मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र कल्याणातून कमळावर लढणार की ठाण्याकडे सरकणार ?

मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र कल्याणातून कमळावर लढणार की ठाण्याकडे सरकणार ?

मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र कल्याणातून कमळावर लढणार की ठाण्याकडे सरकणार ?

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेची निवडणूक कमळ चिन्हावर लढावी किंवा कल्याण लोकसभा मतदारसंघ सोडावा, यासाठी भाजपाकडून दबावतंत्र सुरू झालेलं आहे. दिव्यानंतर आता कल्याणातील भाजपा कार्यकर्त्यांनी तशी मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. अलिकडेच झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत भाजपा नेते रविंद्र चव्हाण यांनी श्रीकांत शिंदे यांचे काम सुरू करा, असं कार्यकर्त्यांना सांगितलेलं असलं तरी ते कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवतील, याबाबत स्पष्टता केलेली नाही. त्यामुळे सदरबाबतचा संभ्रम अजूनही कायम आहे.

श्रीकांत शिंदे यांनी मात्र काल उल्हासनगरातील धर्मस्थळांचा दौरा करताना खिशावर धनुष्यबाण निशाणी झळकवून भाजपाला प्रतिआव्हान दिलं आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार कुमार आयलानी यांच्यासहित भाजपाच्या इतर पदाधिकाऱ्यांनीही धनुष्यबाण निशाणीच शर्टावर झळकवली होती.

मात्र, भारतीय जनता पार्टीचे दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांनी कल्याण लोकसभेतील उमेदवार कमळ चिन्हावर लढावा, अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचं पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना यापूर्वीच लिहिलं आहे. यंदाच्या निवडणुकीत ४०० पार हे नरेंद्र मोदींचे स्वप्न आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी उमेदवार कमळ चिन्हावर लढावा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं वातावरण भाजपाकडून तयार केलं जात आहे. सचिन भोईर यांचं पत्र त्या दबावतंत्राचा भाग असल्याचं बोललं जातं. भोईर हे रवींद्र चव्हाण यांचेच निकटवर्तीय कार्यकर्ते आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघात आमदार, नगरसेवकांची संख्या, भाजपाचं संघटन याचा विचार करता, जो कोणी उमेदवार असेल तो कमळ चिन्हावर लढावा अशी मागणी सचिन भोईर यांनी केली आहे. आपण अजूनही आपल्या मागणीवर ठाम असल्याचं भोईर यांनी 'मीडिया भारत न्यूज'ला सांगितलं.

भोईर यांचं पत्र सार्वजनिक झाल्यापासून शिंदे शिवसेना आणि भाजपात तणावाचं वातावरण आहे. त्यातच आता कल्याण पूर्व भाजपातूनही शिंदेविरोधी सूर उमटू लागला आहे. या भागावर आमदार गणपत गायकवाड यांची पकड आहे. पोलिस ठाण्यातील गोळीबार प्रकरणात आमदार गायकवाड अटकेत असले, तरी त्यांच्या पत्नीने राजकीय धुरा सांभाळायला घेतलेली आहे. काल रात्री उशीरा गायकवाड यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध करण्याचा पवित्रा गायकवाड समर्थकांनी घेतला आहे. आज दुपारी पुन्हा याच विषयावर भाजपा कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे.

गोळीबार प्रकरणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचंच राजकारण जबाबदार असल्याची प्रतिक्रिया घटना घडली तेव्हा आमदार गायकवाड यांनी दिली होती. लोकसभा निवडणुकीत त्याचे पडसाद दिसतील, अशी शक्यता होतीच. ती खरी ठरते आहे. श्रीकांत शिंदे उमेदवार असतील तर निष्क्रिय राहण्याचा निर्णय गायकवाड समर्थकांनी घेतला आहे.

भाजपकडून अशा गोष्टी जाणूनबुजून सुरू असल्याचा शिंदे समर्थकांचा आरोप आहे. कोणीही कार्यकर्ता स्वतःहून अशा गोष्टी करू शकणार नाही, तर या पत्राला किंवा विरोधाला भाजपातूनच फूस असली पाहिजे, असा शिंदे समर्थकांना संशय आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजपाने दावा करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही दोन्ही गट आमने सामने आलेले आहेत. मध्यंतरी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात वाऱ्या वाढलेल्या होत्या. त्यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपा लढेल व श्रीकांत शिंदेंना ठाण्याकडे सरकवलं जाईल, अशी चर्चा होती. ती प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात उत्तर भारतीय मतदारांची लक्षणीय संख्या आहे. त्यांचं प्रतिनिधित्व उमेदवारीतून देण्यासाठी भाजपाची धडपड सुरू आहे. पण एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभेतून लढण्यावर ठाम असल्याचं दिसत आहे.

एका बाजूला कल्याण लोकसभा मतदारसंघातून डॉ. श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असतील, असं मंत्री रविंद्र चव्हाणसुद्धा सार्वजनिक मंचावरून स्पष्ट करताहेत, आतून मात्र शिंदेंची कोंडी करण्याची खेळी भाजपाकडून अद्यापही सुरूच आहे. कल्याण लोकसभेत पराभवाची शक्यता सर्वेत आल्याचं सांगून श्रीकांत शिंदे कमळ चिन्हावर लढल्यास मतदारसंघ अधिक सुरक्षित होईल, असं वातावरण भाजपाकडून निर्माण केलं जात आहे.

भाजपा कार्यकर्त्यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराचं काम सुरू करावं असं आवाहन भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी केल्यानंतर दोन्ही पक्षातील तणाव वरकरणी निवळलेला दिसत असला तरी, रवींद्र चव्हाणांनी शिंदेंचा उल्लेख एनडीएचे उमेदवार किंवा महायुतीचे उमेदवार असा केलाय. शिंदे शिवसेनेचा त्यांनी स्वतंत्र उल्लेख केलेला नाही किंवा धनुष्यबाण चिन्ह असलं तरी आपल्याला काम करायचंय, असंही चव्हाणांनी स्पष्टपणे म्हटलेलं नाही. त्यामुळे डॉ. श्रीकांत शिंदे ऐनवेळी कोणत्या चिन्हावर लढतील आणि याबाबत भाजपाच्या मनात नेमकं काय आहे, ही बाब अजूनही अनिश्चितच आहे. शिंदे शिवसेनेकडून श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा त्यामुळेच केली गेली नाहीये. शिंदे शिवसेनेचे आणि भाजपाचे पदाधिकारी धुसफूस असल्याचे उघडपणे मान्य करत नसले तरी सर्वकाही आलबेल नाही, हेही तितकंच खरं आहे.

MediaBharatNews

Related Posts

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!