महाराष्ट्रात राजकारणाचं काय खोबरं झालंय, ते सिंधुदुर्गातील राजकीय वादातून पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. भाजपा जिल्हाध्यक्षांनी पक्षातून ६ जणांचं निलंबन केलं, पण राग शिंदे शिवसेनेच्या आमदाराला आलाय. शिंदे शिवसेनेचा हा आमदार भाजपा जिल्हाध्यक्षाला दमबाजी करताना दिसतोय. आमदाराचे वडील भाजपा खासदार आहेत आणि भाऊ भाजपा आमदार आहे.
प्रकरण कुडाळ नगरपंचायतीशी संबंधित आहे. कुडाळ नगर पंचायतीत भाजप पक्षाच्या 'कमळ’ निशाणीवर निवडून आलेल्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, संध्या तेरसे, रामचंद्र परब यांचा अधिकृत श्री सिद्धिविनायक नगरविकास आघाडी हा गट स्थापन आहे.

यातील संध्या तेरसे आणि रामचंद्र परब वगळता इतर ६ जण भाजपाशी अंतर राखून आहेत. भाजपाच्या कुठल्याही कार्यक्रमांना ते उपस्थित राहत नाहीत की बॅनर झळकवताना पक्षीय संकेत पाळत नाहीत. भाजपा सोडून भलत्याच नेत्यांचे फोटो बॅनरवर असतात. अशी विविध कारणं देऊन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी ६ नगरसेवकांना पक्षातून निलंबित केलं.
निलंबित सहाही नगरसेवक राणे समर्थक आहेत. तीन पैकी २ राणे, नारायण राणे आणि नितेश राणे भाजपात आहेत. मग संबंधित नगरसेवक भाजपा कार्यक्रमात का उपस्थित राहत नसावेत, असा प्रश्न कोणालाही पडेल.
संबंधित नगरसेवकांना पक्षातून निलंबित केल्यानंतर भाजपा खासदार नारायण राणे किंवा अगदीच भाजपा आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली असती तरी समजण्यासारखं होतं. पण शिंदे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी त्यावर व्यक्त होणं अनाकलनीय आहे.
विषय इथेच थांबत नाही. एक्सवर निलेश राणेंच्या पोस्टखाली राणे समर्थक भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची औकात काढतात. पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार इथे फक्त नारायण राणेंना आहेत, अन्य कोणालाही नाहीत, असं राणे समर्थक सुनावतात.

यातून एक सूचित होतं की सिंधुदुर्गातील भाजपा नारायण राणेंची खाजगी मालमत्ता झालेली आहे. केवळ भाजपाच नव्हें तर शिंदे शिवसेनाही नारायण राणेंची खाजगी मालमत्ता आहे. एकनाथ शिंदेंचीही हिंमत नाही की ते निलेश राणेंना खडसावतील की भाजपांतर्गत मामल्यात तुम्ही का नाक खूपसताय ? पक्षवाढ ही गोष्ट किती तकलादू असते, हे इथे उघड होतं.
'मीडियाभारत'ने प्रभाकर सावंतांना संपर्क केला तेव्हा ते म्हणाले की निलेश राणे आमचेच आहेत. राजकीय तडजोड म्हणून ते शिंदे शिवसेनेकडून लढलेत. पण युती-महायुती असली तरी प्रत्येक पक्ष आपापली संघटनवाढ करण्यासाठी झटतोच. जी कारवाई केली गेलीय ती पक्षीय हिताच्या दृष्टीने केली गेलीय.
विशेष म्हणजे प्रभाकर सावंत यांनी सांगितलं की नगरसेवकांच्या निलंबनाची कारवाई वरिष्ठांच्या परवानगीनेच झालेली आहे.
इथे बोट जातं भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे ! रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे यांच्यातली धुसफूस सर्वश्रुत आहे. निलंबनाची कारवाई जरी प्रभाकर सावंत यांच्याकडून झालेली असली तरी ती रवींद्र चव्हाण यांनी नारायण राणेंना दिलेला झटका आहे, असं मानलं जातं. निलेश राणे त्यामुळेच चीडलेले दिसतात. निलेश राणेंची प्रतिक्रिया ही थेट प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनाच आव्हान आहे.

मुद्दा असा आहे की मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी एक फेसबुक पोस्ट केली होती, ज्यात म्हटलं होतं की महाराष्ट्रात मुख्यमंत्री होऊन गेलेल्या मराठा नेत्यांनी आजवर मराठा समाजासाठी काहीच केलं नाही, ते फक्त देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्या अपयशी मराठा नेत्यांच्या यादीत नारायण राणेही होते.
अशोक चव्हाण, एकनाथ शिंदेंसोबत नारायण राणेंनाही मराठा समाजाच्या नजरेत खलनायक ठरवण्याचा तो प्रयत्न होता, हे उघड आहे, पण राणे त्रयींकडून त्याबाबत चकार शब्दाची प्रतिक्रिया आली नाही.
चित्रा वाघ यांच्या पोस्टला भाजपातील बड्या नेत्यांचं पाठबळ / फूस असल्याशिवाय तशी पोस्ट येण्याची शक्यता नव्हती. भाजपातून नारायण राणेंचे पंख छाटण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, याचंच ते द्योतक होतं.

रवींद्र चव्हाणांचं प्रदेशाध्यक्षपदी येणं हाच मूळात राणेंना धोक्याचा इशारा आहे. राणेंमुळे मूळ संघीभाजपाईं कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते सिंधुदुर्गातील राजकारणाच्या बाहेर फेकले गेलेत.
राणे समर्थक नगरसेवकांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवून कोकणात 'राणे म्हणजेच सबकुछ' हा समज मोडीत काढायचा रवींद्र चव्हाणांचा इरादा दिसतो.
निलेश राणे किंवा नितेश राणे काय बोलतात, यापेक्षा स्वतः नारायण राणे ह्या घडामोडींवर कसे आणि काय व्यक्त होतात, याची कोकणवासीयांना मोठी उत्सुकता लागून राहिली आहे.