आसाममधला धेमाझी येथील एका शाळेच्या शिक्षकदिनाच्या कार्यक्रमातील एका चिमुकलीचा नृत्याचा विडिओ सध्या समाजमाध्यमात चर्चेत आहे. आज की रात मजा हुस्न का आंखों से लिजियें, असे शब्द असलेल्या गाण्यावर पहिल्या इयत्तेतील मुलीने कॅब्रेच्या पेहरावात नृत्य केलं, तेही शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात !
सुविद्या सिनिअर सेकंडरी आर ई एम स्कूल या शाळेने आपल्या फेसबुकवर पेजवर सदरबाबत सपशेल माफी मागितलीय. मुलीच्या आईनेच मुलीची नृत्याची तयारी करून घेतली होती व मुलीचा पेहराव केला होता आणि तिनेच तो विडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला, असा खुलासा शाळेने केलाय. अर्थात, आम्ही आईला किंवा मुलीला दोष देत नाही, कारण असं सादरीकरण होऊ न देणं ही आमची जबाबदारी होती, अशी कबुलीही शाळेने दिलीय.
आमच्या शाळेतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक लहान मूल (इयत्ता पहिली) एका हिंदी गाण्यावर नाचत असल्याचे दिसते जे तिच्या वयाला आणि तिने ज्या कार्यक्रमात भाग घेतला त्या कार्यक्रमाला योग्य नाही. अगदी ड्रेसही नव्हता. आम्ही सुविद्या परिवाराला स्वतःला खूप वाईट वाटतं की आम्ही तिच्या या कृत्याला वेळीच विरोध केला नाही. खरंतर आमचं त्याकडे एक प्रकारचं अज्ञान होतं कारण मुलगी इतकी लहान होती की तिच्याबाबतीत नकारात्मक विचार आला नाही. त्याचीही आम्हाला खंत वाटते. अर्थात, मुलगी थोडी मोठी असती तरीही नक्कीच परवानगी दिली नसती, असं शाळेने म्हटलंय.
आपली सुंदर भारतीय संस्कृती पुढील काळासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी आपण खूप सतर्क राहू. तीच चूक कधीच पुन्हा होणार नाही, असंही शाळेने खुलाश्यात नमूद केलंय.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांची मुख्यमंत्रीपदाची अर्धी अधिक कारकीर्द मुसलमानांच्या नावाने बोटं मोडण्यात गेलीय. दुसऱ्यांना दुषणं देत राहणं अर्थातच सोपं असतं, पण अनेकदा दिव्याखालचा अंधार दुर्लक्षित राहतो, हे त्यांना आता कळलं असेल. शिक्षण दिनाच्या कार्यक्रमात एखादी शाळा अशा प्रकारचं सादरीकरण होऊ देते, यावरून सरकारचा स्थानिक पातळीवर काय ‘धाक’ आहे, ते उघड होतं.
महत्त्वाची गोष्ट ही आहे की अशा घटनांतून मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित व्हायला हवा, त्यावर चर्चा व्हायला हवी, त्याऐवजी भारतीय संस्कृतीच्या सुरक्षेची काळजी शाळेला अधिक दिसते, इतकाच काय तो भाजपाई सरकारचा प्रभाव !