कविता मोरवणकर यांची 'उद्याचा दहशतगर्द अंधार' मधील कविता संवेदनशील आणि तितकीच विचारी माणसाचं जगणं भोवंडून टाकणाऱ्या वर्तमानाची टोकदार कविता आहे.
काही बोलू नये, काही विचार करू नये; एवढ्या दडपशाहीने सभोवतालचा अंधार आपल्याला पोटात घेतो आहे. यातून उजेडाचा टीपूसही दिसू नये, अशा भयाण काळाला सामोरे जाऊन त्यातील अक्राळविक्राळ स्वरूप नेमकेपणाने दाखविण्याचा यशस्वी प्रयत्न या कवितेने केला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आजच्या काळाची ही कविता आहे.

आजच्या बेबंदशाहीत काहीच कळत नसल्याने आपणच कोमात गेल्याचे सांगताना, कवयित्री निष्ठुर कोरड्या झालेल्या समाजमनाचे प्रातिनिधिक चित्र उपहासात्मक शब्दातून व्यक्त करते, तेव्हा या कवितेचे वाचक म्हणून आपण अंतर्मुख होत जातो. तरीही खऱ्या अर्थाने मानवतेच्या जगण्याची आस बाळगताना, कुठल्याच आदिबंधात न मावणारं माणूसपण जपण्याची भाषा ही कविता बोलते. म्हणूनच ती आज जात-धर्मात विभागले गेलेल्या खळखळाटी जगण्याला धडकवून देते. प्रत्येक माणसाने समष्टीशी एकरूप होण्याचे आवाहन करते.
पूर्वी भेदाची उतरण जात आणि धर्माची होती. आता मात्र जात-धर्माबरोबरच माणसाच्या मेंदूत अनेक भेदाचे स्तर निर्माण झाले आहेत. या सगळ्याची चिकित्सा तीव्रतेने ही कविता करत असल्यामुळे, समग्र जगण्याचं आकलन 'उद्याचा दहशतगर्द अंधार' मधून व्यक्त होतं. त्यामुळेच आजच्या समकालीन मराठी कवितेत या कवितेचे मोल मोठे आहे.

सततच्या दडपणाचं भयकंपित जगण्याचं कथन या कवितेच्या गाभ्याशी आहे. या कवितेचे अर्थनिर्णयन समजून घ्यायचे असेल तर भविष्य, वर्तमान आणि भूतकाळालाही आपल्याला समजून घ्यावं लागतं.
संकुचित वृत्तीला नकार आणि विद्रोहाचा स्वीकार ही भावना कवितेच्या केंद्रस्थानी असल्यामुळे, या कवितेचे भविष्य उज्वल आहे. हे निश्चित!

अजय कांडर
ज्येष्ठ कवी,पत्रकार
'उद्याचा दहशतगर्द अंधार'
प्रभा प्रकाशन - कणकवली
मूल्य/१६० + अधिक टपाल खर्च
संपर्क - ९४०४३९५१५५