महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामधील इतिहास प्रसिद्ध वनदुर्ग म्हणजेच हा वासोटा किल्ला...निसर्गाच्या खाणीमध्ये वसलेला हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्न आहे, सातारा पासून पश्चिम दिशेला कास पठाराच्या पुढे साधारण चाळीस किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या घनदाट जंगलामध्ये हा किल्ला उभारण्यात आला आहे
समुद्र सपाटी पासूनची उंची ही साधारणता १,१७२ मीटर येवढी आहे. घनदाट डोंगरावर असलेला हा किल्ला वनदुर्ग प्रकारच्या किल्ल्यांमध्ये मोडतो. या किल्ल्याची चढाई अवघड आहे. उंचावर असल्याने वासोटा किल्ल्याची सध्याची परिस्थिती बर्यापैकी चांगल्या अवस्थेत बघायला मिळते. परंतु किल्ल्यांच्या महत्त्वाच्या अवशेषांची पडझड झालेली दिसून आली.

सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील वासोटा किल्ला ! एका बाजूने शिवसागर जलाशयाचं पाणी व चारी बाजूने असलेल्या घनदाट अरण्य असल्यामुळे किल्ल्याचं सौंदर्य खुलून दिसतं. जांभ्या रंगाच्या दगडानी हा किल्ला बांधला असून शिलाहार कालीन राजाने म्हणजेच शिलाहार वंशीय दुसऱ्या भोजराजाने वासोटा किल्ला बांधल्याचा उल्लेख आढळतो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी वासोटा किल्ल्याचं नाव बदलून व्याघ्रगड असं ठेवलं होतं. त्या काळात या जागेचा वापर तुरुंग म्हणून करण्यात येत होता.

किल्ल्यावर जाण्यासाठी मुख्य दोन मार्ग आहेत. कोकणातून चिपळूणकडून वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी चोरवणे या गावापर्यंत गाडीमार्ग असून पुढे मळलेल्या पायवाटेने किल्ल्यावर येता येईल. ही वाट नागेश्वर सुळक्याजवळ पोहोचते. सुळक्याच्या पोटामध्ये एक गुहा असून महादेवाचं मंदिर आहे. स्थानिक वाटाड्या किंवा गाईड घेऊन यावं. जंगलात हिंस्त्र प्राणी असल्यामुळे योग्य ती काळजी घेऊनच ह्या मार्गाने यावं, असे स्थानिकांकडून कळालं.
बामनोली मार्गे किल्ल्यावर येण्यासाठी मोठ्या प्रमाणात लॉन्च उपलब्ध असून येथे आलेल्या नागरिकांची राहायची व जेवायची योग्य ती सोय स्थानिकांना मार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे, आम्ही देखील याच मार्गाने किल्ल्यावर जायचं ठरवलं. येथून लॉंचने साधारण एक तास हा किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाण्यास लागतो. लाँच मधील प्रवास सुखावणारा आहे
पायथ्याशी पोहचल्यावर चेक पोस्टला प्रवेश फी घेतली जाते. आपल्या बॅगमधील प्लास्टिक पिशव्यांची नोंद करून काही पैसे डिपॉझिट ठेवावे लागतात. हे प्लास्टिक पुन्हा खाली न आणल्यास पैसे जप्त केले जातात तसंच येथे वेळेची मर्यादा आहे. परतीचा प्रवास बोटीचा असल्यामुळे साधारण चार वाजेपर्यंत किल्याच्या पायथ्याशी यावं लागतं.

