कर्करोग बरा करण्यासाठीचं ‘गंगास्नान’ लहानग्याच्या मृत्यूला ठरलं कारणीभूत !

कर्करोग बरा करण्यासाठीचं ‘गंगास्नान’ लहानग्याच्या मृत्यूला ठरलं कारणीभूत !

कर्करोग बरा करण्यासाठीचं ‘गंगास्नान’ लहानग्याच्या मृत्यूला ठरलं कारणीभूत !

अवघ्या पाच-सात वर्षाच्या रवीला त्याची आत्या सुधा जेव्हा हरिद्वारमध्ये हर-की-पौरी येथे गंगेच्या पाण्यात डुबवत होती, तेव्हा रवीचे आईवडील मंत्र जपण्यात व्यग्र होते. त्या प्रसंगाने विचलित होऊन किनाऱ्यावरून कोणीतरी आरडाओरडा केला आणि एकाने पुढे होऊन सुधाच्या हातातून रवीला खेचून घेतलं, तेव्हा सुधाने चिडून त्या व्यक्तिवर हातही उगारला. किनाऱ्यावर रवी निपचित पडून होता, तेव्हाही सुधा म्हणत होती की बघा तुम्ही, चमत्कार होईल आणि तो उठून बसेल ! पण रवी उठला नाही. त्याचा केव्हाच मृत्यू ओढवला होता.

उत्तर दिल्लीत राहणाऱ्या रवीला ब्लड कॅन्सर होता. दिल्लीतील श्री गंगाराम हाॅस्पिटलच्या डाॅक्टरांनी हात वर केल्यावर रवीच्या आईवडिलांना गंगा नदीकडून चमत्काराची अपेक्षा होती. दिल्लीतून टॅक्सीने रवीला हरिद्वारला आणण्यात आलं. तोवर त्याची तब्येत आणखी खालावली होती.

त्या अवस्थेतही रवीची आत्या सुधा हिने रवीला गंगास्नान करण्याच्या उद्देश्याने जवळपास १५ मिनिटे थंडगार पाण्यात डुबवले. सुरुवातीला रवी जोराने रडत होता, पण हळुहळू त्याचा आवाज कमी झाला. कडाक्याची थंडी, दुर्धर आजारपण आणि खालावलेल्या तब्येतीत असं करणं खरं तर एक क्रूरता होती. पण रवीचे आईवडील आणि आत्याच त्या जीवघेण्या उपायांत सामील होते.

किनाऱ्यावरून बघणारे लोक 'बच्चे की जान लोगे क्या' असं ओरडतही होते. पण त्या कुटुंबावर अंधश्रद्धेचा असा काही घट्ट पगडा होता की ते कोणाचंही काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

जवळपास १५ मिनिटं त्या लहानग्या जीवाचा छळ सुरू होता. शेवटी दोघं जण पाण्यात उतरले आणि त्यांनी रवीला त्याच्या पालकांकडून हिसकावून घाटावर आणलं. त्यावेळी त्या क्रूर पालकांनी रवीला पाण्याबाहेर काढण्याला विरोध केला. रवीला मदत करू पाहणाऱ्यांना मारहाणही केली. दुसऱ्या एकाने पुढे सरसावून रवीला खेचून घेतलं व पाण्याबाहेर आणलं. पण तोवर उशीर झाला होता.

रवीला पाण्यात डुबवतानाचा विडिओही समाजमाध्यमात पसरलाय. तो पाहता, रवीचे पालक त्याच्यावर उपचार करायला आले होते की त्याची हत्या करायला, अशी शंका निर्माण होते. टाईम्स ऑफ इंडियातील बातमीनुसार, एका प्रत्यक्षदर्शीने अशी शंका बोलूनही दाखवली.

किनाऱ्यावर उपस्थित अन्य लोकांनी रवीच्या कुटुंबियांना खडे बोलही सुनावले. लोक चिडलेले होते. पण वेळेवर पोलिस आल्याने पुढचा तणाव टळला.

रवीला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण तोवर त्याचा मृत्यू झालेला होता. रवीच्या मृतदेहाचं विच्छेदन झालं असता, पाण्यात बुडून मृत्यू झाला नसल्याचं समोर आलंय, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य डाॅ. प्रवीण देशमुख यांनी या घटनेसंदर्भात 'मीडियाभारत' कडे प्रतिक्रिया दिली आहे.

मूळात गंगा ही इतर नद्यांसारखीच एक नदी आहे. नद्यांना पवित्र अपवित्रतेत विभागणं हाच एक खुळचटपणा आहे. एक काळ होता नद्यांच्या शुद्धतेचा, परंतु नागरिकरणाने नद्या प्रदुषित केल्या आहेत, सोबत नद्यांची तथाकथित पवित्रता संपुष्टात आलेली आहे. गंगा नदीच्या शुद्धीकरणावर केंद्र सरकारला हजारों कोटी खर्च करावे लागतात, यातच सगळं आलं. अशा नदीत डुबकी मारल्याने एखादा आजार दूर होईल, असं समजणं ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. या अंधश्रद्धेने मुलाचा बळी घेतला आहे. या घटनेचा विडिओ समोर आलेला आहे. मुलाचा मृत्यू पाण्यात बुडूनच झालेला आहे, हे कोणीही सांगेल. ही उघड हत्या आहे. परंतु, शवविच्छेदन अहवालाच्या हवाल्याने पोलिस गंगेला आणि गंगेआडून पालकांना दोषमुक्त करू पाहत आहेत. हा सगळा प्रकार चिंताजनक आहे. मुलाच्या हत्येचा गुन्हा पालकांविरोधात दाखल व्हायला हवा, अशी स्पष्ट प्रतिक्रिया प्रा. प्रवीण देशमुख यांनी दिली आहे.

गंगाजल चमत्कार घडवेल म्हणून आईबापांनी रक्ताचा कर्करोग असलेल्या पाच वर्षाच्या मुलाला थंडगार पाण्यात उतरवलं. हाडे गोठवणार्‍या थंड पाण्याने कर्करोगाच्या आधीच मुलाचा जीव घेतला ! सामान्यांना परवडतील अशा दरात उपचार करणारी रुग्णालये नाहीत आणि धार्मिक श्रद्धा माणसाला आधार देते येथेवर न थांबता ती चमत्कार घडवून आणते असे वाटायला लावणारे वातावरण सर्वत्र भरलेले आहे, असं मत या घटनेवर मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केलंय.

MediaBharatNews

Related Posts

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!