पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातून फलटणला जाण्याच्या बेतात असलेल्या २६ वर्षीय युवतीला एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीने दिशाभूल करून स्थानकातच उभ्या असलेल्या बसमध्ये नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. बुधवारी २६ फेब्रुवारी रोजी पहाटे पाच साडेपाचच्या सुमारास स्थानकात प्रवाश्यांचा व तसंच बस चालक-वाहक यांचा वावर असताना घडलेल्या या घटनेने महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा विषय नव्याने ऐरणीवर आला आहे.
पीडित युवती बस स्थानकात फलटणला जाणाऱ्या बसच्या प्रतिक्षेत होती. तिला दत्तात्रय गाडे या व्यक्तिने हेरलं आणि जवळ जाऊन तिची विचारपूस केली. फलटणला जाणारी बस अमुक ठिकाणी उभी आहे, असं त्याने तिला सांगितलं. तेव्हा बस इथेच लागते, असं पीडिता म्हणाली. पण आज बस तिकडे लागलीय, मी हवं तर सोडतो, असं गाडे याने म्हटल्यानंतरही पीडिता सावध होती. बसमध्ये अंधार दिसतोय, असं ती म्हणाली. त्यावेळीही गाडे तिच्यावर दबाव टाकत राहिला.
एसटी महामंडळाच्या सोलापूर आगाराची शिवशाही बस क्रमांक एमएच 06 BW 0319 ही बस सोलापूर ते स्वारगेट पुणे या मार्गावर धावत होती, ही बस सोलापूर ते स्वारगेट पुणे ( विना वाहक ) होती. या बसचा चालक शंकर लालू चव्हाण यांनी पहाटे ३.४० वाजताच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकात आणली. चालकाने ही बस स्वारगेट बस स्थानकात रसवंतीगृह समोर लावली होती.
दीदी म्हटल्याने पीडिताने त्याच्यावर विश्वास ठेवला व ती बसमध्ये कोणी बसलेलं आहे का, हे तपासण्यासाठी बसमध्ये चढली. पाठोपाठ दत्तात्रय गाडे बसमध्ये चढला आणि त्याने दार लावून घेऊन धमकावून पीडितेवर बलात्कार केला. अशी तक्रार पीडितेने पोलिसांत केलीय.
दत्तात्रय गाडे पीडितेसोबत बोलतानाचं, पीडिता बसकडे जातानाचं आणि मागोमाग गाडे बसमध्ये चढतानाचं सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी हस्तगत केलंय. घटना घडल्यावर बसमधून गाडे उतरताना व त्यानंतर दोनेक मिनिटांनी पीडिता बसमधून उतरल्याचंही सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसतं. पीडितेने बसमधून उतरल्यानंतर कोणताही आरडाओरडा केला नाही, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
पहाट झालेली असली तरी घटना घडली त्यावेळेस बस स्थानकात चांगली गर्दी होती, प्रवाश्यांना, परिसरातील लोकांचा, एसटी कर्मचाऱ्यांचा वावर होता. पीडिता बसमधून बाहेर पडली, तेव्हा शेजारच्याच बसमध्ये एक चालक चढत असताना सीसीटीव्हीत दिसतं. पीडितेने वेळीच गोंगाट केला असता तर आरोपी दत्तात्रय गाडे तिथल्या तिथे पकडला गेला असता, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
घटनेनंतर पीडिता फलटणला जाणाऱ्या बसमधून निघून चालली होती. परतीच्या प्रवासात तिने ती घटना आपल्या परिचितांना सांगितली, त्यावेळी त्यांनी तिला माघारी जाऊन पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सकाळी ९ च्या सुमारास सदरचा गैरप्रकार पोलिसांपर्यंत पोहचला आणि लागलीच पोलिसांनी तपास सुरू केला. सर्वप्रथम सीसीटीव्ही फूटेज आणि बस ताब्यात घेतली आणि आरोपींची ओळख पटवली. आरोपी दत्तात्रय गाडे सराईत गुन्हेगार असल्याचं पोलिसांना समजलंय.
घटनास्थळापासून पोलिस ठाणं जवळच असतानाही ही घटना घडलीय, पण पोलिस प्रत्येक बसच्या सुरक्षेची काळजी घेऊ शकत नाहीत, घटना आगारात घडलेली असताना सुरक्षेची अंतर्गत संपूर्ण जबाबदारी आगार व्यवस्थापनाची आहे आणि तपासात त्यांचीही चौकशी केली जाईल, असा पवित्रा पोलिसांनी घेतलाय.