साधारण दीड तासात आपण चालत किल्ल्यावर पोहोचतो. वाटेतून जाताना दोन्ही बाजूने घनदाट जंगल असल्यामुळे थकवा जाणवत नाही. पायवाट पूर्णपणे मळलेली असून व काही ठिकाणी बांधकाम केलेल्या पायऱ्या आहेत. जाताना वाटेत श्री हनुमानाचे मंदिर आहे व त्यात गणपतीची मूर्तीदेखील आहे. मंदिराला लागून पाण्याच्या ओढा आहे. ओढ्याचे पाणी वाहते असून पिण्यायोग्य आहे,
कोयना अभयारण्यात विविध प्रकारची वृक्षसंपदा असून पशुपक्षी पाहायला मिळतात. विशेष करून याठिकाणी रानगवा, अस्वल, भेकर, कोल्हे कमी अधिक प्रमाणात बिबट्या पाहायला मिळतात, असं स्थानिकांकडून कळालं. काही अंतर चालून गेल्यावर नागेश्वर सुळक्याकडे जाणारा मार्ग दिसतो. हा रस्ता जंगलातून जाणारा असून जाताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. किल्ल्यावर जात असताना पाठीमागे शिवसागर जलाशय व सह्याद्रीचा अदभुत रूप पाहण्यास मिळतं.
किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. येथून थोडं वर आल्यावर डाव्या बाजूला बिनछताचं श्री मारुती रायाचं मंदिर पाहण्यास मिळतं. त्याच्यासमोर पाण्याचा तलाव असून पाण्याची पातळी आता कमी झालेली दिसली. मंदिरापासून प्रमुख तीन वाटा किल्ला पाहण्यासाठी जाताना दिसतात.

सरळ जाणारी वाट भग्नावस्थेत असलेल्या राजसदरेकडे घेऊन जाते व उजव्या बाजूने जाणारी वाट काळकाईच्या ठाण्याकडे जाते. वाटेतच महादेवाचं सुंदर मंदिर दिसतं. मंदिराच्या बाजूला काही अवशेष पाहण्यास मिळतात. ती वास्तु नेमकी कशाची याबाबत नेमकी माहिती कळू शकली नाही,
मंदिराकडून पुढील रस्ता माचीकडे घेऊन जातो. माचीला काळकाईचं ठाणे असं म्हणतात. माचीवरून दिसणारी घनदाट अभयारण्ये व कोयनेचा जलाशय हा संपूर्ण देखावा रमणीय असून आलेला थकवा क्षणात निघून जातो. माचीवर ध्वजस्तंभ असून येथूनच ताई तेलीचा कडा व नागेश्वरचा सुळका पाहण्यास मिळतो,

परत आलेल्या वाटेने श्री मारुतीरायाच्या मंदिराकडे जावं व तेथून डाव्या बाजूच्या वाटेने गेले असता पुढे बाबुकडापाशी जाता येतं. वाटेमध्ये चुन्याचा घाणा दिसतो. त्याच्या अवस्थेवरून संवर्धन झालेलं दिसत नाही. याच्या उजव्या बाजूला काही अवशेष आहेत असं कळालं. परंतु वृक्षांमुळे माहिती जाणून घेता आली नाही.
याच वाटेने पुढे जात असता पाण्याचे दोन दगडांमध्ये खोदलेले टाके दिसण्यात आले. यामध्ये मुबलक प्रमाणात पाणी असून ती स्वच्छ व व्यवस्थित पाहण्यास मिळाले. मळलेल्या वाटेने पुढे गेले असता आपण बाबूकड्यापाशी येऊन पोहोचतो. बाबूकड्यापासून समोरच जुना वासोटा पाहण्यास मिळतो.
सदर किल्ल्यावर जाण्यास परवानगी नाही. अभयारण्याचं राखीव क्षेत्र असल्यामुळे किल्ल्यावर जाण्यासाठी परवानगी दिली जात नाही. बाबूकड्यावरून आवाज दिला असता आवाज घुमतो. किल्ल्याचं अद्भुत दर्शन व किल्ल्याची वेगवेगळी वैशिष्ट्ये मनाला प्रसन्न करून जातात. किल्ला पाहण्यासाठी साधारण एक ते दीड तास लागतो.
दीपक परब
कल्याण-डोंबिवली समन्वयक, कायद्याने वागा लोकचळवळ
mediabharatnews@gmail.com