उल्हासनगरी राजकारण : राजकारणातील सुंदोपसुंदीचं नेमकं उदाहरण !

उल्हासनगरी राजकारण : राजकारणातील सुंदोपसुंदीचं नेमकं उदाहरण !

उल्हासनगरी राजकारण : राजकारणातील सुंदोपसुंदीचं नेमकं उदाहरण !

शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कालानी कुटुंबाच्या कब्जात आहे.‌ कब्जात यासाठी की जिल्हाध्यक्षपद कुटुंबात असतानाही शरद पवारांचा पक्ष वाढवावा, म्हणून पप्पू कालानी आणि ओमी कालानीने कधी काडीही हालवलेली नाही.‌ पण शरद पवारांना पूर्ण विश्वास आहे की संविधानाचं, पुरोगामी विचारांचं, धर्मनिरपेक्षतेचं उत्तम संरक्षण आणि संवर्धन पप्पू कालानी आणि ओमी कालानीशिवाय इतर कोणीच चांगलं करू शकत नाहीत.

जितेंद्र आव्हाड तर ओमी कालानीने चालवलेल्या टीम ओमी कालानीच्या अधिवेशनासाठी पार गोव्यापर्यंत हजेरी लावून आले होते. पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काय झालं, असा जाब विचारायची हिंमत काही आव्हाडांची झाली नाही.

खरं तर कालानीज कोणत्याच पक्षातील कोणत्याच नेत्याला किंमत देत नाहीत. मग शरद पवार असोत की देवेंद्र फडणवीस ! जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे, रवींद्र चव्हाण वगैरे त्यांच्या गिनतीतही नसतात. पण या मंडळींना उगीचच वाटत आलंय की कालानींना हाताळण्याचं कौशल्य फक्त आपल्याकडेच आहेत. कालानीजना केवळ आणि केवळ सत्तेसोबत राहण्यात रस आहे. २०१७ ला ते भाजपासोबत गेले आणि २०१९ ला मविआची सत्ता येताच राष्ट्रवादीत परत आले. भाजपाची सत्ता येताच पुन्हा स्वतंत्र चूल बांधली.

शरद पवारांचाच कित्ता अजित पवारांनी गिरवला. पक्षाकडे भारत राजवानींसारखा अजित पवारांशी अगदी निष्ठावान असलेला कार्यकर्ता असताना अजित पवार आनंद परांजपेच्या नादी लागून कालानीच्या प्रतिक्षेत गेले वर्षभर जिल्हाध्यक्षपदी नेमणूक करण्याचं टाळत होते.

टीम ओमी कालानीच्या एका निकटवर्तीयाने अलिकडेच जाहिरपणे वक्तव्य केलं होतं की मनपा निवडणुकीसाठी आमची अजित पवार, एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण सगळ्यांशी चर्चा सुरू आहे. पण म्हणून शरद पवारांनी त्यांचं जिल्हाध्यक्षपद हिसकावून घेतलं नाही.

उद्या जर पप्पू कालानीने सांगितलं की ओमी कालानी महायुतीसोबत गेलाय, पण मी आणि सून राष्ट्रवादीतच आहोत किंवा ओमी कालानीने शरद पवारांना सांगितलं की आम्ही टीम ओमी कालानी म्हणून महायुतीच्या पाठिंब्यावर निवडून येऊन मागाहून वेगळा गट करून तुमच्याकडेच येणार आहोत, तर तेवढ्या आशेवरही शरद पवार जिल्हाध्यक्षपद त्यांच्याकडेच ठेवतील.

राजकारणातले खरे चाणक्य बड्या राजकीय पक्षांना आपल्या तालावर नाचवणारे शहरातील, गावांतील कालानीज सारखे लोक आहेत. आपण त्यांच्यासमोर झुकणाऱ्या शरद पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारांना चाणक्य वगैरे समजतो.

भाजपाकडे आपली डाळ शिजत नाही म्हटल्यावर कालानीजनी आता एकनाथ शिंदेंचं शेपूट धरलंय. त्याला ते ओमी कालानी आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यातील 'दोस्ती का गठबंधन' म्हणतात.

कालानीज लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदेंसोबत म्हणजेच अप्रत्यक्ष महायुतीसोबत होते. विधानसभा निवडणुकीत त्यांनी मविआची उमेदवारी मिळवली. मनपा निवडणुकीत ते पुन्हा महायुतीसोबत असणार आहेत.‌ आम्ही श्रीकांत शिंदेंसोबत आहोत, अशी जरी सारवासारव टीम ओमी कालानी करत असली तरी खासदार श्रीकांत शिंदेंनी समाजमाध्यमात घोषित केलंय की टीम ओमी कालानीने महायुतीला पाठिंबा दिलाय.

या पार्श्वभूमीवर मविआची हालत उल्हासनगरात दयनीय आहे. थोड्याबहुत फरकाने अशीच परिस्थिती महाराष्ट्रात आहे.

धनदांडगे, भ्रष्टाचारी, गुन्हेगार यांना कुठलाही आचारविचार नसतो आणि आचारविचार नसलेल्या लोकांच्या जीवावर भाजपाविरोधात लढलं जाऊ शकत नाही. भारतीय राजकारणात नेमकं काय चाललंय, हे स्पष्ट चित्र डोळ्यासमोर असतानाही त्यातून जराही अकलेचा धडा मविआने अद्याप घेतलेला दिसत नाही. पण मविआच्या कार्यकर्त्यांनी धडा घ्यायला हरकत नाही.

निवडून येण्याच्या क्षमतेचा बहाणा करून जर निवडणुकीचं तिकीट गुंड, मवाल्यांकडेच जाणार असाल तर कार्यकर्त्यांनी तरी पक्षांमध्ये खर्डेघाशी का करावी ? लवकरात लवकर पक्षीय राजकारण सोडून वैयक्तिक राजकारण सुरू करा किंवा समविचारी कार्यकर्त्यांनी स्थानिक आघाडी करून निवडणूक लढवा. यापुढे आपली ताकद, वेळ, पैसा विचारहीन तत्वहीन राजकीय पक्षांसाठी वापरू नका !

 

 

 

राज असरोंडकर 

संपादक, मीडिया भारत न्यूज

संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ

Raj Asrondkar

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account