डीएमडी (Duchenne Muscular Dystrophy) हा एक दुर्मिळ जनुकीय आजार आहे जो प्रामुख्याने मुलांमध्ये आढळतो, विशेषतः मुलांवर त्याचा परिणाम होतो. हा आजार डायस्ट्रोफिन नावाच्या प्रथिनाच्या कमतरतेमुळे होतो, जे स्नायूंच्या पेशींच्या रचनेसाठी आणि कार्यासाठी आवश्यक आहे. डायस्ट्रोफिनच्या अभावामुळे स्नायू हळूहळू कमकुवत होतात आणि नुकसान होतं. हाच आजार झालेल्या रत्नागिरीतील क्षितीज रहाळकरने दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलंच आणि पुढेही कायद्याचं शिक्षण घेण्याची जिद्द आहे.
क्षितिज रहाळकर तीन वर्षांचा असल्यापासून नवनिर्माण इंग्लिश मीडियम हायस्कूलचा विद्यार्थी आहे. ड्यूशन मस्क्युलर डिस्ट्रॉफी DMD ह्या लाखात एकालाच होणाऱ्या असाध्य आजारानं त्याला ग्रासलं आणि चौथ्या इयत्तेपासून त्याला व्हीलचेअर सुरू झाली. त्यांच्यात जगण्याची एक दुर्दम्य इच्छाशक्ती होती. काहीही झालं तरी मी याच शाळेतून दहावी पास होईन, या जिद्दीच्या बळावरच क्षितिजने आजारावर मात करत दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंच.

क्षितीजच्या या अदभूत यशस्वीतेत त्याची आई गौरी रहाळकर यांचं मोठं योगदान आहे. आजच्या पालकांसाठी त्या एक आदर्श ठरल्या आहेत.
आपल्या मुलाच्या आजाराची कल्पना आईवडिलांना होती. क्षितीज हा अत्यंत हुशार , बुध्दिमान आणि जिद्दी मुलगा. शालेय शिक्षण पूर्ण करायचंच हा त्याचा ध्यास. नवनिर्माण ही त्याची विशेष आवडती शाळा. गौरी रहाळकर यांच्यासाठी क्षितीजचं विश्व हेच त्यांचं स्वत:चं विश्व झालं होतं. त्याच्यासाठी गौरी यांनी स्वत:ला पूर्ण झोकून दिलं. रोज क्षितीजला शाळेत घेऊन येणं, वर्गात बसवणं, त्याला विविध वाचन खेळ यांत गुंतवत त्याच्या विस्तारीत प्रगल्भतेला अवकाश उपलब्ध करून देणं हा गौरी यांचा नित्यक्रम झाला होता.

डीएमडी हा आजार X-संबंधित रीसेसिव्ह जनुकीय दोषामुळे होतो, जो डायस्ट्रोफिन जनुक (DMD gene) मध्ये उत्परिवर्तनामुळे उद्भवतो. ज्यामुळे स्नायुंची कमजोरी, विशेषतः पाय आणि कूल्ह्यांमध्ये, जी वयाच्या तिसऱ्या ते पाचव्या वर्षांपासून दिसू लागते. चालण्यात अडचण होणं, वारंवार पडणं आणि उडी मारणे किंवा पायऱ्या चढण्यात त्रास होणं, गट्स वॉडलिंग (हंसासारखे चालणे) आणि पायाच्या बोटांवर चालावं लागतं, स्नायूंचा ताठरपणा आणि वेदना, आजाराच्या प्रगत अवस्थेत, श्वसन आणि हृदयाच्या स्नायूंवर परिणाम होऊन श्वासोच्छवास आणि हृदयाच्या समस्याही उद्भवतात. डीएमडी आजाराची लक्षणं नियंत्रित करण्यासाठी उपचार केले जाऊ शकतात, परंतु हा आजार पूर्ण बरा करणारा उपचार उपलब्ध नाही,
या अशा आजाराचा मुकाबला करत क्षितीज सीबीएस्सी बोर्डात उत्तम मार्कानी यशस्वी झाला. जीवन मरणाच्या एका ज्ञात अदृष्य रेषेवर क्षितीजचौ यश विलक्षण रोमांचित करणारं ठरलं. नवनिर्माण हायस्कूल शाळेच्या गेल्या १९ वर्षाच्या वाटचालीतील अत्यंत अभिमान वाटावी अशी ही घटना ठरली.

या वाटचालीत प्राचार्य अरविंद पाटील, सोनाली मसुरकर, नाझिया , अल्मास लांबे, गौरव गोसावी, यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेतील ॲाफीस बॅाय, मावशी ते सारे शिक्षक आणि सीमा मॅडम यांचा तर क्षितीजवर विशेष लळा !
बुध्दीबळ हा क्षितीजचा अत्यंत आवडीचा खेळ. ह्याच वर्षी नवनिर्माण सांस्कृतिक महोत्सवात त्याने व्हीलचेअरसह स्टेजवर जाऊन भाषण केलं होतं. त्याच्या प्रत्येक शब्दात अंतरंगात उसळणाऱ्या आनंदलहरी चेहऱ्यावर प्रतिबिंबीत होत होत्या. सर्व मुलांसाठी तो एक जिगरबाज, महत्वाकांशी आयकॅान होता.
दहावीला ६६% मार्क मिळाल्यावर त्याची लॅा शिकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आहे. ती पुर्ण करण्याची शक्ती आणि आयूष्य त्याला मिळावं, अशी प्रार्थना शाळेत सर्वांनी केली. शिक्षणाच्या प्रवाहातली क्षितीजची यशोगाथा अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांनाही प्रेरणादायी ठरली आहे.