मुबारक अल रशीद हा कुवेतिअन गायक सध्या चांगलाच चर्चेत आहे. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कुवैत दौऱ्यात भारतीयांनी केलेल्या हला मोदी या स्वागत कार्यक्रमात रशीदने 'वंदे मातरम' सादर केलं म्हणे ! संघीभाजपाई हिंदुत्ववाद्यांच्या समाजमाध्यमांतील खात्यांवरून तसा विडिओही प्रसारित करण्यात आलाय. मोदींच्या नेतृत्वामुळे जगात इतका फरक पडलाय की मुस्लिमही 'वंदे मातरम' गाऊ लागले, असा दावा संघीभाजपाईंनी केलाय. शिवाय, भारतातल्या मुस्लिमांना लक्ष्य करायला या टोळधाडी विसरलेल्या नाहीत.
'मीडियाभारत' ने कुतुहलाने तो विडिओ ऐकला, ज्यात मुबारक अल रशीद 'वंदे मातरम' सादर करतोय आणि त्याला भारतीयांचा जोरदार प्रतिसाद मिळतोय. विडिओ पहिल्यांदा ऐकताना 'मीडियाभारत'ला ही कल्पना नव्हती की हा कलावंत कोण आहे, म्हणून 'मीडियाभारत'ने त्यासाठी गुगल सर्च केलं, पण सदरबाबत काहीच सापडेना !
कुवैत, मोदी, वंदे मातरम् असं हुडकून पाहिलं तर कुवैतमधील दौऱ्यात मोदी मोदी, वंदे मातरम् अशा घोषणा दिल्या गेल्याच्या बातम्या आणि 'एएनआय' चा विडिओ सापडला. व्हिडिओत घोषणा फक्त ऐकू येत होत्या, पण घोषणा देणारे लोक दिसत नव्हते. जे दिसत होते, ते घोषणा देत नव्हते.
'मीडियाभारत'ला मोठं आश्चर्य वाटलं. कुवैतीअन कलावंत कुवैतमधील मोदींच्या कार्यक्रमात 'वंदे मातरम' सादर करतो आणि भारतीय मीडियात प्रपोगंडा नाही, हे अशक्यप्राय आहे. पण खरंच कुठेच बातमी नव्हती. त्यामुळे समाजमाध्यमात प्रसारित विडिओ फेक असल्याचा संशय निर्माण झाला आणि मग विडिओ कुठला आहे, कलावंत कोण आहे, विडिओतील मूळ गाणं नेमकं काय आहे, याचा शोध सुरू झाला.
मुबारक अल रशीद या कुवेतिअन गायक कलावंताने मोदींच्या कार्यक्रमात 'सारे जहां से अच्छा' हे देशभक्तीपर गीत गायल्याचं 'अमर उजाला' सारख्या माध्यमात वाचनात आलं. पण 'सारे जहां से अच्छा' चा विडिओ सापडेना ! प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं ट्वीटर खातं धुंडाळलं, पण हाती काही लागलं नाही. मुबारक अल रशीद चे 'हला मोदी' कार्यक्रमात गातानाचे जितके विडिओ सापडले, ते 'वंदे मातरम'चे होते.
मुबारक अल रशीद चे 'सारे जहां से अच्छा' किंवा 'वैष्णव जन तो' गातानाचे विडिओ मीडियासमोर बोलतानाच्या वेळचे सापडले. पण मोदींच्या कार्यक्रमात मुबारक अल रशीद ने 'सारे जहां से अच्छा' गातानाचा विडिओ सापडला नाही. तो सापडला मुबारक अल रशीदच्या इन्स्टाग्रामवर !
https://www.instagram.com/reel/DD4Ws73OuaM/?igsh=MWhuc3RkZWI4djhseA==
सुनिश्चित काय झालं, तर मुबारक अल रशीद या कुवेतिअन गायक कलावंताने नरेंद्र मोदींच्या कुवेतमधील दौऱ्यात भारतीयांनी आयोजित केलेल्या 'हला मोदी' या स्वागत कार्यक्रमात 'सारे जहां से अच्छा' हे गीत गायलं, पण संघीभाजपाईंनी तोच विडिओ भलत्याच आवाजातलं 'वंदे मातरम' घुसडून पसरवला. शक्यता ही आहे की भारतीय माध्यमांनी 'वंदे मातरम' वाला विडिओ खोटा पडू नये, म्हणून 'सारे जहां से अच्छा' वाला विडिओ दडपला.
समाज माध्यमात असाही विडिओ सापडतो, ज्यात 'सारे जहां से अच्छा' नंतर मुबारक अल रशीदने 'वंदे मातरम' सादर केलं. पण या विडिओची ठाम पुष्टी होत नाही.
गंभीर गोष्ट पुढे आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने 'हला मोदी' कार्यक्रमासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केलंय. मुबारक अल रशीदने 'सारे जहां से अच्छा' हे देशभक्तीपर गीत सादर केल्याचा पुसटसाही उल्लेख त्या प्रसिद्धीपत्रकात नाही. 'सारे जहां से अच्छा' हे देशभक्तीपर गीत कवी मोहंमद इक्बाल यांनी लिहिलेलं असून, त्यांच्याबद्दल हिंदुत्ववादी संघटनांना आकस आहे, त्यामुळेच की परराष्ट्र मंत्रालयाने 'सारे जहां से अच्छा' हे गीत सादर झाल्याचा उल्लेख टाळला की काय, असा संशय घ्यायला वाव आहे.
https://www.mea.gov.in/press-releases.htm?dtl/38856/Prime_Minister_addresses_Indian_Community_at_Hala_Modi_event_in_Kuwait
एका बाजूला जे देशभक्तीपर गीत प्रत्यक्षात सादर झालं, त्याचा प्रसिद्धीपत्रकात उल्लेख करणं सोडाच, परंतु भारतीय माध्यमात गीताचा विडिओही कुठे येणार नाही, याची खबरदारी आणि दुसऱ्या बाजूला आपल्या टोळधाडीकडून तोच विडिओ 'वंदे मातरम' घुसडून पसरवला जाणं आणि त्यावर देशांतर्गत भावनिक राजकारण साधणं...यातून संघभाजपा, केंद्र सरकार, भारतीय माध्यमं आणि हिंदुत्ववादी टोळधाडी किती संघटितपणे काम करतात, आणि या सगळ्यांना परदेशातील भारताच्या गौरवपूर्ण उल्लेखापेक्षा राजकारण आणि निव्वळ राजकारण किती प्रिय आहे, ते दिसून येतं.