचवेळी भारतीय संविधानाने पुरस्कार केलेला विज्ञानवादाचा मार्ग आम्हाला प्राधान्याचा वाटतो. भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मुलभूत तत्वे आम्हाला प्राणप्रिय आहेत. आम्हाला या देशात खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक आणायचं आहे.
शिक्षण, आरोग्य, परिवहन हे विषय आमच्या सर्वाधिक प्राधान्यावर आहेत. या क्षेत्रात खाजगीकरण असू नये व कोणाही सर्वसामान्य नागरिकास परवडू शकेल अशी दर्जेदार अद्ययावत सेवा देण्याची संपूर्ण जबाबदारी सरकारनेच घेतली पाहिजे, ही आमची मुख्य मागणी आहे. केजी टू पीजी प्रत्येकाला संपूर्ण मोफत शिक्षण असलं पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. यासोबत नागरिकांचे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी स्वतः सक्षम व्हावं, त्यासाठी त्यांनी सरकार, प्रशासन नावाची व्यवस्था समजून घ्यावं, नियम कायदे समजून घेऊन त्यांच्या अंमलबजावणीचा आग्रह धरावा, सरकारांची कार्यपद्धती सहजसोपी, सुटसुटीत, पारदर्शी असावी यासाठी जनजागृती, पाठपुरावा, प्रसंगी आंदोलने अशी आमची धडपड सुरु आहे.
बदल होईल, याबाबत आम्ही आशावादी आहोत. एक ना एक दिवस लोक भावनिक प्रश्न बाजूला सारून राजकीय फसवेगिरीला बळी न पडता, आपल्या जीवनमरणाच्या प्रश्नांना प्राधान्य देतील, निवडणुकीनंतर नामानिराळे न राहता सतत राज्यकर्त्यांना निर्भयपणे जाब विचारतील, राज्यकारभारावर स्वतःचा वचक निर्माण करतील आणि पुढे प्रजासत्ताकाचं महत्व ओळखून लोकाभिमुख सत्ता असावी म्हणून सद्सद्विवेकाने लोकाभिमुखच लोकप्रतिनिधी निवडून देतील, याची आम्हाला खात्री आहे. आमची धडपड त्यासाठीच आहे. एका चांगल्या संविधानिक समाजाच्या निर्मितीसाठी कायद्याने वागा लोकचळवळ ही पायवाट आहे.