कायद्याने वागा लोकचळवळीचं मोठं यश
उल्हासनगर महानगरपालिकेने संपूर्ण शहराचं पाणीपुरवठ्याचं वेळापत्रक अखेर आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केलं आहे. कायद्याने वागा लोकचळवळीचा हा मोठा विजय मानला जातो. त्यामुळे बुधवार ७ मे २०२५ पासून घोषित धरणे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचं संघटनेचे उल्हासनगर अध्यक्ष प्रदीप कपूर यांनी सांगितलं.
उल्हासनगरातील पाणी समस्या सोडवण्याच्या दृष्टीने ज्या उपाययोजना कायद्याने वागा लोकचळवळीने आयुक्तांना सुचवल्या होत्या त्यातली वेळापत्रक ही आग्रही मागणी होती.

आता पुढचा पाठपुरावा जुनी वितरण व्यवस्था संपूर्णपणे बंद करण्यासाठी तसंच अनधिकृत जोडण्या तोडणे आणि नाल्यागटारांतील जोडण्या काढून टाकण्यासाठी असेल, असं कायद्याने वागा लोकचळवळीचे उल्हासनगर अध्यक्ष प्रदीप कपूर यांनी घोषित केलं आहे.
जुनी वितरण व्यवस्था बंद करण्याचं काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे, अशी माहिती पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता अशोक घुले यांनी दिल्याचं प्रदीप कपूर यांनी सांगितलं.
४०० कोटी खर्चूनही उल्हासनगरात पाणीसमस्या ‘जैसे थे’ का ?
उल्हासनगर शहराला लोकसंख्येच्या तुलनेत प्रतिदिन ५० दशलक्ष लिटर अधिकचा पाणीपुरवठा होतो, तरीही शहरात पाणी समस्या आहे, तिच्या मूळाशी पाणीमाफियांचं राजकारण असल्याचा खुला आरोप कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर सातत्याने करत आले आहेत. आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी त्याची गंभीर दखल घेत पाणीपुरवठा विभागातील राजकीय हस्तक्षेप मोडीत काढण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेले होते. त्यामुळे मतपेटी सांभाळण्यासाठी पाणीपुरवठा यंत्रणेत हेराफेरी करून आपापल्या भागातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध करून देणाऱ्या पाणी माफिया राजकारण्यांचं धाबं दणाणलं आहे.
वेळापत्रकाच्या घोषणेमुळे निश्चित अशी पाण्याची वेळ उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांची फरफट थांबणार आहे, तसंच रात्री अपरात्री पाणीपुरवठ्याची वेळ असू नये, ही कायद्याने वागा लोकचळवळीची मागणीही आयुक्तांनी मान्य केल्यामुळे पाण्यासाठी रात्र जागवण्याची वेळ नागरिकांवर येणार नाही, यातून विशेषतः महिलांना दिलासा मिळणार आहे, याबद्दल राज असरोंडकर आणि प्रदीप कपूर यांनी उल्हासनगर महानगरपालिकेचे आभार मानले आहेत.
उल्हासनगर महानगरपालिकेच्या वेबसाईटवर पाणीपुरवठा वेळापत्रक पाहण्यासाठी लिंक :
https://umc.gov.in/water-supply-department