लबाडीने जिंकली होती भाजपाने चंदिगड महापौरपदाची निवडणूक ! सर्वोच्च न्यायालयाने थोबडवलं !!

लबाडीने जिंकली होती भाजपाने चंदिगड महापौरपदाची निवडणूक ! सर्वोच्च न्यायालयाने थोबडवलं !!

लबाडीने जिंकली होती भाजपाने चंदिगड महापौरपदाची निवडणूक ! सर्वोच्च न्यायालयाने थोबडवलं !!

महापौरपदाची निवडणूक जिंकल्याबद्दल @BJP4 चंदिगड युनिटचे अभिनंदन. पंतप्रधान श्री @narendramodi जी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रशासित प्रदेशांनी विक्रमी विकास केला आहे. INDI आघाडीने त्यांची पहिली निवडणूक लढवली आणि तरीही भाजपकडून पराभूत झाले. हे दर्शविते की त्यांचे अंकगणित काम करत नाही किंवा त्यांची केमिस्ट्रीही नाही.

हे ट्वीट आहे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांचं ! नड्डा हे पेशाने वकील आहेत. चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने काय लबाडी केलीये याची पूर्ण कल्पना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नड्डांना नक्कीच आहे ; तरीही निकालानंतर अत्यंत निलाजरेपणांने त्यांनी हे ट्वीट केलं होतं.

चंदिगड महापौरपदाच्या निवडणूक निकालासंदर्भात त्यांनी केलेल्या आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की इंडिया आघाडीचं अंकगणित आणि त्यांची केमिस्ट्री बरोबर काम करत नाही ; परंतु सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालातून हे स्पष्ट केलंय की चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने अंकगणिती लबाडी आणि भ्रष्ट केमिस्ट्रीचा वापर करून ती निवडणूक जिंकली आहे.

चंदीगड महानगरपालिकेत एकूण ३६ सदस्य आपल्या मताधिकाराचा वापर करणार होते. कुलदीप कुमार हे आपचे उमेदवार होते. त्यांना काँग्रेसचा पाठिंबा होता. आप आणि काँग्रेस यांच्याकडे मिळून २० मतं होती. भारतीय जनता पार्टीकडे अकाली दल व स्थानिक खासदार मिळून १६ मतं होती. चित्र अगदी स्पष्ट होतं की आपचे उमेदवार हे सहजपणे निवडून येणार होते.

आश्चर्यकारकरित्या या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ता असलेले अनिल मसीह यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलं आणि पक्षाने त्यांना सोपवून दिलेली कामगिरी त्यांनी अत्यंत निर्लज्जपणे तिथे लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साक्षीने पार पाडली.

मतपत्रिकांवर खाडाखोड करताना आपली लबाडी सीसीटीव्हीमध्ये कैद होत आहे हे सुरुवातीला बहुधा अनिल मसीह यांना ज्ञात नव्हतं. सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा हे सीसीटीव्ही फुटेज पाहिलं, तेव्हा पहिली प्रतिक्रिया दिली की निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगा की सर्वोच्च न्यायालयाचं तुमच्यावर लक्ष आहे ! त्याच वेळी हे स्पष्ट झालं होतं की न्यायालयाचा निर्णय अनिल मसीह यांना अडचणीचा ठरणार आहे.

न्यायालयाने आपल्या निकालात हे स्पष्टपणे अधोरेखित केलं की इंडिया आघाडीचे उमेदवार कुलदीप कुमार यांना मिळालेली आठ मतं निवडणूक निर्णय अधिकारी मसीह यांनी लबाडीने खराब केली व भाजपाचे उमेदवार मनोज सोनकर यांच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. 

लोकशाहीसाठी हे अत्यंत भयंकर कृत्य आहे आणि त्यासाठी अनिल मसीह हे फौजदारी कारवाईला पात्र आहेत अशी टिपणीही न्यायालयाने केली आहे. अनिल मसीह यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे संकेतही न्यायालयाने दिले आहेत.

