अव्यवस्थेला व्यवस्थित उत्तर
कल्याण पूर्वेकडील तिसगाव नाका येथील सहजीवन रेसिडेन्सीतील रहिवाशांना पप्पू बिल्डरने बांधलेल्या इमारतीत २०१५ मध्ये ताबा मिळाला, त्यावेळी इमारतीच्या मागच्या बाजूस कुंपणभिंतीची थोडी जागा बिल्डरकडून खुली सोडण्यात आली होती, जिथून इमारती बाहेरचे नागरिक इमारतीच्या आवारातून मुख्य रस्त्यावर ये-जा करू शकत होते.
रहिवाशांचा या गोष्टीला सुरुवातीपासून आक्षेप होता, परंतु मुख्य रस्त्यावरील मालवण किनारा या हाॅटेलचा मालक प्रभाकर गायकवाड याला बंगल्यातून हाॅटेलला जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून बिल्डरने खास त्याच्यासाठी ती सोय ठेवली होती. त्या विरोधात रहिवासी सुरुवातीपासून होते व त्यांनी महानगरपालिकेत तसा पत्रव्यवहारही सुरू केलेला होता.
मुख्य रस्त्यावरून सहजीवन सोसायटीत येणाऱ्या पोहोच रस्त्यावर मालवण किनारा या हॉटेलात येणाऱ्या ग्राहकांच्या गाड्या पार्क केलेल्या असतात व अनेकदा गाड्यांत बसून ग्राहकांचं नशापाणी सुरू असतं. तोसुद्धा सोसायटीचा अडचणीचा विषय होता.
अखेर सोसायटीने कुंपण भिंतीची ती खुली जागा बंद करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा प्रभाकर गायकवाड यांनी एका टेम्पोच्या धडकेने ते बांधकाम पाडून टाकले. रहिवाशांनी त्याची पोलिसात तक्रार केली, परंतु पोलिसांनी ती नोंदवून घेतली नाही. पोलिसांचा बंदोबस्त घेऊन रहिवाशांनी जेव्हा कुंपण भिंत बांधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा प्रभाकर गायकवाड याने पोलिसांसमोरच सहजीवन सोसायटीतील रहिवाशांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, असा सोसायटीचा आरोप आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि कोळशेवाडी पोलीस यांच्या टोलवाटोलवीत सहजीवनचे रहिवासी बरेच दिवस सदरचा त्रास सहन करत राहिले. त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडेही दाद मागितली खासदार शिंदेंनी पोलिसांना तोंड देखल्या सूचना केल्या खऱ्या, परंतु प्रभाकर गायकवाड याला पाठीशी घालण्याच्या पोलिसांच्या वर्तनात काहीच फरक पडला नाही, त्यामुळे अखेर सहजीवन सोसायटीने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आणि आता ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेजवळ धरणे आंदोलन करत आहेत.
सोसायटीत एकूण २३० सदनिका असून सर्व घरातील स्त्री-पुरुष, मुलं, वयोवृद्ध या धरणे आंदोलनात सामील आहेत. महापालिका आणि पोलिसांकडून अजूनही दाद मिळत नाही हे लक्षात आल्यावर आता रहिवाशांनी धरणे आंदोलन बेमुदत उपोषणात बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
या दरम्यान सोसायटीची कुंपण भिंत बांधून देणं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत नाही, असा खुलासा प्रशासनाने केलाय. पण, आम्ही मनपाकडून भिंत बांधून मागत नसून तत्संदर्भातील बांधील कर्तव्य निभावावे, अशी मागणी करीत असल्याचं स्पष्टीकरण सोसायटीने केलय. महापालिकेने हात वर केल्यावर आता कोळसेवाडी पोलीसही सोसायटीला कुंपण भिंत बांधण्याच्या कामासाठी बंदोबस्त द्यायला तयार नाहीत. निवडणूक आचारसंहिता लागू झाली की आंदोलन दडपावं, असा प्रशासनाचा घाट असल्याचं कळतंय.
हा वाद चर्चेने मिटावा यासाठी काही स्थानिक राजकारणीसुद्धा प्रयत्नशील आहेत, परंतु ज्या पद्धतीने प्रभाकर गायकवाड याचं दबावतंत्र सुरू आहे, ते पाहता ही घटना एखाद्या चिंताजनक वळणावर जाऊ शकते, अशीही शक्यता आहे, त्यामुळे राज्य सरकारचा या प्रकरणात हस्तक्षेप आवश्यक झाला आहे.
सोसायटीचा भूखंड हा संपूर्णपणे सोसायटीच्या मालकीचा असतो आणि त्या आवारात सुरक्षेच्या उपाययोजना करणे हा सोसायटीचा अधिकार आहे ; त्या दृष्टीने त्यांची कुंपण भिंत सर्व बाजूंनी बंदिस्त असणं हे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे.
नेमक्या सुरक्षेच्या प्रश्नावरच कल्याण डोंबिवली महानगरपालिका, शहर वाहतूक पोलीस आणि कोळशेवाडी पोलीस हे बोटचेपी भूमिका घेत असल्याने सदर प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय असणार, हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे .
या सोसायटीतील आंदोलनात उतरलेल्या महिला ‘सरकार नाही भानावर, लाडक्या बहिणी वाऱ्यावर’ अशा घोषणा देत आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे राज्य सरकारने लागू केलेल्या दीड हजार रुपयांच्या लाडकी बहिण योजनेपेक्षा आम्हाला आमची सुरक्षा अधिक महत्त्वाची आहे , असा स्पष्ट संदेश या महिलांनी सरकारला दिलेला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाला मतांसाठी सर्व बाजूंच्या लोकांचे खांदे दाबावे लागतात आणि प्रस्तुत प्रकरणात रहिवाशांना त्रास देणारी व्यक्ती सत्ताधारी आघाडीशी संबंधित असल्याने सत्ताधारी शिंदे शिवसेना आणि भाजपा हे प्रकरण कसं हाताळते याकडे कल्याणकरांचं लक्ष लागून आहे.