२०१९ पासून नर्मदेवरील सरदार सरोवर वर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा वाढदिवस हजारोंचे जीव धोक्यात घालून साजरा केला जातोय. गुजरात सरकारचे मुख्यमंत्री, मंत्री स्वतः वाढदिवस साजरा करण्यासाठी धरणावर असतात आणि जणू एखादं शौर्य साजरं करावं तसं मोदींचा वाढदिवस धरणाच्या अधिकतम उंचीपर्यंत पाणी साठवलं जातं.
दरवर्षी या नादात सरोवर परिसरातील घरं पाण्याखाली जातात, लोकांची पाळीव जनावरं, मौल्यवान वस्तू वाहून जातात, हजारोंचं स्थलांतर होतं. पण वाढदिवसाचा क्रूर खेळ काही थांबत नव्हता. यंदा मेधा पाटकर ग्रामस्थांसह पाण्यात जाऊन उभ्या राहिल्या.
यंदा सरकारची अधिकतम उंचीपर्यंत पाणी साठवण्याची हिंमत झाली नाही. त्यामुळे यंदाचा बुडित क्षेत्रांचा धोका टळला. यापुढेही खबरदारी घेण्याचं आश्वासन प्रशासनाने दिलंय. मेधाताईंनी त्यामुळे आंदोलन स्थगित केलं.
नर्मदा खोऱ्यातील सरदार सरोवर परिसरातील छोटी कसरावद (तह, जिल्हा बरवानी, मध्य प्रदेश) गावात ३६ तास चाललेला जलसत्याग्रह १५ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता संपला.
सदर खोऱ्यातील रहिवासी नागरिक आणि स्थानिक आमदार राजन मदलोई आणि तहसीलदार परमारही रविवारी आले. महिला, शेतकरी मजूर, पशुपालकांचे प्रतिनिधी, मच्छीमार, बोटीवाले आदी, सामाजिक कार्यकर्त्या कमला यादव, भगवान सेप्ता, सुशीला नाथ, केसर सोमरे, कैलाश यादव, मेधा पाटकर आणि जलसत्याग्रही व नर्मदा आंदोलनाच्या कार्यकारिणी सदस्यांची तक्रार ऐकल्यावर उच्च अधिकाऱ्यांनी २०२३ सारखी विध्वंसक, अनैसर्गिक आणि बेकायदेशीर डुबकी होणार नाही, याची खात्री दिल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आलं.
बडवणीच्या जिल्हाधिकाऱ्यांपासून राज्य सरकारच्या अपर मुख्य सचिवांपर्यंत सर्वांनी पुनर्वसनाचं उर्वरित काम गतिमानतेने व चर्चा संवादातून तडीस नेण्याचं आश्वासन दिलंय.