इतकं करून न्यायालय थांबलेलं नाही तर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बाद न ठरवता खराब केली गेलेली मतं ही कुलदीप कुमार यांच्या पारड्यातच पडलेली होती, यावर शिक्कामोर्तब करून न्यायालयाने त्यांना विजयी घोषित केलं आहे.

हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संविधानातील अनुच्छेद १४२ मधील ज्या अधिकारांचा वापर केला, ते पुढीलप्रमाणे आहेत :

१४२. (१) सर्वोच्च न्यायालय आपल्या अधिकारितेचा वापर करत असताना त्याच्यासमोर प्रलंबित असलेल्या कोणल्याही कामात किंवा बाबीत पूर्ण न्याय करण्याकरता आवश्यक असेल असा हुकूमनामा करू शकेल आणि याप्रमाणे केलेला कोणताही हुकूमनामा किंवा केलेला आदेश संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याखाली विहित करण्यात येईल अशा रीतीने आणि, त्यासंबंधात याप्रमाणे तरतूद केली जाईपर्यंत, राष्ट्रपती "आदेशाद्वारे विहित करील अशा रीतीने भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र बजावणीयोग्य असेल.

(२) संसदेने यासंबंधात केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींना अधीन राहून, कोणतीही व्यक्ती उपस्थित होईल, कोणत्याही दस्तऐवजांचे प्रकटीकरण होईल किंवा ते हजर केले जातील अशी खात्रीलायक तजवीज करण्याच्या अथवा आपल्या कोणत्याही अवमानाबाबत अन्वेषण करण्याच्या किंवा त्याबाबत शिक्षा देण्याच्या प्रयोजनाकरता कोणताही आदेश करण्याचा, सर्वोच्च न्यायालयास भारताच्या संपूर्ण राज्यक्षेत्राच्या बाबतीत समस्त अधिकार असतील.

देशात सत्तेत उद्या भ्रष्ट लबाड आणि देशाशी बेईमान लोक आले तर काय, याची शक्यता लक्षात घेऊन संविधानकारांनी किती दूरदृष्टी दाखवलीय, ते अनुच्छेद १४२ वरून आपल्या लक्षात येतं.

भाजपाचे उमेदवार मनोज सोनकर हे सातवी पास आहेत. त्यांचा दारूचा व्यवसाय आहे. भारतीय जनता पार्टीने आपली सर्व राजकीय ताकद लावून सत्तेचा गैरवापर करून या उमेदवाराला चंदिगडचा महापौर बनवायचा चंग बांधला होता. तो न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे हाणून पाडला गेला आहे.

जे पी नड्डा यांचं ट्विट सांगतं की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रशासित प्रदेशांचा कसा विक्रमी विकास होत आहे, मात्र प्रत्यक्षात भाजपा सत्तेचा गैरवापर करून कशा निवडणुका जिंकत आहे हे चंदिगड महापौरपदाबाबत दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे. अनिल मसीह यांचा बोलविता धनी कोण, इथपर्यंत न्यायालय जाईल का, हे येणारा काळ सांगेल.

संविधानिक पदावर बसल्यानंतरसुद्धा भाजपाशी संबंधित व्यक्ती नैतिकदृष्ट्या किती भ्रष्ट असू शकते, हे महाराष्ट्रात राहुल नार्वेकरांनी दाखवून दिलंच आहे. आता अनिल मसीहसारख्या भाजपा कार्यकर्त्यानेही निवडणूक निर्णय अधिकारी पदाच्या कर्तव्याशी बेईमानी करत उघड गुन्हेगारी कृत्य केलं. भारतीय जनता पार्टीला हीच सगळी लबाडी बिनदिक्कतपणे करण्यासाठी संविधानिक अडथळे नकोत आणि म्हणून असे अडथळे दूर करून निरंकूश बेलगाम सत्ता उपभोगण्यासाठी या पक्षाला लोकसभेत पाशवी बहुमत हवं आहे. 

 

 

 

राज असरोंडकर

संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ | संपादक, मीडिया भारत न्यूज

mediabharatnews@gmail.com

MediaBharatNews

Related Posts

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!