प्राजक्त : जगतो अल्पायुषी, पण दरवळतो दीर्घकाळ!

प्राजक्त : जगतो अल्पायुषी, पण दरवळतो दीर्घकाळ!

प्राजक्त : जगतो अल्पायुषी, पण दरवळतो दीर्घकाळ!

प्राजक्त केशरी देठाचा, सफेद रंगाचा. एक ओझरता, मंद सुवास असणारा. नुसतं पाहूनच मनाला बेधुंद करणारा. एका अंगणात वाढून दुसर्‍या अंगणात फुलांचा सडा पाडणारा, तो प्राजक्त !! रातोरात बहरून येणारा, प्रत्यक्षात लवकर कोमेजून जाणारा, पण त्याचा टवटवीतपणा मनाला तजेला देणारा असा हा प्राजक्त. प्रत्येकाच्या मनात घर करणारा.

समुद्रमंथन झाले तेव्हा त्यातून पारिजातकाचे झाड बाहेर आले, अशी आख्यायिका आहे. तेच झाड आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणून प्रसिद्ध झाले.

मोह आवरता आला नाही म्हणून सत्यभामाने स्वतःच्या आग्रहाखातर पारिजातकाचे झाड स्वतःच्या अंगणात लावले, पण त्याचा सडा मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडत होता ; तेव्हापासून ‘प्राजक्ताचा सडा दुसर्‍यांच्या अंगणात’ अशी म्हणच प्रसिद्ध झाली.

पारिजातकालाच प्राजक्त असे म्हंटले जाते. हरसिंगार, स्वर्गीय फूल अशी आणखीही नावे आहेत. या झाडाचे मूळ, खोडाची साल, पाने, फुले,बिया सर्वच आयुर्वेदात उपयोगात आणले जाते. ही एक उपयोगी वनस्पती आहे. दमा, सांधेदुखी, सायटीका, मासिक पाळी तसेच त्वचेची काळजी घेण्यासाठी याचा उपयोग होतो.

साधारण जून ते ऑक्टोबरपर्यंत या फुलांचा मोसम असतो. सूर्यास्ताच्या वेळी फुले उमलतात आणि सूर्योदयानंतर जस जशी उन्हे चढायला लागतात तशी ही फुले मावळायला लागतात.

वार्‍याच्या मंद झुळके बरोबर याचा मंद मंद सुवास दरवळायला लागतो. खूप नाजूक असतात ती. आयुष्य खूप कमी असत त्यांचं. सडा पडला की अंगण कसं खुलून दिसतं. सभोवार केशरी अन पांढरा सडा आपली नजर खिळवून ठेवतो.

यांचा सडाच वेचावा लागतो. नुसते झाड हलवले तरी फुलांचा वर्षाव अंगावर होतो. जो हवाहवासा वाटतो.

टपटप पडती अंगावरती
प्राजक्ताची फुले
भिरभिर भिरभिर त्या तालावर
गाणे आमुचे जुळे

ही मंगेश पाडगावकरांची कविता आठवल्याशिवाय राहवत नाही. कितीही मोठे झालो तरी स्वतःचं बालपण कुणीच विसरत नाही.

फुलांचं सौंदर्य अनुभवणाऱ्या मुलांच्या मनातला आनंद या कवितेतून किती सार्थ मांडलेला आहे. निसर्गाशी एकरूप होऊन बालपण आठवू लागतं. छानसा भूतकाळ मनात रुंजी घालू लागतो. मन अलगद पारिजातकाच्या झाडाखाली विसावते. अन् परडीत फुलांचा सडा वेचू लागते.

एकत्र केलेली ती परडीतली फुले चांदण्यांसारखी भासू लागतात. चांदण्याच्या आकाराची ही फुले टकमक आपल्यालाच बघत आहेत असं वाटायला लागतं. त्यांचं आयुष्य कमी असलं तरीही आपल्याला खूप काही देऊन जातं.

दुसर्‍यास उपयोगी पडून आपलं छोटसं आयुष्य दीर्घ करावं हे प्राजक्ताकडून शिकावं. असा सुंदर, मोहक प्राजक्त आपल्या अंगणात असावाच असावा.

नंदा गवांदे

लेखिका शिक्षक आहेत.
gawandenanda734@gmail.com

kaydyanewaga_admin

leave a comment

Create Account



Log In Your Account