बेपत्ता मुलामुलींच्या आईवडिलांसोबत संवेदनाहीन वर्तन केल्यास कारवाईची तंबी !

बेपत्ता मुलामुलींच्या आईवडिलांसोबत संवेदनाहीन वर्तन केल्यास कारवाईची तंबी !

बेपत्ता मुलामुलींच्या आईवडिलांसोबत संवेदनाहीन वर्तन केल्यास कारवाईची तंबी !

कायद्याने वागा लोकचळवळ आणि कल्याण विकासिनीच्या आंदोलनानंतर पोलिस आयुक्तांचे आदेश जारी

हरवलेल्या / बेपत्ता लहान मुलामुलींच्या तपासाच्या प्रगतीबाबत वेळोवेळी त्यांचे आईंवडील अथवा नातेवाईंकांना विश्वासात घेवून अवगत करावं. त्यांना दिलासा मिळेल अशा प्रकारचा आश्वासक संवाद अथवा समन्वय ठेवावा. जेणेकरुन त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये झालेल्या घटनेमुळे झालेला मनस्ताप व अस्वस्थता कमी करण्यास मदत होईल. तसंच सदरचं संभाषण संवेदनशील व पारदर्शी असावं, अशा स्पष्ट सूचना वजा आदेश ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी आयुक्तालय क्षेत्रातील सर्व पोलिस कर्मचारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, बेपत्ता व्यक्तिंच्या तपासाबाबत राज्याच्या पोलिस महासंचालकांनी जारी केलेल्या मार्गदर्शक निर्देशांची गांभिर्याने दखल घेवून त्यानुसार कार्यवाही न केल्यास कारवाईची तंबीही पोलिस आयुक्तांनी दिली आहे. सदरबाबत नव्याने आदेश जारी व्हावेत, ही कायद्याने वागा लोकचळवळ आणि कल्याण विकासिनीची मागणी होती.

कायद्याने वागा लोकचळवळ आणि कल्याण विकासिनीने ९ सटेंबर २०२५ रोजी ईमेलद्वारे पोलिस आयुक्तांना निवेदन पाठवलेले होते व त्यात १६ सप्टेंबर रोजी आयुक्त कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला होता. या आंदोलनात श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाचे ठाणे शहर समन्वयक, अजय भोसले, भारतीय महिला संघटनेच्या निर्मला पवार, समता विचार प्रसारक संस्था, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे भास्कर गव्हाळे तसंच बहुजन विकास संघाचे प्रवक्ते नरेश भगवाने यांचाही सहभाग होता.

या संदर्भाने महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बलरामसिग परदेशी, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे, परिमंडळ -३ चे उपायुक्त अतुल झेंडे, परिमंडळ ४ चे उपायुक्त मा.सचिन गोरे, अपर पोलिस आयुक्त संजय जाधव यांच्याशी कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर आणि कल्याण विकासिनीचे अध्यक्ष ॲड. उदय रसाळ यांची गेले आठवडाभर सातत्याने सकारात्मक चर्चा झालेली होती.

सोमवारी संध्याकाळी उशीरा अपर पोलिस आयुक्त संजय जाधव यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करण्यासंदर्भात एक ताजं परिपत्रक नव्याने त्वरीत जारी करण्यात आलं. मुख्य मागणीची पूर्तता झाल्यामुळे मंगळवार, १६ सप्टेंबर, २०२५ रोजी ठाणे पोलिस आयुक्त मुख्यालयासमोर एक दिवसीय धरणं स्थगित करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला.

मात्र, कल्याणातून राजस्थानात पळवून नेलेली व परतलेली मुलगी, कल्याणातीलच एका रिक्षाचालकाची मुलगी, युपीतून कल्याणात आलेल्या मुलींबाबत घडलेली घटना, त्यातील अल्पवयीन मुलीचा शोध याबाबत संबंधित पोलिस ठाण्यांनी काय भूमिका निभावली, त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलंय का, संबंधित मुलींच्या अपहरण प्रकरणात पोलिस मूळ गुन्हेगारांपर्यत पोहचलेत का, ज्या मुली अद्यपही बेपत्ता आहेत त्यांना शोधण्याचे पोलिसांनी काय प्रयल केले, आपलं कार्यक्षेत्र नाही, एवढ्यावरून बलात्काराच्या आरोपीला सोडून दिलं जाऊ शकतं का, उपरोक्त नमूद सर्व प्रकरणांत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं पालन केलं गेलंय का, याबाबत चौकशीची व तिचा अहवाल विहित मुदतीत सर्वजनिक करण्याची सोबतच, निवेदनात नमूद असलेल्या तसंच नमूद नसलेल्या ठाणे आयुक्तालय क्षेत्रतील बेपत्ता मुलामुलींना, महिलांना, व्यक्तिंना हुडकून काढण्याची एक विशेष धडक मोहिम हाती घेण्यात यावी, या मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत. सदर बाबत गरज भासल्यास आंदोलन करण्याचा अधिकार अबाधित ठेवून आहोत, असं आंदोलक संघटनांनी आयुक्तांना कळवलं आहे. 

Raj Asrondkar

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account