अनुसूचित जातीच्या अबकड वर्गीकरणावरुन बौद्ध तरुणांनी मांग समाजाची खिल्ली उडवणे हा शहाणपणा नाही. यातून हाती फार काही लागणार नाही.
अबकड वर्गीकरणाचा उद्देश मांगांना न्याय देण्यापेक्षा बौद्ध समाजाचे खच्चीकरण करणे असल्याचे बौद्धांना वाटते. उपवर्गीकरणासाठी जी काही समिती नेमली आहे त्या समितीचा अभ्यास पूर्ण झाला असून येत्या दोन महिन्यात सरकार त्यासंबंधी निर्णय घेईल अशी शक्यता आहे.
अबकड वर्गीकरणाद्वारे मांगांना बौद्धांच्या विरोधात पुढे केले जात असले तरी यामागे डोकं कोणाचं आहे, हे सांगायची आवश्यकता नाही.

उपवर्गीकरणाच्या बाजूने सुप्रीम कोर्टाच्या बेंचने ६ विरुद्ध १ असा निर्णय दिल्यामुळे हे आरक्षण कायदेशीर ठरले असून त्याला चॅलेंज करणे आता सोपे राहिलेले नाही. आता केवळ या उपवर्गीकरणामुळे बौद्धांचे होणारे संभाव्य नुकसान कसे भरून काढावे हा महत्वाचा प्रश्न आहे.
मांगांची खिल्ली उडऊन हे नुकसान भरून काढता येणार नाही. त्याऐवजी उपवर्गीकरणाची प्रक्रिया आणि अंमलबजावणी अधिक न्यायोचित कशी होईल याकडे बौद्धांनी अधिक लक्ष दिले पाहिजे.

बौद्धानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर, फुले, शाहूंना मानणारी महाराष्ट्रातली दुसरी जात म्हणजे मांग. प्रा. सुकुमार कांबळे आणि आता प्रबुद्ध साठे यांच्यासारखे आंबेडकरवादी नेते, कार्यकर्ते या समाजात संख्येने बौद्ध वगळता कोणत्याही इतर जातीपेक्षा जास्त आहेत.
मांग समाजाचा आंबेडकरवादाकडे होणाऱ्या प्रवासात अडथळे उभे करण्यासाठी उपवर्गीकरणाचा भाजपकडून हत्यारासारख उपयोग केला जात आहे.

एकीकडे मांग युवकांचे हिंदुत्वीकरण करायचे आणि दुसरीकडे त्यांच्यासमोर बौद्ध हा शत्रू म्हणून उभा करून मांगांचे राजकीय संघटन करायचे अशी खेळी आहे हे स्पष्ट आहे.
मांगांचा द्वेष करून आणि या मागणीला विरोध करून आपण या खेळीला बळी पडत आहोत. विष्णू कसबे, लक्ष्मण ढोबळे सारखे लोक जे काही विष ओकत आहेत ते बौद्ध आणि मांग दरी मोठी व्हावी यासाठी, ही बाब ओळखून बौद्ध तरुणांनी व्यक्त होताना विचारपूर्वक व्यक्त व्हावे असे वाटते.

साक्य नितीन
सामाजिक कार्यकर्ता व राजकीय अभ्यासक / विश्लेषक