
राज असरोंडकर कायद्याने वागा या लोकचळवळीचे प्रणेते आहेत. दहा वर्षापूर्वी उल्हासनगर या आपल्या राहत्या शहरातून राज असरोंडकर यांनी या लोकचळवळीची स्थापना केली. आज ती चळवळ महाराष्ट्रभर पसरते आहे. विशेषतः युवा वर्ग या चळवळीकडे आकृष्ट झाला आहे. कायद्याने वागा लोकचळवळ संविधानिक मार्गांचा आग्रह धरते व त्यासाठी प्रसार प्रचाराचं काम करते. संविधान हाच आमचा ईझम आहे, असं ही चळवळ सांगते, यातच सगळं आलं.
मुंबईत महापालिका शाळा आणि दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात शालेय शिक्षण झाल्यावर राज रूपारेल काॅलेजात विज्ञान शाखेत गेले. तिथून पुढे त्यांनी व्हिजेटीआय काॅलेजात डिप्लोमा इलेक्ट्रीकल इंजिनियरिंग ला प्रवेश घेतला. पण राज यांचा जीव त्यात रमला नाही आणि ते पत्रकारितेकडे वळले. आपलं महानगर, आज दिनांक, सकाळ, लोकसत्ता, चित्रलेखा, वृत्तमानस आदी नियतकालिकांतून त्यांनी पत्रकारिता केली. एका जागरूक कार्यकर्त्याचा पिंड त्यांच्यात उपजत आहे.
२००२ ते २००७ ते उल्हासनगर महापालिकेत नगरसेवक होते. प्रभाग समितीचं सभापतीपद त्यांनी भुषवलंय. एक अभ्यासू आणि आक्रमक नगरसेवक म्हणून त्यांची ख्याती होती. शासनाच्या संजय गांधी निराधार योजना तसंच रेशनिंग समितीवरही त्यांनी सदस्य म्हणून काम केलंय.
२००९ ला कायद्याने वागा लोकचळवळ सुरू केल्यावर त्यांनी महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्था, झिम्माड काव्यसमूह, बोरूची शाळा, मिडिया मेलडी कराओके क्लब, रो, उर्जासावित्री, मिडिया भारत न्यूज असे विभाग सुरू करून कला, साहित्य, संगीत, शैक्षणिक तसंच वृत्तमाध्यम क्षेत्रात अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले व राबवत आहेत. अलिकडेच कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर लढा उभारून राज असरोंडकर यांनी आता कामगार क्षेत्रातही पाऊल टाकलं आहे.
नियमकायद्यांचा संदर्भ देत प्रभावी पत्रव्यवहार व चिवट पाठपुराव्याच्या आधारावर प्रशासनाची कोंडी करणं आणि अधिकाऱ्यांना कर्तव्य पार पाडायला लावून सकारात्मक निर्णय घ्यायला भाग पाडणं ही कायद्याने वागा लोकचळवळीची खासियत आहे. ऋतुसंगत या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरातून असं काम करणारे कार्यकर्ते घडवण्याचं काम चळवळ करते. फातिमाबी-सावित्री उत्सव हा या चळवळीचा वार्षिक उत्सव आहे. ज्यावेळी वेगळ्या वाटेवर चालू पाहणाऱ्या स्त्रियांना फातिमाबी-सावित्री पुरस्काराने सन्मानित केलं जातं.
बोरूची शाळा या उपक्रमामार्फत राज असरोंडकर यांनी गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांत लेखन वाचन कौशल्य विकासाची चळवळ राबवली. उल्हासनगरातील पद्मश्री मोहंमद रफी फॅन्स क्लबचे ते समन्वयक आहेत. मिडिया कन्सेप्टस् हा त्यांचा उदरनिर्वाहाचा मार्ग आहे.
माणूस प्रकाशनच्या माध्यमातून ते प्रकाशन व्यवसायात आहेत. पडद्यामागचं गाणं, आशांकित, के४६ ही त्यांची प्रकाशनं आहेत. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान सभेतील भाषणाच्या अभिवाचनाचे प्रयोग ते करतात. त्या भाषणाची पुस्तिका भारतीय राष्ट्रनिर्मितीची मूलतत्त्वे या शीर्षकाने कायद्याने वागा लोकचळवळीने प्रकाशित केली आहे.
कविता, गाणी, कला, क्रीडा यांची केवळ आवड नव्हे तर तसे सुप्तगुण अंगी बाळगून असलेले आणि प्रभावी वक्तृत्व गुण अंगी बाळगणारे राज असरोंडकर हे एक बहुआयामी सामाजिक व्यक्तिमत्व आहेत.