सिंधुभवनचं भाडं आवाक्यात आल्याने उल्हासनगरातील कलावंतांमध्ये आनंद !

सिंधुभवनचं भाडं आवाक्यात आल्याने उल्हासनगरातील कलावंतांमध्ये आनंद !

सिंधुभवनचं भाडं आवाक्यात आल्याने उल्हासनगरातील कलावंतांमध्ये आनंद !

उल्हासनगर महानगर पालिकेच्या सिंधुभवन या प्रेक्षागृहाचं भाडं सरसकट १८ हजार इतकं आकारलं जात होतं, ते कायद्याने वागा लोकचळवळीच्या प्रयत्नांनी ३ ते ५ हजारांवर आलंय. उल्हासनगरातील कलावंत मंडळी यामुळे सुखावलीत.‌

उल्हासनगर पश्चिमेला राजीव गांधी सपना उद्यानालगत महानगर पालिकेची सिंधुभवनची इमारत आहे. तिथे तळमजला आणि पहिल्या मजल्यावर सभागृहं असून, दुसऱ्या मजल्यावर ३०० आसन क्षमतेचं वातानुकूलित प्रेक्षागृह आहे. तिथे महानगरपालिकेची ध्वनी व्यवस्थाही आहे. मात्र दिवसभराचं सरसकट १८ हजार इतकं भाडं महानगरपालिका आकारत असल्यामुळे कलावंत मंडळी सिंधुभवनकडे फिरकत नव्हती.

एखादा कार्यक्रम करण्यासाठी काही तासांसाठी सिंधुभवनचं आरक्षण करायचं झालं तरी महानगरपालिका दिवसभराचंच भाडं आकारत होती. आमचा ठराव दिवसभरासाठीचा आहे, असं मालमत्ता विभागातून अर्जदारांना सांगितलं जात होतं.

वास्तविक, सार्वजनिक बांधकाम विभागाने वास्तुचं भाडं ठरवून दिल्यानंतर ते तीन-तीन तासांमध्ये विभागणं मालमत्ता विभागाचं काम होतं, पण ते न झाल्याने नागरिकांना मोठा भूर्दंड पडत होता. जानेवारी, २०२५ मध्ये कायद्याने वागा लोकचळवळीला फातिमाबीसावित्री उत्सवासाठी १८ हजार भाडं भरावं लागलं होतं, तिथून संघर्ष सुरू झाला होता. जून महिन्यात संगीतकार गायक हेमंतकुमार यांना आदरांजलीपर कार्यक्रम करतेवेळी कायद्याने वागा लोकचळवळ आणि मनपा पुन्हा आमनेसामने आले.

कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक राज असरोंडकर यांनी मालमत्ता उपायुक्त स्नेहा कर्पे यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी तासांवर भाडं विभागलं गेलं पाहिजे, हे मान्य केलं आणि तसा प्रस्ताव आयुक्त मनीषा आव्हाळे यांना सादर केला. त्या प्रस्तावाला आयुक्तांनी मान्यता दिल्यामुळे सकाळ आणि दुपारच्या आरक्षणासाठी प्रत्येकी ३ हजार आणि संध्याकाळ व नंतरच्या आरक्षणासाठी अंदाजित ५ हजार इतकं भाडं आकारलं जाणार आहे.

यासाठी असरोंडकर यांनी आयुक्त मनीषा आव्हाळे आणि उपायुक्त स्नेहा कर्पे यांचे आभार मानले आहेत.

उल्हासनगर शहरात आता ठिकठिकाणी कराओके क्लब सुरू झाले असून, गायक व नाट्य कलाकारांची मोठी संख्या शहरात आहे. शिवाय, शहरात साहित्यिक चळवळही कार्यरत आहे. तासांवर भाडं आकारलं जाणार असल्यामुळे आता सिंधुभवनमध्ये नाट्य, संगीत, साहित्यिक करणं परवडणार आहे, त्यामुळे कार्यक्रमांची वारंवारता वाढेल आणि मनपाला उत्पन्न मिळेल, ज्यातून सिंधुभवनची देखभाल होऊ शकेल, असं राज असरोंडकर यांनी सांगितलं.

सिंधुभवनमध्ये अधिकाधिक उपक्रम सुरू व्हावेत, यासाठी मनपा प्रशासनाने तळमजला व पहिल्या मजल्याचं भाडं कमी करावं, अशी असरोंडकर यांची मागणी आहे.

शहीद जनरल अरुणकुमार वैद्य प्रेक्षागृहाचं भाडं जे एका खेळाला २५ हजार आकारलं जातं, ते १० हजारांवर आणण्यासाठी पाठपुरावा आणि गरज लागल्यास संघर्ष करणार असल्याचं असरोंडकर यांनी घोषित केलंय.

उल्हासनगरात कलावंतांनी केला राज असरोंडकर यांचा सत्कार : ( विडिओ इथे पाहा )

https://youtu.be/puq5wNeNppU?si=3goxPmiTzhYh4e27

Raj Asrondkar

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account